सांसर्गिक गर्भपाताचे नियंत्रण

सर्व वयोगटातील जनावरे सांसर्गिक गर्भपात आजारास बळी पडतात. आजार दीर्घकाळ टिकून राहतो. प्रसार अत्यंत तीव्र गतीने होतो. हा आजार होऊ नये यासाठी लसीकरण हा चांगला पर्याय आहे.
Health management of crossbred cows is important
Health management of crossbred cows is important

सर्व वयोगटातील जनावरे सांसर्गिक गर्भपात आजारास बळी पडतात. आजार दीर्घकाळ टिकून राहतो. प्रसार अत्यंत तीव्र गतीने होतो. हा आजार होऊ नये यासाठी लसीकरण हा चांगला पर्याय आहे.  सांसर्गिक गर्भपात हा गायी, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्यांना दीर्घकाळ होणारा जीवाणूजन्य आजार आहे. या आजाराचा प्रादुर्भाव साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतो. आजारात मरतुकीचे प्रमाण लक्षणीय नसले तरी जनावरांना प्रजनन समस्या निर्माण होतात. हा आजार जनावरांमधून मनुष्यात संक्रमित होऊ शकतो.  आजार बृसेल्ला नावाच्या जिवाणूंमुळे होतो. विविध प्राणीवर्गात वेगवेगळ्या प्रजातींच्या बृसेल्ला जिवाणूंमुळे हा आजार होत असला तरी त्यापैकी काही प्रजातींची प्रादुर्भाव एकापेक्षा जास्त प्राणीवर्गात आढळून येतो. प्रादुर्भाव आणि प्रसार

  • आजार वर्षभर सर्वदूर दिसून येतो. सर्व वयोगटातील जनावरे या आजारास बळी पडतात. आजार दीर्घकाळ टिकून राहतो. प्रसार अत्यंत तीव्र गतीने होतो. आजाराचे जिवाणू बाधित प्राण्यांचे वीर्य, दूध, गर्भपात झालेले अर्भक, जार आणि योनीतील स्त्राव यामधून अधून-मधून, निरंतर आणि अतिशय जास्त संख्येत शरीराबाहेर टाकले जातात. अशा बाबींच्या संपर्काने दूषित झालेल्या वैरण, कुरणे आणि पाण्यातून आजाराचा प्रसार होतो. 
  • निरोगी प्राण्याने बाधित प्राण्याचे जननेंद्रिये चाटल्यानेसुद्धा हा आजार पसरतो. दूषित वीर्याच्या माध्यमातून निरोगी गायी-म्हशींना या आजाराचा प्रादुर्भाव होतो. 
  • दूषित स्त्रावांचे थेंब उडल्याचे डोळ्याच्या श्लेष्म त्वचा, जखमांची आलेल्या संपर्कातून आणि दुधावाटे आजाराचा प्रसार होतो.
  • मातेच्या उदरात गर्भाशायावाटे पिल्लांमध्ये आजार संक्रमित होतो. प्रदुर्भावीत वासरांमध्ये प्रथम गर्भधारणेपर्यंत आजार सुप्तावस्थेत राहतो. अशी जनावरे निरोगी जनावरांसाठी आजाराचे उगमस्थान म्हणून अत्यंत घातक ठरतात. प्रादुर्भावीत जनावर आयुष्यभर बाधित राहते.
  • माणसांमध्ये हा आजार प्रमुख्याने व्यवसायजन्य असून तो पशुपालक, खाटीक आणि पशुवैद्यकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. दूषित दुधाचे अथवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन, प्राण्यांच्या दूषित स्त्रावांचे डोळ्याच्या श्लेष्म त्वचेवर उडालेले थेंब इत्यादी मुळे माणसांत या आजाराचे संक्रमण होते. 
  • प्रमुख लक्षणे 

  • गाभण काळाच्या शेवटच्या काही महिन्यांत गर्भपात होणे हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. मात्र प्रत्येक बाधित गायी-म्हशींमध्ये गर्भपात होईलच असे नाही.  साधारणतः बाधा झाल्यानंतर पहिल्यांदा येणाऱ्या गाभण काळाच्या शेवटच्या काही महिन्यांत गर्भपात दिसून येतो. त्यानंतरच्या गाभण काळात गर्भपात होत नसल्याचे दिसून येते. मात्र इतर लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये कच्ची प्रसूती होणे, अशक्त वासरांचा जन्म होणे, जार अडकणे, दूध उत्पादनात घट होणे ही लक्षणे दिसतात. या आजारात जनावरे इतर आजारांसारखी लक्षणे दाखवीत नाही. 
  • वळू आणि नर प्राण्यांमध्ये या आजाराच्या प्रादुर्भावाने वृषण, अधिवृषण, वीर्य नलिका बाधित होतात. त्या ठिकाणाहून जिवाणू अधून-मधून विर्यात उत्सर्जित होत राहतात. वृषणे दीर्घकाळ सुजतात. त्यामध्ये गळू होतो. प्राण्यांमध्ये सांधे सुजून सांधेदुखी होते.
  • प्रादुर्भावीत मनुष्यामध्ये सतत कणकण जाणवते. ताप सतत कमी जास्त होतो. रात्री घाम फुटतो. वृषणे आणि सांधे सुजतात. डोके, पाठीचा कणा दुखतो. स्त्रियांमध्ये गर्भपात होत नाही.
  • निदान  

  • आजाराची लक्षणे इतर आजारांसारखी नाहीत. लक्षणे दिसण्यास भरपूर कालावधी लागू शकतो. 
  • लक्षणे दाखविणाऱ्या जनावरांची  त्वरित चाचणी करून घ्यावी.  कळपातील सर्व प्राण्यांची वर्षातून दोनदा आर.बी.पी.टी. चाचणी करून घ्यावी. 
  • बाधित आढळलेल्या जनावरांची २१ दिवसांनंतर पुनश्च एकदा  चाचणी करावी. ज्या जनावरांची चाचणी सकारात्मक येईल त्यांचे रक्तजल, रक्त, वीर्य, योनिमार्गातील स्त्राव, गर्भपात झालेले अर्भक आणि जार हे नमुने पक्क्या निदानासाठी प्रयोगशाळेत पाठवावेत. 
  • प्रयोगशाळेत रक्तजलावर इतर चाचण्या, जिवाणू संवर्धन आणि उपलब्ध जनुकीय चाचण्या करून पक्के निदान करता येते. 
  • उपचार आणि प्रतिबंध   

  •  आजारात अनेक प्रतिजैविके प्रभावी ठरतात. मात्र ती दीर्घकाळ वापरावी लागतात. म्हणून बाधित जनावरांवर उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावा. दीर्घकाळ उपचारामुळे उपचारावर जास्त खर्च येतो. हा आजार होऊ नये यासाठी लसीकरण हा चांगला पर्याय आहे. 
  • आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी गर्भपात झालेले अर्भक, जार, स्त्राव खोल खड्डा करून पुरावे अथवा जाळून टाकावे. बाधित जनावरांना त्वरित विलग करावे. त्यांचा उपचार करावा किंवा प्रक्षेत्रावर इतर जनावरांच्या संपर्कात ठेऊ नये. त्यांना सार्वजनिक बाजारात, मेळाव्यात अथवा पशुप्रदर्शनात नेऊ नये. बाधित जनावरांना कळपातून काढून टाकावे.
  • आजारावर जिवंत लसी उपलब्ध आहेत. गायी आणि म्हशींमध्ये बृसेल्ला अबोर्टस कॉटन १९ आणि शेळ्या-मेंढ्यांमध्ये बृसेल्ला मेलीटेन्सीस रेव-१ या लसी वापरतात. मात्र हे लसीकरण मादी वासरां/पिल्लांमध्ये आयुष्यात एकदाच करावे लागते. नर आणि वयस्क माद्यांमध्ये लसीकरण करू नये. 
  • या आजारावरील लसी जिवंत असल्याने त्या देताना पुरेशी दक्षता घ्यावी लागते. लस देताना हातमोजे घालावेत. लस सुईत भरताना थेंब उडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. लसीकरणानंतर  सुई, लसीची कुपी आणि हातमोजे जमिनीत पुरून टाकावेत.
  • आर.बी.पी.टी. चाचणीची पद्धत 

  • आर.बी.पी.टी. चाचणीसाठी रक्तजल आवश्यक असते. ही चाचणी अत्यंत सोपी असून ती गोठ्यात सुद्धा करता येते.
  • एक स्वच्छ काच पट्टी घ्यावी. काचपट्टीवर एक थेंब रक्त जल घ्यावे. त्यावर तेवढेच आर.बी.पी.टी. प्रतीजन द्रावण टाकून एकजीव करावे. 
  • मिश्रणास घड्याळाच्या काट्याप्रमाणे चार मिनिटे फिरवावे. खालील प्रमाणे निदान करावे.
  • मिश्रण एकजीव राहिल्यासः  जनावर बाधित नाही.
  • पाच मिनिटांनंतर सूक्ष्म गुठळ्या तयार झाल्यासः  जनावर बाधित नाही.
  • चार मिनिटांत गुठळ्या तयार झाल्यासः  जनावर बाधित असण्याची शक्यता.
  • संपर्क-  डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९ (पशुवैद्यकीय सूक्ष्म जीवशास्त्र  विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com