अमरावतीत ५३ हजार हेक्‍टरने सोयाबीन क्षेत्रवाढीचा अंदाज

यंदाच्या खरिपात सोयाबीन क्षेत्रात वाढीची शक्‍यता असताना या वाढीव क्षेत्राकरिता बियाण्याचे नियोजन करताना कृषी विभागाची दमछाक होण्याची भीतीदेखील वर्तविली जात आहे.
In Amravati, soybean area is estimated to increase by 53,000 hectares
In Amravati, soybean area is estimated to increase by 53,000 hectares

अमरावती ः यंदाच्या खरिपात सोयाबीन क्षेत्रात वाढीची शक्‍यता असताना या वाढीव क्षेत्राकरिता बियाण्याचे नियोजन करताना कृषी विभागाची दमछाक होण्याची भीतीदेखील वर्तविली जात आहे. यंदाच्या खरिपात सुमारे एक लाख क्‍विंटल बियाण्याचा तुटवडा भासेल, असे सांगितले जाते. कृषी विभागाने बियाणे टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर वारंवार घरचे बियाणे राखून ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

रब्बी हंगाम संपण्यापूर्वीच कृषी विभागाने खरिपाचे नियोजन सुरू केले आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस बियाणे मागणी, संभावित पिकांची क्षेत्रवाढ व इतर आराखडा आयुक्‍तालय स्तरावर सादर करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत ५३ हजार हेक्‍टरने सोयाबीन क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार एकूण सात लाख २८ हजार ११२ हेक्‍टर खरीप क्षेत्रापैकी सुमारे २ लाख ७० हजार हेक्‍टर क्षेत्र सोयाबीनखाली राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासाठी किमान २,०२,५०० क्‍विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. यात ग्राम बीजोत्पादन अंतर्गत ७२,१८४ क्‍विंटल, महाबीजच्या माध्यमातून ८० हजार, राष्ट्रीय बियाणे महामंडळाद्वारे पाच हजार व खासगी ४५,३१५ क्‍विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. मात्र त्यानंतरही वाढीव ५३ हजार हेक्‍टर क्षेत्राकरिता बियाण्यांची उपलब्धता करताना कृषी विभागाचा चांगलाच कस लागणार आहे.

गुलाबी बोंड अळीमुळे गेल्या हंगामात कापसाची उत्पादकता प्रभावीत झाली. खोडवा (फरदड) न घेताच कापूस काढावा लागला. परिणामी, या वर्षी कापसाखालील क्षेत्र कमी होत ते सोयाबीनखाली वाढण्याची शक्‍यता आहे. संकरित कपाशी खालील २ लाख ५१ हजार ५४२ हेक्‍टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आराखड्यातून वर्तविला गेला आहे. त्याकरिता बीटीच्या १२.५७ लाख पाकिटांची मागणी राहणार आहे. त्यामध्ये बीजी-२ कपाशीच्याच पाकिटांचा समावेश आहे. १९ खासगी कंपन्यांकडे याबाबत मागणी नोंदविण्यात आली आहे. यात पाच लाख क्‍विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करेल. याशिवाय ५,६५५ क्‍विंटल बियाणे खासगी कंपन्यांद्वारे पुरविण्यात येणार आहे. या दोन मुख्य पिकांच्या सोबतच चार लाख ५८ हजार ९९२ हेक्‍टरमध्ये अन्य पिकांचे क्षेत्र राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com