पशूपक्षी प्रदर्शनाची जालन्यात जय्यत तयारी

प्रदर्शन तयारी
प्रदर्शन तयारी

जालना:  उद्यापासून (ता. २) जालन्यात होणाऱ्या राष्ट्रीय दर्जाचे पशू-पक्षी प्रदर्शनाची सुरू असलेली जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोचली आहे. साधारणपणे शुक्रवारी रात्रीपर्यंत या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विविध राज्यांतील पशुपक्ष्यांचे थवे जालन्यात दाखल होणार आहेत. यामध्ये काही आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या पशू-पक्ष्यांचाही समावेश असेल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.  जवळपास वीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच राज्यात अशा प्रकारचे राष्ट्रीय स्तरावरील पशुपक्षी प्रदर्शन भरते आहे. याआधी असे प्रदर्शन राज्यात ओरस येथे झाले होते. त्या वेळी केवळ पशुपक्ष्यांच्या विविध जाती सहभागी झाल्या होत्या. शिवाय अकोला येथे विभागीय स्तरावरील पशुपक्षी प्रदर्शनही घेण्यात आले होते. परंतु नवतंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करणारे जालन्यातील बाजार समितीसमोरील प्रांगणात होणारे पशू प्रदर्शन देशातील पहिलेच प्रदर्शन असेल.  या प्रदर्शनात पशुपालनातील नवतंत्रज्ञान, त्याच्या स्वीकाराने आलेले परिवर्तन, दुष्काळात घ्यावयाची काळजी व ते टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या बाबी, चारा व्यवस्थापन, आदींविषयी प्राधान्याने शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून व वेगवेगळ्या स्टॉलच्या माध्यमातून दिली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्‍त डॉ. सुनील राउतमारे यांनी दिली. या प्रदर्शनात देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाना, आंध्र प्रदेश, तामिलनाडू, गुजरात गोवा आदी राज्यांतील विविध जातींच्या गायी, म्हशी, वळू, शेळ्या, मेंढ्या, घोडे, कोंबड्या आदी पशुपक्ष्यांचा सहभाग असणार आहे. गीर, साहिवाल, थारपारकर, राठी व वेचूर या अधिक दूध देणाऱ्या देशी गायी प्रदर्शनाचे आकर्षण असतील.  शासन, सेवाभावी संस्था, कृषी, पशुपालनसंबंधी काम करणारे घटक यांचे जवळपास शंभर स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत. शिवाय बचत गटाचेही स्टॉल असणार आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने भव्य अशा ८ ते ९ डोमची उभारणी करण्याचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे डॉ. राउतमारे म्हणाले. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती पशुपालकांना या प्रदर्शनीच्या माध्यमातून करून घेता येणार आहे.  असा असेल पशुपक्ष्यांचा सहभाग  प्रदर्शनात विविध जातींच्या जवळपास ६०० ते ६५० गायी-म्हशी सहभागी होतील. १५ जातींच्या जवळपास ३०० ते ३५० शेळ्या, मेंढ्यांचा प्रदर्शनात सहभाग असेल. चार प्रकारचे ३० ते ४० वराह सहभागी होतील. ३० ते ३५ प्रकारचे जवळपास ३०० कुक्‍कुटपक्षीही या प्रदर्शनात सहभागी असणार आहेत. ४ ते ५ जातीचे जवळपास २० अश्‍वही या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. 

आदर्श गाव संकल्पनेचं दिसेल रुपडं  आदर्श गाव संकल्पनेवर आधारित गावाची निर्मिती या प्रदर्शनात करण्यात येणार आहे. आदर्श गावात नेमकं काय काय असावं. ते असल्याने गावाच्या एकूणच सामाजिक, आर्थिक व विविधांगी विकासाच्या दृष्टीने कशी मदत होऊ शकते याचं दर्शन घडविण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून केला जाणार आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी सेल्फी पॉइंट ठेवण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com