अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्या

Amrawati in Bullock cart with farmers agitation
Amrawati in Bullock cart with farmers agitation

अमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण रस्त्याच्या कामात दिरंगाई होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैल घुसविल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बैल कार्यालयाबाहेर नेण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या वर्षी अतिपावसामुळे पांदण रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक, तसेच रब्बी हंगामातील निविष्ठांची ने-आण करणे यामुळे अडचणीचे ठरत आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र पांदण रस्ते विकास योजनांचा प्रचंड गाजावाजा करण्यात येत आहे. अशी विरोधाभासी स्थिती असल्याने यात बदल व्हावा याकरिता शेतकऱ्यांनी यापूर्वी धरणे दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्यासोबत आणलेल्या बैलजोड्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात घुसविण्याचा प्रयत्न सुरू केला. 

उपस्थित पोलिसांनी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नसल्याने शेतकरी थेट बैलजोड्या घेऊन एसडीओ कक्षात दाखल झाले. चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात बाळकृष्ण धर्माळे, राजेंद्र उमेकर, समीर जवंजाळ, राजेश बनारसे, राजू लोखंडे, नवनीत उमेकर, सचिव अढावू, वैभव डवरे, सूर्यभान पारिसे, भीमराव मेश्राम, विजय वाकेकर, विश्‍वास डुकरे, रवींद्र समरीत, उमेश घाटे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पांदण रस्त्यांची कामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून होणाऱ्या या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. - प्रकाश साबळे, जिल्हा परिषद सदस्य

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com