‘पोकरा’तील यांत्रिकीकरणाचे होल्डवरील अर्ज होणार मोकळे

POCRA project
POCRA project

अकोला ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मार्गदर्शक सूचना नसल्याने आजवर होल्ड असलेले शेतकऱ्यांचे अर्ज आता मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला. पोकरा प्रकल्पातील या घटकाच्या अंमलबजावणीसाठी मंगळवारी (ता.चार) मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. २८ जानेवारीच्या अंकात ‘अॅग्रोवन’मध्ये याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तातडीने दखल घेत मार्गदर्शक सूचना काढण्यात आल्या.  पोकरा प्रकल्पात यांत्रिकिकरण घटकाचा गेल्या डिसेंबरमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी प्रकल्प राबविल्या जात असलेल्या १५ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी अर्जही दाखल केले आहेत. याबाबत अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शक सूचना नसल्याने अधिकारी, कर्मचारी संभ्रमात होते. यामुळे कुणीही अर्ज मंजुर करण्याची प्रक्रीया केली नाही. सर्व अर्ज होल्ड ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. या प्रकल्पात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, महिला व दोन हेक्टरपर्यंत जमीन धारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच दोन ते पाच हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे अर्थसहायाचे प्रमाण निर्धारीत केले आहेत.  ट्रॅक्टरसाठी दोन हेक्टरपर्यंत जमीन धारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ५० टक्के किंवा सव्वा लाख यापैकी कमी असेल ते आणि दोन ते पाच हेक्टरपर्यंत जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ४० टक्के किंवा एक लाख यापैकी कमी असेल ते अनुज्ञेय राहील असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.  मार्गदर्शक सूचना आल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण घटकाच्या अंमलबजावणीबाबत चित्र स्पष्ट झाले आहे. कुठल्या घटकाने काय जबाबदारी पार पाडावी याबाबतही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. पोकरा प्रकल्पात निधी असूनही तो योग्य प्रमाणात खर्च होत नसल्याची सर्वत्र ओरड आहे. किमान या घटकाबाबत जारी झालेल्या सूचनांमुळे आता शेतकऱ्यांना फायदा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, असे म्हटले जात आहे.  ही यंत्रे खरेदी करता येतील  पोकरात समाविष्ट केलेल्या या घटकाचा उद्देश हा हवामान बदलाच्या काळात शेतकऱ्याला स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी लागणाऱ्या सुविधा पुरविण्याचा आहे. योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवरटिलर, स्वयंचलित यंत्रे, रीपर, स्वयंचलित फलोत्पादन यंत्रे, सोईंग, प्लांटिंग, रीपिंग व डिगिंग इक्विपमेंट, इंटरकल्टिव्हेशन इक्विपमेंट, इक्विपमेंट फॉर रेसीड्यू मॅनेजमेंट अशी विविध प्रकारची यंत्रे या प्रकल्पातून शेतकऱ्यांना घेता येऊ शकतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com