फवारणीदरम्यान सतर्कतेचे आवाहन

फवारणीदरम्यान सतर्कतेचे आवाहन
फवारणीदरम्यान सतर्कतेचे आवाहन

यवतमाळ ः फवारणीदरम्यान होणाऱ्या विषबाधा टाळण्यासाठी आवश्‍यक त्या पूरक आणि शिफारशीत उपाय योजनांचा अवलंब करण्याचे आवाहन वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाने केले आहे. जुलै ते ऑक्टोबर या काळात फवारणीचे कामे केली जातात. त्या पार्श्‍वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे. फवारणीदरम्यान विषबाधा होत यवतमाळ जिल्ह्यात २०१६ ते २०१७ या कालावधीत १९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाकडून ही बाब गंभीरतेने घेत व्यापक जनजागृती करण्यात आली. त्याच्या परिणामी २०१८ मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे शासकीय रुग्णालयाकडून सांगण्यात आले.  फवारणीमुळे विषबाधा ही शरीरावर फवारणीचे पाणी सांडल्यामुळे किंवा डोळ्यांमध्ये गेल्यामुळे किंवा श्‍वसनाद्वारे विषबाधा होऊ शकते. मोनोक्रोटोफॉस, प्रोफेनोफॉस, क्‍विनालफॉस, ॲसीफेट, डायमोथेएट, डायक्‍लोरोफॉस या कीडनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. फवारणी करणाऱ्या व्यक्‍तीने पायांमध्ये गमबूट, हातमोजे, तोंडावर मास्क व पूर्ण शरीर झाकेल असा कोट घालावा तसेच चष्म्याचा वापर करावा शेतात फवारणी करणाऱ्या व्यक्‍तीने मद्यप्राशन करू नये किंवा तंबाखू खाऊ नये. फवारणी करणाऱ्यांनी जेवणाच्या अगोदर हात साबणाने किंवा डेटॉलने धुवावे. फवारणी करण्यापूर्वी पंपाची तपासणी करावी. पंप गळत असल्यास दुरुस्त करून घ्यावा, फवारणीचे मिश्रण नियमानुसार ठरवून दिल्याप्रमाणेच करावे, प्रतिबंधित केलेली कीटकनाशके व तणनाशके फवारणीसाठी वापरू नये, अशा प्रकारच्या सूचनाही शासकीय रुग्णालय प्रशासनाने केल्या आहेत. फवारणी करणाऱ्या व्यक्‍तीला कधीही मळमळ, उलटी, पातळ संडास, चक्‍कर येणे असा त्रास जाणविल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत उपचार करून घ्यावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार व प्रा. डॉ. बाबा येलके यांनी केले आहे. 

वर्षनिहाय विषबाधेमुळे झालेले मृत्यू 

२०१६ ०६
२०१७ १३
२०१८ शून्य

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com