सिद्धेश्‍वर यात्रेतील जनावर बाजारास आज प्रारंभ

Animal market in Siddheshwar Yatra started today
Animal market in Siddheshwar Yatra started today

सोलापूर : ‘‘ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेच्या निमित्ताने भरवण्यात येणाऱ्या जनावर बाजारास शनिवारपासून (ता. ११) सुरुवात होणार आहे,’’ अशी माहिती जनावर बाजार समितीचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे यांनी दिली. 

या जनावर बाजारात महाराष्ट्रातील मराठवाड्यासह विविध खेड्यांतील व्यापारी जनावरे विक्रीसाठी येणार आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात येथील जनावरेही व्यापारी विक्रीसाठी आणतील. या बाजारात खिलार, गीर, देवणी जातीचे वळू व बैल बाजारात विक्रीस असणार आहेत. तसेच मुरा, पंढरपुरी, जाफराबादी जातीच्या म्हशी घोडेगाव, मेहसाणा येथून विक्रीसाठी आणल्या जाणार आहेत. गाय, शेळ्या, मेंढ्यांचाही बाजार असणार आहे. या वेळी पाच ते सहा हजार जनावरे बाजारात विक्रीसाठी असतील, असा अंदाज आहे. 

या बाजारात जवळपास पाच ते सात कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. बाजारात जनावरे विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सिद्धेश्‍वर देवस्थान मंदिर समितीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मैदानावर प्रत्येक ठिकाणी सायंकाळी विजेची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच टॉवर बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. जनावरांसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधण्यात आला आहे. 

हा जनावर बाजार व्यवस्थित व्हावा, यासाठी सिद्धेश्‍वर यात्रेचे अध्यक्ष बाळासाहेब पटणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. यामध्ये काशिनाथ दर्गोपाटील, मल्लिनाथ कळके, सुभाष मुनाळे, नीलकंठ कोन्हापुरे हे सदस्य असणार आहेत. 

जनावरांसाठी सोई-सुविधा

या जनावर बाजारासोबतच जनावरांसाठी लागणारे दोरखंड, बाशिंग, घुंगरू, चाबूक हे साहित्य तसेच शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांच्या विक्रीची दुकानेसुद्धा बाजारात असणार आहेत. जनावरांसाठी दोन दवाखाने असणार आहेत. त्यामध्ये एक सरकारी, तर दुसरा खासगी दवाखाना राहणार आहे. खासगी दवाखान्यामार्फत जनावरांवर मोफत उपचार व औषधे देण्यात येतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com