आश्‍वासनानंतर बाजार समिती कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन मागे

आमच्या कष्टाचा विचार होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार. सरकारने आश्‍वासनाची पुर्तता करावी. - दिलीप डेबरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ
बाजार समिती कर्मचारी आंदोलन
बाजार समिती कर्मचारी आंदोलन

नाशिक : शासन सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील बाजार समिती कर्मचाऱ्यांनी (ता. २८) बंद महाराष्ट्रभर पुकारला होता. त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील ४००० बाजार समिती कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलनासाठी आझाद मैदान, मुंबई येथे जमले होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.  शासनाच्या बाजार समितीच्या आर्थिक हिताविरोधातील निर्णयामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. यामुळे बऱ्याच बाजार समित्यांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बिकट झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासनसेवेत घेऊन त्यांना दिलासा देण्याची मागणी गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित आहे. याच मागणीसाठी राज्यातील सर्व बाजार समितीचे कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे सुरू केले होते. महाराष्ट्रभरातून ३०६  बाजार समित्यांचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. बाजार समित्या स्थापन झाल्यापासून हे पहिले धरणे आंदोलन ठरले.  राज्यातील बाजार समित्यांमध्ये ६८७७ कर्मचारी कायम, हंगामी व रोजंदारी तत्त्वावर काम करतात. मात्र वेळेवर पगार नाही, पगाराची हमी नाही तसेच वेळोवेळी असणारा व्यापारी व राजकीय दबाव यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. ही सर्व परिस्थिती असून, कर्मचारी शेतकऱ्यांच्या सेवेत रात्रंदिवस कार्यरत आहेत. शासनाच्या ई-नाम, शेतीमाल तारण योजना, आधारभूत खरेदी केंद्र यांसारख्या विविध उपक्रमांसाठी कर्मचारी सेवेत असतात. मात्र त्यांना नेहमी डावलले जाते, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.  मात्र गुरुवारी सायंकाळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलनस्थळी भेट दिली व बाजार समिती कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. ‘‘आपले प्रश्न मुख्यमंत्री यांच्याकडे मांडण्यात येतील, पुढील आठवड्यात पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत घडवून आणली जाईल, व तुमचे प्रश्न सोडविले जातील,’’ असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com