सर्व्हर समस्येमुळे पशुगणना रखडली

पशुगणना
पशुगणना

पुणे : आॅनलाइन पशुधन गणनेला सर्व्हरच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पशुगणनेला तिसऱ्यांदा मे अखेरपर्यंत मुतदवाढ द्यावी, अशी मागणी राज्याने केंद्र सरकारकडे केली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात ८० टक्के तर शहरी भागात ३२ टक्के पशुगणना पूर्ण झाली असून, यामध्ये गोंदिया, नागपूर, वर्धा, नंदुरबार आणि हिंगोली ग्रामीणने १०० टक्‍क्‍यांपर्यंत गणना पूर्ण करत अनुक्रमे १ ते ५ क्रमांकावर आहेत. देशातील पशुधनाची बिनचूक आकडेवारी उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने टॅबद्वारे गणना करण्याचा निर्णय घेतला. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मोठ्या प्रमाणावर निधीदेखील राज्यांना दिला. या गणनेसाठी राज्यांना टॅब खरेदी करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, राज्य शासनाने कोणतीही इलेक्‍ट्रॉनिक खरेदी राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान महामंडळाद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची अट घातल्यामुळे टॅबची बाजारपेठेतील किंमत आणि सरकारच्या वेबसाइटमधील किमतीमध्ये मोठी तफावत होती. यामध्ये राज्य सरकारचे दर अधिक होते. या तांत्रिक कारणांनी टॅब खरेदी बरोबर पशुगणना रखडली होती. मात्र, यानंतर या समस्येवर तोडगा निघत बाजारभावाच्या दराने ७ हजार १८६ टॅब पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे खरेदी करण्यात आले. या टॅबच्या इंटरनेटसाठी सिम कार्डदेखील खरेदी करण्यात आले असून, त्याचा पुरवठा झाल्यानंतर, बहुतांश ठिकाणी गणना सुरू झाली. ही गणना डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे आदेश होते. मात्र, गणना केलेला डाटा सर्व्हर वर अपलोड होत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. यामुळे गणनेला मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राला केली होती. यानंतर केंद्राने मार्च अखेरपर्यंतची आणि नंतर एप्रिल अखेरपर्यंतची दोनदा मुदतवाढ दिली. मात्र, यानंतरही डाटा अपलोडिंगला समस्या उद्भवत असल्याच्या तक्रारी प्रगणकांकडून येऊ लागल्या. यामुळे वेळेत पशुगणना झाली नाही. यामुळे आता मे अखेर मुदतवाढ द्यावी, या मागणीचे पत्र राज्य सरकारच्या वतीने केंद्राला पाठविले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. आघाडीवरील जिल्हे ( टक्केवारी )

जिल्हा   ग्रामीण शहरी
गोंदिया   १२०.८५ ५९.८४
नागपूर   १०४.१४ १५.२४
वर्धा  १०३.९६ ६२.८७
नंदुरबार १००.८२ ३७.३९
हिंगोली  ९०.९९ १०८.४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com