कांदा अनुदानासाठी १५ जानेवारीपर्यंत करता येईल अर्ज 

कांदा अनुदानासाठी १५ जानेवारीपर्यंत करता येईल अर्ज 
कांदा अनुदानासाठी १५ जानेवारीपर्यंत करता येईल अर्ज 

औरंगाबाद : शासनाने कांदा उत्पादकांना जाहीर केलेल्या प्रतिक्‍विंटल २०० रुपये अनुदानासाठी १५ जानेवारीपर्यंत बाजार समितीकडे अर्ज करता येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया २१ जानेवारीपर्यंत पूर्ण करून या विषयीच्या समितीला तसा अहवाल पणन संचालकांना कळवावा लागणार आहे. 

राज्य शासनाने १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान आपल्या कांद्याची विक्री करणाऱ्या उत्पादकांना २०० रुपये प्रतिक्‍विंटल अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुषंगाने अंमलबजावणी करण्यासाठी २९ डिसेंबरला पणन संचालक दीपक तावरे यांच्या स्वाक्षरीसह पत्र प्रत्येक बाजार समित्यांना पाठविण्यात आले आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान विकलेल्या कांद्याला शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत बाजार समितीकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागणार आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीने अर्जासोबत कांदा विक्री पट्‌टीची मूळ प्रत, कांदा पीक पेरा असलेला सातबारा, शेतकऱ्याच्या बॅंक खात्याच्या पहिल्या पानाची प्रत आयएएससी कोड व अकाउंट नंबरसह जोडणे आवश्‍यक आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी अचूक तयार करण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. बाजार समित्यांमध्ये जसजसे अर्ज सादर होतील तसतसे त्या अर्जाची छाननी निर्धारीत केलेल्या समित्यांना करावी लागणार आहे. त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्यांचे गठण करण्यात आले आहे. 

जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून त्यामध्ये जिल्हा विशेष लेखा परीक्षक सदस्य तर सहायक निबंधक प्रशासन सदस्य सचिव असतील. तालुकास्तरीय समिती तालुका सहायक निबंधकाच्या अधक्षतेखाली राहणार असून तालुका लेखा परीक्षक त्याचे सदस्य तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव समितीचे सचिव आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बाजार समित्यांना स्वतंत्र कांदा अनुदान कक्ष स्थापन करावा लागणार आहे. 

तर जिल्ह्यातील कोणताही पात्र कांदा उत्पादक अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा उपनिबंधकांना घ्यावी लागणार आहे. तालुकास्तरीय समितीने छाननी करून प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे पाठविल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांना पात्र लाभार्थ्यांची संख्या, त्याची आवक व होणारी रक्‍कम याबाबद स्वतंत्रपणे मंजुरीचे आदेश काढावे लागणार आहेत. असे आदेश काढल्यानंतर संपूर्ण माहिती पणन संचालकांच्या कार्यालयाला २१ जानेवारीपूर्वी सादर करावे लागणार असल्याची माहिती औरंगाबाद बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com