पर्याय न देताच मुंबई-पुणे बाजार समित्या बंद; शेतकऱ्यांची कोंडी

लॉकडाऊन आणखी किती वाढणार आहे, याची चिंता नागरिकांना आहे. अशातच लहान लहान घरांमध्ये पत्र्यांच्या दाटीवाटीच्या लोकवस्तीमध्ये लोक राहत आहेत. त्यांना खायला मिळाले नाहीतर ते उद्वीग्न होऊन रस्त्यावर उतरतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईलआणि लॉकडाऊनचा सगळाच फज्जा उडेल. अशा परिस्थितीमध्ये बाजार समित्या बंद करणे हे आततायी पणाचे ठरेल. एखाद्या ठिकाणी हॉटस्पॉट तयार झाला असेल, तर भाजीपाला वितरणाची पर्यायी प्रभावी योजना प्रशासनाने आखल्यानंतरच बाजार समित्या बंद करणे योग्य राहील. - रघुनाथदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना.
pune apmc
pune apmc

पुणे/मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई सारख्या महत्वाच्या महानगरांना फळे-भाजीपाला पुरविणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्याच बंद केल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. पर्यायी व्यवस्थेचा विचार न करता आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांसह शेतकरी नेते, संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपत्ती काळातही या शहरांत सुरळित सुरू असलेली शेतीमाल बाजार व्यवस्था अचानक बंद केल्याने हजारो क्विंटल भाजीपाला व फळांचे करायचे काय, असा प्रश्‍न उत्पादकांना पडला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळित ठेवण्याच्या जनतेला दिलेल्या आश्वासनाचे काय, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.  कोरोना विषाणू संसर्गानंतर देशात लागू झालेल्या लॉकडाऊनचा आज १८ वा दिवस आहे. केंद्र सरकारने भाजीपाला, फळे, दुधासह इतर अनेक कृषी सेवा संचारबंदीतून वगळल्या आहेत. मात्र, या अठरा दिवसांत अत्यावश्‍यक सेवा म्हणून सुरू असलेल्या फळे-भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांनी इतर सेवार्थींप्रमाणे सर्वस्व पणाला लावून शहरांत भाजीपाला पुरवठ्याचे नियोजन केले. कृषी विभाग, पणन विभाग, परिवहन, पोलीस, जिल्हा प्रशासन आदी विभागांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर या पुरवठ्यात शिस्त आणि सातत्य आणण्याचा प्रयत्न यशस्वी होत होता. पुण्यात पुरवठ्यातील गर्दी टाळण्यात यश आले. मुंबईतही नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, या दरम्यान वाढत्या संसर्गाचे कारण देऊन कोणताही पर्याय न देता अचानक बंद पुकारल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.  काही शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट तसेच काही प्रमाणात शेतकऱ्यांमार्फत थेट भाजीपाला विक्रीचे प्रयोग सुरू आहेत. पण या महानगरांचा आकार लक्षात घेता ते तुटपुंजे आहेत, याकडे या क्षेत्रातील तज्ञ लक्ष वेधत आहेत. अशा स्थितीत बाजार समित्यांमार्फत सुरू असलेली शहरांची भाजीपाला पुरवठा साखळी बंद पडली तर प्रशासनाला येत्या काळात नागरिकांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे चित्र आहे.     उपबाजार आवारही बंद..! शुक्रवारी (ता.१०) मुख्य बाजार आवारासह शहरातील खडकी, मांजरी, उत्तमनगर आणि मोशी उपबाजार देखील बंदची घोषणा विभागीय आयुक्तांनी केल्याने शेतमाल वितरणावर आणखी मर्यादा येणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.   बाजार समित्या सुरू ठेवाव्यात : पणनमंत्री पाटील राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील या स्थितीबाबत म्हणाले, ‘‘पुणे शहरात कोरोनाचे संकट गडद होत आहे. गुलटेकडी परिसर हॉटस्पॉट जाहिर केल्याने बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, उपबाजार सुरु ठेवण्यात आले होते. तर गर्दीमुळे हेही बाजार बंद करण्याचे विभागीय आयुक्तांनी जाहीर केल्याचे समजले. नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने प्रशासन या पातळीवर आले आहे. मात्र याही परिस्थितीत शेतमालाला बाजारपेठ आणि शहरातील भाजीपाला पुरवठा सुरळीत राहण्यासाठी थेट पणन सारख्या उपाययोजना कृषी आणि पणन विभागाच्या वतीने सुरु आहेत. राज्यातील बाजार समित्यांमधील अडत्यांनी आणि शेतकऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधत बाजार समित्या सुरू ठेवाव्यात, असे आवाहन मी करत आहे.‘‘ बाजार समित्या सुरू ठेवाव्यात : पणनमंत्री पाटील राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील या स्थितीबाबत म्हणाले, ‘‘पुणे शहरात कोरोनाचे संकट गडद होत आहे. गुलटेकडी परिसर हॉटस्पॉट जाहिर केल्याने बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, उपबाजार सुरु ठेवण्यात आले होते. तर गर्दीमुळे हेही बाजार बंद करण्याचे विभागीय आयुक्तांनी जाहीर केल्याचे समजले. नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने प्रशासन या पातळीवर आले आहे. मात्र याही परिस्थितीत शेतमालाला बाजारपेठ आणि शहरातील भाजीपाला पुरवठा सुरळीत राहण्यासाठी थेट पणन सारख्या उपाययोजना कृषी आणि पणन विभागाच्या वतीने सुरु आहेत. राज्यातील बाजार समित्यांमधील अडत्यांनी आणि शेतकऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधत बाजार समित्या सुरू ठेवाव्यात, असे आवाहन मी करत आहे.‘‘ शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले प्रश्‍न...

  • आत्ता आहे त्या भाजीपाला, फळांचे करायचे काय?
  • शहरांत शेतमाल विक्रीची पर्यायी व्यवस्था होणार का?
  • यापुढे आम्ही शहरांकरिता भाजीपाला लागवड करावी का?
  • होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे आणि भरपाईचे काय?
  • थेट विक्रीचे माध्यम आवाक्याच्या तुलनेत अत्यंत तोकडे, मग करावे काय?
  • प्रतिक्रिया कोरोनामुळे राज्यातील भाजीपाला उत्पादकांचे नुकसान होत आहे. आता मोठ्या बाजारपेठा बंद असल्याने स्थिती आणखी बिकट झाली आहे. सरकारने भाजीपाला विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था केलेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी शेतीमालाला उठाव नसल्याने शेतातच भाजीपाला काढून फेकला आहे. कोबी, वांगी, ढोबळी मिरची, फ्लॉवर, टोमॅटो या भाज्या तसेच झेंडू, जरबेरा, गुलाब, कार्नेशिया, निशिगंध फुलांचा सडा शेतातच पडला आहे. या सर्व पिकांची तातडीने पंचनामे करावे. कोणत्याही भाजीपाल्याला उठाव नाही, यामुळे दर पडलेले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी माल नेण्यास असमर्थता दर्शवली आहे. हरभरा, तूर, गहू, कापूस यांची कापणी सुरू आहे. परंतु व्यापारी हमीभावापेक्षा कमी किंमतीने खरेदी करत आहेत. एकीकडे ग्राहकांना १०० ते ११० रूपये किलोने तूरडाळ खरेदी करावी लागत आहे. शेतकऱ्यांकडून मात्र व्यापारी ४० रूपये किलोने तूर खरेदी करत आहेत. यावर त्वरीत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.  — राजू शेट्टी, माजी खासदार. सरकारच्या या निर्णयामुळे फळे, भाजीपाला व फळभाज्या अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. दुसरीकडे साथीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती तंदुरुस्त रहावी यासाठी ताजी फळे, फळभाज्या व पालेभाज्या यांचा आहारात समावेश असावा अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. बाजार समित्या बंद केल्यामुळे हा आहार शहरी ग्राहकांना न मिळाल्याने त्यांच्या रोग प्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होणार आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्राहकांना सहाय्यता व्हावी यासाठी शासनाच्या कृषी, सहकार व पणन या विभागांमार्फत शेतीमाल खरेदी व वितरणाची पर्यायी व्यवस्था उभी करावी. शेतकऱ्यांकडून तालुका स्तरावर शेतीमाल खरेदी करून नगर पालिका व  नगर परिषदांच्या मार्फत शहरातील हौसिंग सोसायट्यांच्या मदतीने हा माल ग्राहकांपर्यंत पोहचावा व शेतकरी आणि ग्राहकांचे नुकसान टाळावे. - डॉ. अजित नवले, सरचिटणीस, किसान सभा राज्यातील प्रमुख बाजार समित्या बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शहरात भाजीपाला फळे विकण्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यावर पर्याय म्हणून शहरातील लोकांना शेतात येऊन एकत्रीत भाजीपाला, फळे खरेदी करता येतील. त्यांना प्रशासनाने सहकार्य करावे. सरकारने काही पर्यायी व्यवस्था करताना वाहतुक साधने उपलब्ध करावीत आणि पोलिसांचा शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करावा. वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते पास उपलब्ध करून द्यावेत.  - अनिल घनवट,  प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना ‘‘बाजार समिती ज्या परिसरात आहे त्या परिसरातील दाट लोकवस्तीमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने हा परिसर पोलीस आणि पालिका प्रशासनाने बंद केला आहे. या दाट लोकवस्तीमधील नागरिकांचा बाजार समितीमध्ये वावर असल्याने कामगार आणि अडत्यांनी बाजार बंद करण्याची मागणी बाजार समिती प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार बाजार समिती बंद करण्याचा निर्णय समितीने घेतला असला तरी, शहरातील भाजीपाला पुरवठा सुरळीत राहण्यासाठी मोशी आणि मांजरी उपबाजार सुरू ठेवण्यात आले होते. मात्र वाढत्या गर्दीमुळे विभागीय आयुक्तांनी उपबाजार देखील बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वच बाजार बंद झाल्यानंतर आता फळे भाजीपाला नियनममुक्तीमुळे अनेक शेतकरी आणि उत्पादक कंपन्या थेट फळे भाजीपाला विक्री विविध गृहनिर्माण संस्थांद्वारे करत आहेत. सहकार विकास महामंडळाने देखील थेट विक्रीची व्यवस्था उभारत असून, कृषी विभागाला किरकोळ भाजीपाला विक्री व्यवस्थेसाठी नोडल एजन्सी म्हणून शासनाने घोषित केले आहे. ते देखील विविध उपाययोजना करत आहेत. या विविध उपयोजनांद्वारे शेतमालाच्या उठावासह शहरातील भाजीपाला पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न आहेत. झोमटो, बिग बास्केट, व्हेज बास्केट आदी ऑनलाइन पोर्टल द्वारे भाजीपाला विक्री वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.‘‘  - सुनील पवार, पणन संचालक 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com