आदर्श शेतीफार्म बनले जनावरांचे कुरण

आदर्श शेतीफार्म बनले जनावरांचे कुरण
आदर्श शेतीफार्म बनले जनावरांचे कुरण

पाटण, जि. सातारा  ः काही वर्षांपूर्वी बीजोत्पादनाचा आदर्श असणारे काळोली गावच्या हद्दीतील राज्य शासनाचे कृषी चिकित्सालयातील बीजगुणन प्रक्षेत्र दोन वर्षांपासून वापराविना पडून आहे. सध्या तेथे जनावरे चरत असल्याचे चित्र आहे. शेतीफार्मचा कारभार पाहण्यासाठी शासनाने पदेच भरली नसल्याने ही दुरवस्था झाली आहे. शासनाने तातडीने रिक्त पदे भरून पुन्हा शेतीफार्मला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.  तालुक्‍यातील पारंपरिक शेतीला बगल देऊन शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान राबण्यासाठी ६२ वर्षांपूर्वी काळोली येथे राज्य शासनाने बीजगुणन शेतीफार्म सुरू केले. कऱ्हाड-चिपळूण महामार्गाच्या बाजूला ४७ एकर सुपीक जमिनीत हे शेतीफार्म सुरू केले. यांत्रिकीकरण नसताना या शेतीफार्मसाठी दोन बैल व सर्व शेती अवजारे अशी यंत्रणा उभी केली होती. काळ बदलल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या कार्यालयातील बैलांची जागा यांत्रिकीकरणाने घेतली. पॉवर टिलर, भात लागणी यंत्र, बीज प्रक्रिया युनिट, युरिया ब्रिकेट मशिन अशी नवनवीन तंत्रज्ञानातील अवजारे व यंत्रांच्या साह्याने येथे वेगवेगळे शेती प्रयोग होऊ लागले. जमीन सुपीक असल्याने व कोयना नदीवरून साडेबारा अश्वशक्तीचा पाणीपंपाद्वारे बारमाही पाण्याची सोय उपलब्ध झाल्याने ३२ एकर क्षेत्र लागवडीखाली आले. त्यामुळे परिसर हिरवागार झाला. राहुरी येथील कृषी विद्यापीठातून उसाच्या अनेक जातींचे बीजोत्पादन घेतल्याने पाटणच्या शेतकऱ्याला हक्काने सुधारित बियाणे नाममात्र किमतीत मिळू लागले. आर-२४, इंद्रायणी भात बियाणांची प्रात्यक्षिकेही बघण्यासारखी होती. या कार्यालयाचा कारभार पाहण्यासाठी कृषी अधिकारी वर्ग-दोनचे एक पद व कृषी सहायक, शिपाई, क्‍लार्क व मजूर प्रत्येकी एक अशी पाच पदे होती. मे २०१८ रोजी कृषी पर्यवेक्षक सेवानिवृत्त झाले, कृषी सहायकाची बदली झाली. त्यानंतर या परिसराला अवकळा प्राप्त झाली. पॉवर टिलर, भात लागणी यंत्र, बीज प्रक्रिया युनिट, युरिया ब्रिकेट मशिन अशी यंत्रसामग्री मनुष्यबळाऐवजी गंजू लागली आहे. तरी शासनाकडून बीजगुणन प्रक्षेत्रासाठी तत्काळ पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देत या कार्यालयासह परिसराला गतवैभव प्राप्त करून द्यावे. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख निर्माण करण्यासाठी असणारे हक्काचे कृषी चिकित्सालय द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com