पुणे जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन योजनेसाठी साडेतीन हजारांवर अर्ज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे आणि पाण्याच्या कार्यक्षम वापरातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविण्यासाठी चालू वर्षी केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेकरिता जिल्हाभरातून चालू वर्षी ३५४२ अर्ज दाखल झाले आहे. त्यासाठी सरकारकडून ११ कोटी ३ लाख १७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. 

पुणे जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी ई-ठिबक या आज्ञावलीचा उपयोग बंधनकारक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या  www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावरील ई-ठिबक या आज्ञावलीचा उपयोग करावा. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून प्रणालीद्वारे सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत संच बसविणे आवश्यक आहे.

कृषी विभागाने नोंदणीस मान्यता दिलेली सूक्ष्म सिंचन उत्पादक कंपनी किंवा शेतकऱ्यांच्या पसंतीच्या सूक्ष्म सिंचन संच उत्पादक कंपनीकडून संचाची उभारणी करून कार्यान्वित करून घ्यावा. सूक्ष्म सिंचन संच कार्यन्वित झाल्यावर बिल इनव्हाइस ई-ठिबक आज्ञावलीवर अपलोड करावा. तसेच अनुदान मागणीचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयास पाठवावा. लाभार्थी शेतकऱ्यांनी पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत सूक्ष्म सिंचन संच न बसविल्यास, त्याची पूर्वसंमती संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप रद्द होईल. ज्या लाभार्थ्यांची पूर्वसंमती रद्द होईल, त्यांनी नव्याने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.   

या योजनेसाठी जिल्ह्यात चालू वर्षी १७ सप्टेंबरपर्यंत तीन हजार ५४२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी तीन हजार ११४ लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. यामध्ये शिरूरमधून सर्वाधिक ७७० अर्ज दाखल झाले आहेत. दौंडमधून ६६९, आंबेगावमधून ४९६, जुन्नरमधून ४१३ अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठी ११ कोटी ६ लाख ५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यापैकी ११ कोटी ३ लाख १७ हजार रुपयांचा निधी तालुका स्तरावर वितरित केला आहे. यंदा अर्ज केलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ तर इतर भूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com