‘जीआय’प्राप्त उत्पादनांच्या ब्रँडिंगवर ‘अपेडा’कडून भर; राज्यांकडून माहिती संकलित

देशभरातील २४ राज्यांमधील उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले आहे. या उत्पादनांना जागतिक पातळीवर ओळखून मिळवून देण्यासह विपणन साखळी मजबूत करण्यासाठी ‘अपेडा’कडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
‘जीआय’प्राप्त उत्पादनांच्या ब्रँडिंगवर ‘अपेडा’कडून भर
‘जीआय’प्राप्त उत्पादनांच्या ब्रँडिंगवर ‘अपेडा’कडून भर

नाशिक : भारतीय शेतीमाल व खाद्यपदार्थांना जगभर मोठी मागणी आहे. याच अनुषंगाने देशभरातील २४ राज्यांमधील उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले आहे. त्याची ‘अपेडा’कडून नोंदणी झाली असून उत्पादनांना जागतिक पातळीवर ओळखून मिळवून देण्यासह विपणन साखळी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी ‘अपेडा’ने ब्रँडिंग करण्यावर भर दिला आहे.

‘अपेडा’ने संकलित केलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशभरात १०० च्या जवळपास शेतमाल व खाद्यपदार्थांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत ओळख निर्माण करून देण्याचा मार्ग या उत्पादनांसाठीही आता खुला झाला आहे. त्यानुसार त्या त्या भागातील लहानातील लहान उत्पादकांना कसा फायदा करून देता येईल यासाठी ‘अपेडा’च्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक मानांकने महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व पश्‍चिम बंगाल राज्यात आहेत. यासंबंधी धोरण निश्‍चित करण्यासाठी दोन बैठका झालेल्या आहेत. तसेच विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून राज्याच्या शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी राज्याच्या कृषी विभागाची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून मोठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

...असे होतेय ब्रँडिंग फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून राज्यनिहाय उत्पादनांचे वेगळेपण, भौगोलिक स्थान यांची थोडक्यात आशयपूर्ण माहिती चित्रांसह मांडणी करून प्रचार-प्रसिद्धी सुरू आहे. ब्रँडिंगबाबत जनजागृती करणे, परदेशातील खरेदीदारांना उपलब्ध उत्पादनाची माहिती व गुणवैशिष्ट्ये पटवून देणे, तसेच निर्यातदारांच्या माध्यमातून शेतीमालाच्या पॅकिंगवर व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रतिक्रिया राज्यनिहाय भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनाची माहिती संकलित करून ती ‘अपेड’च्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. या अनुषंगाने केंद्रासोबत बैठका झाल्या असून, जागतिक आयातदार व देशातील निर्यातदार यांच्यासोबत नवीन संधींबाबत पाठपुरावा करून कामकाज ठरविले जाणार आहे. या उत्पादनाचे ब्रँडिंग हा मुख्य हेतू आहे. - प्रशांत वाघमारे, सहायक महाव्यवस्थापक, ‘अपेडा’ विभागीय कार्यालय, मुंबई  

राज्यनिहाय ‘जीआय’प्राप्त उत्पादने
राज्य एकूण ‘जीआय’. उत्पादने
आंध्र प्रदेश तिरुपती लाडू, गुंटूर सम्मन मिरची, बंदर लाडू, बंगनपल्ली आंबा
अरुणाचल प्रदेश अरुणाचल संत्रा
आसाम आसाम चहा, आसाम कार्बी अद्रक, तेजपूर लीची, जोहा तांदूळ
दिल्ली बासमती
गुजरात गीर केसर आंबा, भालिया गहू
हरियाना बासमती
हिमाचल प्रदेश कांगरा चहा, बासमती
जम्मू आणि काश्मीर बासमती
कर्नाटक १६ कुर्ग संत्रा, मैसूर नागवेली पान, नंजना गुड केळी, मैसूर मोगरा, उडपी मोगरा, हडगली मोगरा, मॉन्सून मलबार अरेबिक कॉफी, मॉन्सून मलबार रोबुस्ता कॉफी, कुर्ग हिरवा वेलदोडा, देवननल्ली पपनस, अप्पेमिडी आंबा, कमलापूर लाल केळी, बिडगी मिरची, उडपी मट्टूगुल्ला वांगी, बंगळूर काळी द्राक्ष, बंगळूर गुलाबी कांदा
केरळ ११ नवरा भात, पलक्कडम मट्टा तांदूळ, मलबार मिरे, अलाप्पी हिरवे वेलदोडे, पोक्कली तांदूळ, वाझकुल्लम अननस, मध्य त्रावणकोर गूळ, जिराकसाला वायनाड तांदूळ, वायनाड गंधकसाला तांदूळ, कैपड तांदूळ, चेंगलीकोडन नेंद्रन केळी
महाराष्ट्र २२ नाशिक द्राक्ष, कोल्हापूर गूळ, नागपूर संत्रा, आजरा घनसाळ तांदूळ, मंगळवेढा ज्वारी, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कोकम, वाघ्या घेवडा, नवापूर तूरडाळ, वेंगुर्ला काजू, लासलगाव कांदा, सांगली बेदाणा, बीड सीताफळ, जालना मोसंबी, वायगाव हळद, पुरंदर अंजीर, जळगाव भरीत वांगी, सोलापूर डाळिंब, भिवापूर मिरची, आंबेमोहोर तांदूळ, डहाणू घोलवड चिकू, जळगाव केळी, मराठवाडा केसर आंबा
मणिपूर कचाई लिंबू
मेघालय खासी मंदारीन संत्रा, मेमोंग नारंग संत्रा
मिझोराम मिझो मिरची
नागालॅन्ड नागा मिरची, नागा ट्री टोमॅटो
ओडीशा गंजम केवडा, गंजम केवडा फुल
पंजाब बासमती
राजस्थान बिकानेरी भुजिया
सिक्कीम सिक्कीम वेलदोडे
तमिळनाडू इथोमोन्झी उंच नारळ, निलगिरी, पिरुपक्षी हिल केळी, सिरुमलई हिल केळी, मदुराई मल्ली मोगरा
त्रिपुरा त्रिपुरा क्वीन अननस
उत्तर प्रदेश अलहाबाद सुरखा पेरू, मलिहाबादी दशेहरी आंबा, कालानमक भात, बासमती
उत्तराखंड उत्तराखंड तेजपान
पश्‍चिम बंगाल दार्जिलिंग चहा, लक्ष्मणभोग आंबा, हिमसागर आंबा, फझली आंबा, ज्योनगर मावा, बर्धमान सीताभोग, बर्धमान मिहीदाना, गोबिंदभोग तांदूळ, तुलाईपंजी तांदूळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com