आंबिया बहरासाठी फळ पीकविमा लागू

कृषी विभागाने आंबिया बहराकरिता राज्यातील ९ फळपिकांसाठी हवामान आधारित फळ पीकविमा योजना लागू केली आहे. विमा कंपन्या व अर्ज भरण्यासाठी अंतिम तारखादेखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
Apply fruit crop insurance for Ambia deaf
Apply fruit crop insurance for Ambia deaf

पुणे ः कृषी विभागाने आंबिया बहराकरिता राज्यातील ९ फळपिकांसाठी हवामान आधारित फळ पीकविमा योजना लागू केली आहे. विमा कंपन्या व अर्ज भरण्यासाठी अंतिम तारखादेखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत. 

२०२१-२२ मधील आंबिया बहराच्या विमा योजनेत डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी ही पिके असतील. ३० जिल्ह्यांमधील फळपिकांना लागू असलेल्या या योजनेत सहभागासाठी सक्ती नसेल. मात्र सहभाग होणार किंवा नाही होणार याबाबत संबंधित फळ उत्पादक शेतकऱ्याला एक घोषणापत्र आपले पीककर्ज खाते किंवा किसान क्रेडिट कार्ड खाते असलेल्या बॅंकेत जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबतचे घोषणापत्र सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला देणे बंधनकारक आहे. 

अन्यथा, बॅंक थेट कर्जखात्यातून विमाहप्ता परस्पर कापणार आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिके घेणाऱ्या सर्व शेतकरी तसेच कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. एका शेतकऱ्यास मृग व आंबिया बहर मिळून कमाल चार हेक्टरचा विमा काढता येईल.   

सर्वाधिक विमा संरक्षण द्राक्षाला  आंबिया बहरात सर्वाधिक विमा संरक्षित रक्कम द्राक्षाची असून, ती ३.२० लाख रुपये इतकी आहे. प्रत्येक फळनिहाय विमा संरक्षण रक्कम व योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत अशी ः (कंसातील रक्कम गारपिटीपासून मिळणाऱ्या विमा संरक्षणाची आहे. मात्र त्यासाठी जादा विमाहप्ता भरावा लागणार आहे.) द्राक्ष ः ३.२० लाख रुपये, १५ ऑक्टोबर (१०६६६ रुपये), मोसंबी ः ८० हजार, ३१ ऑक्टोबर (२६६६७), केळी ः १.४० लाख, ३१ ऑक्टोबर (४६६६७), पपई ः ३५ हजार, ३१ ऑक्टोबर (११६६७), संत्रा ः ८० हजार, ३० नोव्हेंबर (२६६६७), ८० हजार, ३० नोव्हेंबर (२६६६७), काजू ः एक लाख, ३० नोव्हेंबर (३३३३३), आंबा कोकण ः १.४० लाख, ३० नोव्हेंबर (४६६६७), आंबा कोकण ः १.४० लाख, ३१ डिसेंबर (४६६६७), डाळिंब ः १.३० लाख, १४ जानेवारी २०२२ (४३३३३), स्टॉबेरी ः २ लाख, १४ ऑक्टोबर (६६६६७). अर्थात, शेतकऱ्यांनी भरावयाचा प्रत्यक्ष विमाहप्ता जिल्हानिहाय वेगवेगळा असू शकतो, असे कृषी विभागाच्या म्हणणे आहे.

संकेतस्थळांचा अभ्यास करावा  शेतकऱ्यांना या विमा योजनेत सहभागी होताना अभ्यासासाठी विविध संकेतस्थळे उपयुक्त ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या https://pmfby.gov.in संकेतस्थळावर विमा नोंदणी करता येईल. तसेच ई-सेवा केंद्र किंवा बँकांमार्फतदेखील सहभाग नोंदवता येईल. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई फक्त हवामान धोके (वेदर ट्रिगर्स) लागू झाले तरच मिळणार आहेत. त्यामुळे हवामान धोके नेमके कोणते, विमा संरक्षित रक्कम, संरक्षण कालावधी, विमा हप्ता याची माहिती जाणून घेण्यासाठी https://www.maharashtra.gov.in येथे १८ जून २०२१ चा शासन निर्णय पहावा. तसेच कृषी विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विमा कंपन्या व जिल्हे, कंपन्यांच्या तालुका प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत.

गारपिटीचे विमा संरक्षण ऐच्छिक  शेतकऱ्यांसाठी ‘गारपीट’ या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यासाठी जादा विमा हप्ता भरावा लागेल. मात्र शेतकऱ्यावर सक्ती नसून सहभाग ऐच्छिक असेल. आणि सहभाग नोंदवावयाचा असल्यास शेतकऱ्यांना बँकांमार्फतच त्यांचा नियमित व अतिरिक्त विमाहप्ता भरावा लागेल.   

...अशा आहेत जिल्हानिहाय विमा कंपन्या 
रिलायन्स (कंसात टोल फ्री संपर्क क्रमांक १८००१०२४०८८)  नगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशीम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापुर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार.
एचडीएफसी इर्गो (१८००२६६०७००)  बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली. सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर.
भारतीय कृषी विमा कंपनी (१८००४१९५००४)  रायगड, बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com