राज्यात अखेर पशुगणनेस प्रारंभ

राज्यात अखेर पशुगणनेस प्रारंभ
राज्यात अखेर पशुगणनेस प्रारंभ

पुणे : विविध तांत्रिक अडथळे पार करत पशुधनाची आॅनलाइन गणना अखेर सुरू झाली आहे. देश पातळीवर एकाच वेळी होणारी ही २०वी गणना टॅबद्वारे होत असून, जानेवारीअखेर राज्यातील पशुधनाची जातिनिहाय नेमकी आकडेवारी समोर येणार आहे. ही आकडेवारी भविष्यातील पशुधनाच्या विविध योजनांसाठी उपयुक्त ठरणार आहे.  पशुधनाची बिनचूक आकडेवारी उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने टॅबद्वारे गणना करण्याचा निर्णय घेतला. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मोठ्या प्रमाणावर निधीदेखील राज्यांना दिला. या गणनेसाठी राज्यांना टॅब खरेदी करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र राज्य शासनाने कोणतीही इलेक्ट्रॉनिक खरेदी राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान महामंडळाद्वारे आॅनलाइन पद्धतीने करण्याची अट घातल्यामुळे टॅबची बाजारपेठेतील किंमत आणि सरकारच्या वेबसाइटमधील किमतीमध्ये मोठी तफावत होती. यामध्ये राज्य सरकारचे दर अधिक होते. या तांत्रिक कारणांनी टॅब खरेदी बरोबर पशुगणना रखडली होती.  मात्र यानंतर या समस्येवर तोडगा निघत बाजारभावाच्या दराने ७ हजार १२६ टॅब पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे खरेदी करण्यात आले. या टॅबच्या इंटरनेटसाठी सिम कार्डदेखील खरेदी करण्यात आले असून, त्याचा पुरवठा झाला आहे. बहुतांश ठिकाणी गणना सुरू झाली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे सांगण्यात आले. जानेवारीअखेर पशुगणना होऊन अचूक आकडेवारी उपलब्ध होईल, असा विश्‍वास पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांनी व्यक्त केला.  स्पर्धात्मक दरांतून ८० लाख रुपयांची बचत  राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्रत्येक टॅबसाठीच्या सिम कार्डसाठी प्रतिमहिना ५०० रुपयांचा निधी मंजूर केला होता. तीन महिन्यांसाठी १ हजार रुपये ५०० रुपये या दराने १ कोटी ६ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर होता. मात्र राज्यात विविध विभागांतील इंटरनेट सेवांचा वेग ध्यानात घेता विविध कंपन्यांना पाचारण करण्यात आले होते. यांच्यातील स्पर्धात्मक दराने तीन महिन्यांसाठी केवळ ३७५ रुपये दराने ४ जी स्पीडची सिम कार्ड खरेदी केली. या स्पर्धात्मक दराने शासनाची ८० लाखांची बचत करण्यात आली, असे आयुक्त कांतिलाल उमाप यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com