पराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही... : राजू शेट्टी

पराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही...
पराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही...

राज्यातील शेतकरी चळवळीचा चेहरा असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून पराभूत झाले. जिल्हा परिषद सदस्य, विधानसभेतील आमदार, सलग दोन वेळा खासदार अशी राजकीय कारकीर्द राहिलेल्या शेट्टींना निवडणुकीच्या आखाड्यात पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागली आहे. या पराभवाची कारणे, त्यांची पुढील वाटचाल, शेतकरी आंदोलन यासंदर्भात त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.  प्रश्न : हा पराभव धक्कादायक आहे का ?  श्री. शेट्टी :   नक्कीच. हा पराभव अनपेक्षित आणि धक्कादायकच होता. उलट गेल्या निवडणुकीपेक्षा जास्तच मताधिक्‍य मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती. मताधिक्‍य वाढण्यासारखं कामही मी केलं होतं. त्याप्रमाणे निवडणूक यंत्रणाही राबविली होती. या वेळीही ‘एक वोट एक नोट'' ही संकल्पना जोरात राबली. त्यामुळे खर्चाचा काही प्रश्‍न नव्हता. उलट काही रक्कम शिल्लक ठेवूनच माझी निवडणूक झाली. त्यामुळे माझ्या मनात पराभवाची भीती नव्हती. परंतु, प्रत्यक्ष निकाल निराशा करणारा लागला. याला दोन कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे माझ्याच नाही तर राज्यातील सर्वच मतदारसंघांत भाजप-शिवसेनेच्या बाजूने वातावरण झाले होते. याचा फटका सर्वच विरोधी उमेदवारांना बसला आहे. दुसरं कारण म्हणजे सरकारवर नाराज असलेला मतदार वंचित बहुजन आघाडीच्या मागे गेला. तो मतविभागणीसाठी कारणीभूत ठरला. त्यामुळे पराभवाची शक्‍यता वाढली. सध्या प्रचंड पैसा खर्च करून निवडणुका जिंकण्याचे जे तंत्र आले आहे त्याला आम्ही एकटे तोंड देऊ शकत नाही. म्हणून आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी केली होती. परंतु, सरकारविरोधी असणाऱ्या बिगर शेतकरी वर्गाचा आम्हाला फायदा झाला नाही. ते वंचित बहुजन आघाडीकडे गेले. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मतदारसंघात अतिशय विषारी प्रचार केला. त्याबाबतीत मी कसलीच तडजाेड करणार नाही अशी माझी भूमिका होती. याचा फटका मला बसलाच बसला. माझा शेतकऱ्यांवर विश्‍वास होता. शेतकऱ्यांचा माझ्यावर विश्‍वास होता. त्यामुळे यश मलाच मिळणार असा माझा आत्मविश्‍वास होता. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही. मी सरकारच्या विरोधात गेलो याचं मला अजिबात दु:ख नाही. 

प्रश्न : शेतकरी चळवळीतील नेत्याचा पराभव होणे  ही शेतकऱ्यांसाठी धोक्‍याची घंटा आहे असं तुम्हाला वाटतं का? 

श्री. शेट्टी :   राज्यातील बदलेले वातावरण बघता तशी स्थिती नक्कीच आहे. महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालविणारे राज्य आहे. राज्यावर समाजसुधारकांचे संस्कार आहेत. पण, सध्याचा महाराष्ट्र वेगळा वाटत आहे. जाती-धर्माच्या नावाने तेढ निर्माण करून भावनिक राजकारण करण्याची स्पर्धा सुरू आहे. यात वर्गीय लढे म्हणजे शेतकरी, कामगार, असंघटित मजूर, वंचित चळवळ याला जातीपातीचा आधार देण्यात येत आहे. त्यामुळे चळवळी संपून जातील असे मला वाटते. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी लढण्याला एक बळ लागते. जर चळवळीचा प्रमुख लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असेल तर प्रश्‍न सुटण्यासाठी एक वेगळी ताकद मिळते. शेतकऱ्यांसाठी लढताना व्यवस्थेतील बारकावेही पहाता येतात. चळवळीतील कार्यकर्त्याचा पराभव करून त्याला लोकांपासून दूर नेण्याचे प्रयत्न प्राधान्याने झाले. यामुळे असे पराभव होणे शेतकऱ्यांसाठी, शेतकरी प्रश्‍नांसाठी धोकादायक ठरू शकते. 

प्रश्न : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला प्राधान्य मिळण्यापेक्षा जात-पात बघून  मतदान होत आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 

श्री. शेट्टी :   आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर गेली अनेक वर्षे काम करीत आहोत. हे काम करताना कोणतीही जात-पात पाहिली नाही. शेतकऱ्यांचे हित हाच विषय प्राधान्याचा राहिला. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला सन्मान मिळाला पाहिजे यासाठी लढत आहोत. पण नुकतीच झालेली निवडणूक पाहिली की हे चित्र चांगले दिसत नाही. जाती-पातीचा आधार घेऊन विखारी प्रचार करणाऱ्यालाच मतदान झाल्याचं जाणवायला लागलं आहे. असे मतदान होत असेल तर राज्याचे पुरोगामित्व टिकेल असे वाटत नाही. ते धोक्‍यात येऊ शकते. राज्यात पूर्वी दुबळ्यातल्या दुबळ्या व्यक्तीला पण न्याय मिळायचा. बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्या महान व्यक्तिमत्त्वाचा हा महाराष्ट्र आहे. महात्मा फुलेंसारखी व्यक्तिमत्त्वं राज्यात घडली आहेत. प्रत्येक माणसाला जाती धर्माच्या नावाखाली तोलायला लागलो तर पूर्वीचा महाराष्ट्र राहाणार नाही, याची खंत आहे.  प्रश्न : लोकसभेची जागा तर हातातून गेली. आता विधानसभा निवडणुकीचं काय नियोजन आहे? 

श्री. शेट्टी :   सर्वात प्रथम माझ्या पराभवाने खचलेल्या राज्यातील कार्यकर्त्यांना आधार, धीर देण्याची गरज आहे. हे पहिले काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या चळवळीला या पराभवामुळे मोठा दणका बसला आहे. यातून कार्यकर्ते अद्याप सावरले नाहीत. स्वाभिमानीच्या राज्यातील कार्यकर्त्यावर नाराजीची मोठी छाया पसरली आहे. ते विमनस्क आहेत. पराभवामुळे अनेक कार्यकर्ते निराश होऊन शेतकरी चळवळ सोडून देण्याची भाषा करायला लागले आहेत. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे हे माझ्या पुढील आव्हान आहे. त्यांची मानसिकता कणखर गेल्यानंतर विचाराअंती काय करायचे याबाबत निर्णय घेऊ. मी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारसरणीचा अभ्यासक आहे. धर्म निरपेक्षतेसाठी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेने जात असताना पानसरे, दाभोलकरांनी आपला प्राण गमाविला आहे. माझा तर फक्त पराभव झालेला आहे. म्हणूनच मी खचणार नाही, उलट जादा क्षमतेने काम करणार आहे. शेतकरी वर्गाबरोबरच दीन-दलित, वंचित घटकांच्या न्यायासाठी लढण्याचे काम सुरूच राहील. 

प्रश्न : आता खासदारकी नाही. शेतकरी प्रश्नांसाठी काम करताना त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे? 

श्री. शेट्टी :   शेती राज्याचा विषय असला तरी धोरणं प्रामुख्याने केंद्र सरकार ठरवीत असते. म्हणून दहा वर्षांपूर्वी ठरवून मी लोकसभेची निवडणूक लढविली होती. धोरणात्मक बदल झाल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणे शक्य नाही. संसदेत खासदार असल्यामुळे काही प्रोटोकॉल मिळतात. अधिकार मिळतात. संसदेत आवाज उठविता येतो. संबंधित मंत्री, अधिकारी यांच्याकडे जाता येते. बैठका बोलावता येतात. कमिट्यांवर काम करता येते. या माध्यमातून साखर, दूध, अन्नप्रक्रिया अशा बऱ्याच उद्योगासाठी मला काम करता आले. पाठपुरावा करता आला. आता ते शक्‍य नाही. आता रस्त्यावरची लढाई हेच काम आहे. या लढाईला मर्यादा आहेत. शेवटी जनादेश पाळलाच पाहिजे. त्यामुळे रस्त्यावरची लढाई हीच आंदोलनाची दिशा राहणार आहे. 

प्रश्न : बेरजेचे राजकारण करताना कार्यकर्त्यांना दुखावले , असा आरोप होतोय. त्याबद्दल काय सांगाल? 

श्री. शेट्टी :   सगळे निर्णय हे कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी पुणे ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा काढली. त्या वेळी सरकारच्या विरोधात काम करावे, असा कार्यकर्त्यांचा दबाव होता. त्याचवेळी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असा माझ्यावर कार्यकर्त्यांकडून दबाव येत होता. तरीही मी संयमाने घेत गेलो. दोन- तीन वेळा राज्य कार्यकारिणीची बैठक घेतली व त्यानंतरच सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्या पद्धतीने सरकार भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या अमर्याद संपत्तीचा वापर करून आणि जातीय धार्मिक तेढ निर्माण करून राजकारणाचा गलिच्छ खेळ खेळत होते, त्या वेळी त्याला तोंड देणे हे आपल्या एकट्याचं काम नाही, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. याबाबतीत कार्यकारिणीत चर्चा करूनच दोन्ही काॅँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय घेतले असे काही झाले नाही. माझा पराभव झाला असला तरी आघाडीतील घटक पक्षांनी प्रामाणिकपणे माझे काम केलेले आहे, त्यांनी दगा दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे.  

प्रश्न : पराभवामुळे शेतकरी चळवळीची पीछेहाट होईल? 

श्री. शेट्टी :   कोणताही पराभव हा सर्वांसाठी वाईट अनुभवच असतो. यामुळे निश्‍चितच नुकसान होते. यापूर्वी आम्ही अभिमानाने म्हणायचो की आमच्या चळवळीला जनमताचा कौल आहे. त्यामुळे उत्साहाने काम व्हायचे. चळवळीच्या कामाला गती यायची. पण आता चळवळीचे काम करणे हे मोठे आव्हान आहे. आता येथून पुढील काळात आम्हाला जनतेने मतपेटीचा कौल देऊन चळवळीला बळ दिले, असे म्हणता येणार नाही. याचा निश्‍चित फटका यापुढील काळात बसणार आहे. खासदारकीच्या आधारे जे काम व्हायचे ते होणार नाही. यामुळे शेती प्रश्‍न मांडताना निश्‍चितच अडचणी येतील हे गृहीत धरले पाहिजे. लोकांनी दिलेल्या कौल मान्य करून त्याचा आदर केला पाहिजे. आम्ही पराभव स्वीकारत आहोत. पण, लढाई संपलेली नाही. आम्ही येथून पुढील काळात शेतकऱ्यांच्यासह अन्य घटकांच्या न्यायासाठी झगडतच राहू.  प्रश्न : सरकारच्या विरोधात गेल्याचं दुःख नाही श्री. शेट्टी :   शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सरकार गंभीर नसल्याने आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. सरकारच्या विरोधात रान आम्हीच उठवलं होतं. त्याला कारणंही होती. सरकारने २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत हे मुख्य कारण होतं. संपूर्ण कर्जमुक्तीच्या बाबतीतही सरकार गंभीर नव्हते. म्हणून आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. मी सरकारच्या विरोधात गेलो याचं मला अजिबात दु:ख नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com