सचिवांनी केलेल्या बदल्यांना पशुसंवर्धनमंत्र्यांची स्थगिती

बदल्यांचे अधिकार संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडेच असतात. गेल्या वर्षीपुरते ते सचिवांकडे दिले होते. परंतु या वर्षी मला न विचारताच सचिवांनी बदल्यांची प्रक्रिया आटोपली. मला अंधारात ठेवण्यात आले. काही तक्रारींनंतर केलेल्या चौकशीत सचिवांनी परस्पर बदल्या केल्याचे समजले. माझ्यासमोर बदल्यांची फाईल पण ठेवली गेली नाही. त्यामुळे या बदल्यांना स्थगिती देऊन अधिकार माझ्याकडे परत घेतले. - महादेव जानकर, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री
महादेव जानकर
महादेव जानकर

नागपूर ः पशुसंवर्धन विभागात करण्यात आलेल्या बदल्यांमुळे सचिव आणि पशुसंवर्धनमंत्री यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. बदली प्रक्रियेत सचिवांनी विश्‍वासात न घेतल्याचा थेट आरोप मंत्र्यांनी करीत सचिवांनी केलेल्या बदल्यांना स्थगिती दिली आहे.  पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनुपकुमार यांच्या आदेशान्वये कोकण, विदर्भातील पशुधन विकास अधिकारी तसेच सहायक आयुक्‍त दर्जा असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्या संबंधीचे आदेश ३१ मे २०१९ रोजी काढण्यात आले. नागपूर विभागातील ३७, कोकण विभागातील १४ पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सहायक आयुक्‍त पशुसंवर्धन (गट-अ) दर्जाच्या १५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचेही आदेश देण्यात आले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्‍त करावे. संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या पदावर हजर झाल्यानंतर लगेचच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासह रुजू अहवाल पशुसंवर्धन आयुक्‍तांकडे देण्याचेही आदेशात म्हटले होते.

उपसचिव विजय चौधरी यांची स्वाक्षरी बदली आदेशावर होती. ही सारी प्रक्रिया पार पडली असताना काही अधिकाऱ्यांनी त्यांना नियुक्‍ती मिळालेल्या ठिकाणाबद्दल नाराजी व्यक्‍त केली. त्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दबावासाठी थेट पशुसंवर्धनमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र या प्रक्रियेबाबत काहीच माहिती नसल्याने बदल्यांबाबत त्यांनी अनभिज्ञता व्यक्‍त केली. त्यानंतर सचिव स्तरावरून बदल्या झाल्याचे कळाल्याने तातडीने हालचाली होत बदल्यांना स्थगिती देण्यात आली. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या पदावर रुजू होण्यासाठी कार्यमुक्‍त करण्यात येऊ नये, असेही बजावण्यात आले. एक जून रोजी नव्याने आदेश काढून ठरावीक वेतन श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार २०१९ या वर्षापुरते पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हे करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com