दोन दशकांपासून आंध्रा धरणग्रस्तांची थट्टा 

देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचे स्वातंत्र्यानंतरही कसे हाल हाल केले जात होते, याचे धगधगते चित्रण बिमल रॉय यांनी ‘दो बीघा जमीन’ या चित्रपटात १९५३ मध्ये मांडले होते.
madhave
madhave

पुणे : देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचे स्वातंत्र्यानंतरही कसे हाल हाल केले जात होते, याचे धगधगते चित्रण बिमल रॉय यांनी ‘दो बीघा जमीन’ या चित्रपटात १९५३ मध्ये मांडले होते. मात्र ७० वर्षांनंतरही शेतकऱ्याच्या नशिबी व्यवस्थेने मांडलेली क्रूर थट्टा संपलेली नसल्याचं विदारक चित्र मावळ भागातील धरणग्रस्तांच्या वस्त्यांवर दिसते आहे. 

पुण्याच्या पश्‍चिमेला सह्याद्रीतून निघालेल्या इंद्रायणी नदीला आंद्रायणी नावाची उपनदी येऊन मिळते. ज्ञानदेवांमुळे इंद्रायणीची चर्चा बरीच होते. मात्र मावळ भागात आंद्रायणी ओळखली जाते ती धरणग्रस्तांच्या न सुटलेल्या प्रश्‍नांसाठी. आंद्रा नदीवर दोन दशकांपूर्वी धरण बांधण्यासाठी १३ गावांमधील ४१२ शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या गेल्या. मोढवे हे त्यापैकीच एक धरणग्रस्त कुटुंब. 

“माझी ३५ एकर सोन्यासारखी बागायती जमीन धरणात गेली. धान, गहू, ज्वारी, बाजरी, भाजीपाला अशी सर्व पिके आम्ही त्या जमिनीवर घ्यायचो. भुईमूग पिकवून तेलदेखील घरात काढत होतो. बाजारातून फक्त मीठ आणावे लागे. मात्र धरणामुळे आम्ही भूमिहीन आणि बेघरही झालो. जगण्यासाठी आता दोन गायी-म्हशी चारून दूधविक्रीतून कुटुंबाला जगवतो आहे,” असे शिरे गावचे ६५ वर्षांचे धरणग्रस्त शेतकरी गंगाराम तुकाराम मोढवे यांनी सांगितले. 

बेघर झालेल्या मोढवे कुटुंबाने उधार-उसनवार करून टाकवे बुद्रुक गावात चार गुंठे जमीन घेतली. त्यात दोन भावांसाठी घर आणि गोठा बांधून उदरनिर्वाह सुरू केला. त्यांना धरणग्रस्तांचा ना दाखला दिला गेला ना नोकरी. विदर्भातील समृद्धी प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना बाजारभावाने पैसे दिले गेले. मात्र मोढवे यांच्या जमिनी कवडीमोल भावाने ताब्यात घेऊन देखील अद्याप पूर्ण पैसे सरकारने दिलेले नाही. 

‘‘धरणासाठी आम्ही जमीन दिली. आम्हाला शेतीसाठी जमीन दिली गेली नाही. आमच्या उरडावर धरण बांधून पिंपरी- चिंचवडच्या साऱ्या बिल्डिंग-कारखान्यांना पाणीपुरवठा होतोय; पण इकडे आम्हाला पाणी नाही. या भागातल्या चांगल्या जमिनी मुंबईच्या पार्ट्यांनी मातीमोल भावाने घेतल्या. आता त्यावर फार्महाउस, ग्रीनहाउस उभे राहिले. आम्ही मात्र बेवारशी आहोत,’’ असे मोढवे यांचा मुलगा गणेश मोढवे यांनी सांगितले. 

आंद्रा भागात जणू काही ‘दो बीघा जमीन’ चित्रपटाचा दुसरा भाग तयार होतो आहे. ‘दो बीघा जमीन’ चित्रपटात शेतकरी शंभूची जमीन हिरावून घेतली जाते. शंभूचे वडील वेडे होतात; तर त्याचा परिवार बेघर होतो. इकडे ७० वर्षांनंतर आता मोढवे हे शेतकऱ्याचे गुराखी बनले आहे. त्यांचे कुटुंब ‘चार गुंठे जमीन’ नशिबी घेत जगत आहे. त्यांचा एक मुलगा दूध घालायला गेला आणि अपघाती मरण पावला आहे. दुसरा मुलगा गणेश हा ड्रायव्हर बनला. त्याचाही अपघात झाला असून, तो आता शस्त्रक्रियेला पैसा मिळण्यासाठी वणवण फिरतो आहे.  धरणग्रस्तांसाठी संघर्ष करणार ः मालपोटे  आंध्रा धरणग्रस्तांची एक संघटना आता भाई भरत मोरे व काळुराम मालपोटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तयार केली आहे. ‘‘१९९७ मध्ये धरण झाले. २००२ मध्ये पाणी अडवले गेले. दोन टीएमसीच्या या धरणासाठी शेतकऱ्यांना ४०-५० हजार रुपये हेक्टरी मोबदला जाहीर केला गेला. मात्र आसपास आता जमिनीचे भाव ५० लाखांपासून एक कोटी रुपये एकरपर्यंत चालू आहेत. शेतकऱ्यांची ही फसवणूक आहे. धरणग्रस्तांना योग्य मोबदला, जमीन, नोकरी मिळावी म्हणून आम्ही लढा उभारणार आहोत,’’ असे मालपोटे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com