नाशिक येथे कांदा उत्पादकांचा संताप अनावर

नाशिक येथे कांदा उत्पादकांचा संताप अनावर
नाशिक येथे कांदा उत्पादकांचा संताप अनावर

नाशिक : कांद्याला हमीभाव जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी (ता. २७) नामपूर येथे रास्ता रोको, तर लासलगाव येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतीमालाबाबतच्या धोरणाचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली.

नामपूरला शेतकरी रस्त्यावर कांद्याचे गडगडणारे भाव, सद्यःस्थितीत असलेल्या दुष्काळाच्या भयावह परिस्थितीमुळे कांद्याला किमान दोन हजार रुपये प्रतिक्किंटल भाव मिळावा, सिंचनासाठी तीन टप्प्यांत आवर्तन सोडावे, यासाठी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’ करण्यात आले. यामुळे तब्बल तीन तासांहून अधिक वेळ राज्यमहामार्ग ठप्प होता. या वेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा देत शासनाचा निषेध केला.

नाफेडच्या माध्यमातून कांद्याची खरेदी करण्यात यावी, कांदा निर्यातीसाठी सरकारने त्वरित १० टक्के अनुदान जाहीर करावे, मोसम नदीचे आर्वतन तीन टप्प्यांत अर्थात १० डिसेंबर, २० फेब्रुवारी व २० मे दरम्यान शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी मिळावे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. त्याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रमोद हिले यांना देण्यात आले. हिले यांनी आंदोलकाच्या भावना सरकारला कळविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस दीपक पगार, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख समीर सावंत, प्रवीण सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक सावंत, शशिकांत कोर, खेमराज कोर, स्वाभिमानी तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे, डोंगर  पगार, युवराज देवरे आदी उपस्थित होते.

काशी एक्स्प्रेस रोखली शेतकऱ्यांचा कांदा व अन्य शेतीमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. उत्पादन शुल्क दूरच वाहतूक व मजुरीदेखील वसूल होत नसल्याने केंद्र सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा. कांदा व अन्य शेतीमालाला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लासलगाव रेल्वे स्थानकावर काशी एक्स्प्रेससमोर रेल रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. महिलाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पवार, डॉ. सयाजी गायकवाड, अमृता पवार, बबन शिंदे, बाळासाहेब लोखंडे, विजय पवार, शहाजी भोकनळ उपस्थित होते.

महसूलमंत्र्यांना आमदारांचे साकडे कांद्याचे भाव अचानक कोसळल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. शासनाने कांदा खरेदी योजना सुरू करावी, अशी मागणी चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. डॉ. आहेर यांनी मंत्रालयात पाटील व पटेल यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com