नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याबाबत शासकीय स्तरावर अनास्था

नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याबाबत शासकीय स्तरावर अनास्था
नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याबाबत शासकीय स्तरावर अनास्था

सातारा : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य मेटाकुटीला आलेला असताना शासकीय स्तरावरून मात्र, याबाबत अनास्था दिसून येत आहे. महसूल, कृषी, बांधकाम विभागांतील समन्वयाचा अभाव आणि एकमेकांवर कामे ढकलण्याच्या प्रवृत्तीमुळे नुकसानीच्या पंचनाम्यांची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर ‘अहो साहेब पंचनाम्याचं तेवढं बघा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कारभारामुळे जनतेचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल दोन आठवडे अतिवृष्टी झाली. यामुळे धरणे ओव्हरफ्लो होऊन नद्यांना पूर आला. त्यामुळे शेकडो हेक्‍टरवरील पिके पाण्याखाली गेली. याचा फटका पाटण, कऱ्हाड, सातारा, जावली, वाई, कोरेगाव तालुक्‍यांना बसला. शेतीचे प्रचंड नुकसान तसेच मालमत्तेचीही कोट्यवधी रुपयांची हानी झाली. या पूरग्रस्तांना मदतीच्या ओघ राज्यभरातून सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात मदत येऊ लागली. शासनाच्या एक पाऊल पुढे जाऊन सर्वसामान्यांनी मदतीसाठी आघाडी घेतली.

पूर ओसरल्यानंतर नुकसानीचे पंचनामे शासकीय पातळीवरून सुरू झाले. त्यासाठी महसूल, कृषी, बांधकाम, महावितरण आदींनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले. पण या पंचनाम्यात विविध विभागांतील समन्वयाचा अभाव निर्माण झाल्याने पंचनाम्याचे काम रखडले आहे. महसूल व कृषी विभागांची जबाबदारी असताना महसूल विभाग सर्व काही कृषी विभागावर ढकलून बसला आहे. त्यातच ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलनाचे निमित्त करत पंचनाम्यांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे कऱ्हाड, सातारा आणि कोरेगाव तालुक्‍यांतील पंचनामे अद्याप अपूर्णच असल्याचे सांगण्यात येत आहे. कोट्यवधींचे नुकसान झालेले असताना अधिकाऱ्यांना याचे सोयरसुतक नसल्याचे जाणवत आहे. 

भरपाईपासून वंचित राहण्याची भीती पंचनामे करण्यात दिरंगाई होत असल्याने अनेकांना नुकसान होऊनही भरपाईपासून वंचित राहण्याची भीती ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे. पाऊस पूर्णत: बंद झाल्याने शेतातील पिकांत तुंबलेले पाणी कमी झाले आहे. मात्र, पिके पाण्यात राहिल्याने उत्पन्न घटणार आहे. तसेच अनेकांचे कृषिपंप पाण्याखाली गेल्याने ते नादुरुस्त आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यापूर्वी पंचनामे होणे गरजेचे आहे. पण पंचनाम्याची वाट न बघता दुरुस्ती करत आहेत. तसेच पिके वाचविण्यासाठीही शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पंचनाम्यांना उशीर झाल्यास या पिकांचे नुकसान दिसणार नाही, त्यामुळे नुकसान होऊन भरपाई मिळू शकणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com