नगर जिल्ह्यात घटसर्पाने जनावरे दगावली

सातारा जिल्ह्यातील शेतकरी ऊस बिलाच्या प्रतीक्षेत 
सातारा जिल्ह्यातील शेतकरी ऊस बिलाच्या प्रतीक्षेत 

नगर ः नगर जिल्ह्यामधील तेलकुडगाव (ता. नेवासा) येथे लाळ्या-खुरकूत, घटसर्प या साथीच्या आजाराने पंधरा दिवसांत बारा जनावरांसह दहा शेळ्या दगावल्या आहेत. लसीकरण केले नसल्यामुळे जनावरे दगावल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. जनावरे दगावत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. लसीकरण सुरू असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले असून जनावरे दगावलेल्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेकडून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

जनावरांना घटसर्प, लाळ्या-खुरकूत व अन्य साथीच्या आजाराची लागण होऊ नये यासाठी दरवर्षी लसीकरण केले जाते. घटसर्प, लाळ्या-खुरकुताची याआधी लागण झालेल्या भागाचे अंदाजानुसार लसीकरण केले जाते. घटसर्पाचे लसीकरण हे पावसाळ्याच्या आधीच केले जाते. यंदा मात्र ते झाले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप होत आहे. तेलकुडगाव (ता. नेवासा) येथे गेल्या पंधरा दिवसांच्या काळात नवनाथ गायकवाड यांच्या पाच गाई व दोन शेळ्या, आजीनाथ गायकवाड यांच्या २ गाई, एक म्हैस व चार शेळ्या, अशोक पाटेकर यांची एक गाय, कृष्णा गायकवाड यांची दोन वासरे, दत्तात्रय काळे यांच्या चार शेळ्या दगावल्या आहेत. 

दरम्यान पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भांगरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली. मृत जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर ती घटसर्पाने दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे येथे पशुसंवर्धन विभागाने उपचार सुरू केल्यानंतरही काही जनावरे दगावल्याचा आरोप होत आहे.

‘मी कर्ज काढून अकरा गायी घेतल्या. माझ्या पाच गायी व अन्य शेतकऱ्यांच्या मिळून गावांत सोळा जनावरे दगावली आहेत.’ - नवनाथ गायकवाड, शेतकरी, तेलकुडगाव

‘जिल्हाभरात आत्तापर्यंत तेरा लाख जनावरांना लाळ्या-खुरकुताचे तर सव्वा चार लाख जनावरांना घटसर्पाचे लसीकरण केले आहे. या भागात पूर्वीच्या अनुभवानुसार लसीकरण केले जाते. तेलकुडगाव भागात याआधी अशी जनावरे आढळली नाहीत. जनावरे आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने पुरेपूर काळजी घेतली आहे.’ - डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नगर

‘पशुसंवर्धन विभागाकडून तपासणी केल्यानंतर काही जनावरे दगावली. शेतकऱ्यांचे नुकसान पशुसंवर्धनच्या दुर्लक्षामुळे झाले आहे. त्यांना जिल्हा परिषदेने तातडीने मदत करावी, अशी मागणी स्थायी समितीत केली आहे. - सुनील गडाख, जिल्हा परिषद सदस्य, नेवासा, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com