खते तक्रार निवारण केंद्रे जाहीर करावीत : कृषी संचालक

राज्यात कोणत्याही स्थितीत जादा दराने खत विक्री होणार नाही याची दक्षता खतनिर्मिती कंपन्यांनी घ्यावी. कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी आपापल्या तक्रार निवारण केंद्रांचे क्रमांक देखील जाहीर करावेत.
fertilizer
fertilizer

पुणे ः राज्यात कोणत्याही स्थितीत जादा दराने खत विक्री होणार नाही याची दक्षता खतनिर्मिती कंपन्यांनी घ्यावी. कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी आपापल्या तक्रार निवारण केंद्रांचे क्रमांक देखील जाहीर करावेत, अशा सूचना कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिल्या आहेत. 

खत कंपन्यांचे अधिकारी व कृषी सेवा केंद्रचालकांच्या प्रतिनिधींसोबत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे शुक्रवारी (ता. २१) तातडीने बैठक घेतली. या वेळी आयुक्तांनी दिलेल्या सूचनांची माहिती देणारे पत्र निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक श्री. झेंडे यांनी खत कंपन्यांना पाठविले आहे. 

‘‘खतांच्या सुधारित दरपत्रकाची माहिती कंपन्यांनी तातडीने आयुक्तालय, ‘माफदा’ व आपापल्या खत विक्रेत्यांनाही द्यावी. सुधारित दराची माहिती देणाऱ्या जाहिराती वर्तमानपत्रांमधून द्याव्यात व त्याची प्रत आयुक्तालयाला पाठवावी,’’ असे संचालकांनी पत्रात म्हटले आहे. 

खत कंपन्यांचा सध्या विक्रेत्यांकडे असलेल्या साठ्याची व २० मेनंतर विकल्या जाणाऱ्या मालाच्या दरपत्रक तपशिलासह माहिती आयुक्तालय, ‘माफदा’ व विक्रेत्यांना पाठवावी, सुधारित किमतीचा फलक प्रत्येक विक्रेत्याने दुकानाच्या दर्शनी भागात लावावा, असेही कंपन्यांना सांगण्यात आले आहे. 

जादा दराने खत विक्री झाल्यास गुणनियंत्रण विभागाकडून कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील खत कंपन्यांचे प्रतिनिधी व खत विक्रेता संघटनेच्या प्रतिनिधींनी देखील शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याकरिता दक्षता घ्यावी, असेही संचालकांनी पत्रात नमूद केले आहे. 

शेतकरी गटाच्या प्रमुखाने खताची मागणी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या नावे कृषी सेवा केंद्रावर स्वतंत्र पावती तयार करावी लागेल. शेतकरी स्वतः केंद्रावर आल्यास त्याचा आधार क्रमांक किंवा बोटाचा ठसा घेत पावती तयार करावी. शेतकरी दुकानात उपस्थित नसल्यास शेतकऱ्यांना ओटीपीबाबत माहिती द्यावी व त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन मशिन त्या शेतकऱ्याच्या नावाने पावती तयार करावी, असे श्री. झेंडे यांनी सूचित केले आहे.  ‘पॉस’ मशिनला टाळू नका  दरम्यान, संचालक श्री. झेंडे यांनी राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना बांधावर खत पुरवठ्याबाबत सूचना दिल्या आहेत. “बांधावर खतपुरवठा योजनेत कोणत्याही स्थितीत पॉस मशिनला किंवा संगणक आज्ञावलीला टाळून खतांची खरेदी करण्यात येऊ नये,” असे सांगण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com