नगर : चारा उत्पादनाबाबत मिळतेय अंदाजे उत्तर
नगर ः खरीप, रब्बी हंगामासह चारापिके, कुरण, जंगल या माध्यमांतून जिल्हाभरात यंदा किती चारा उत्पादन होणार याची सध्यातरी माहिती प्रशासनाकडे नसल्याची बाब समोर आली आहे. ‘‘यंदा जोरदार पाऊस झाला आहे. चारा लागवडीचेही क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे चाराटंचाई निर्माण होणार नाही, असे अंदाजे उत्तर कृषी आणि पशुसंवर्धन विभागाकडून मिळाले.
सततचा दुष्काळ, पाणीटंचाई आणि वाया गेलेली पिके यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागांत गेल्या दोन वर्षांत गंभीर दुष्काळाला सामोरे जावे लागले. मागील दोन वर्षांत गंभीर चारा आणि पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. जनावरे जगवण्यासाठी प्रशासनाने छावण्या सुरू केल्या. अगदी छावण्याचा आकडा पाचशेच्या जवळपास गेला होता. पावसाळा सुरू झाला तरी पाऊस नसल्याने चारा उपलब्ध झाला नाही म्हणून ऑगस्टपर्यंत छावण्या सुरू ठेवाव्या लागल्या.
खरीप, रब्बी हंगामात झालेली पिकांची पेरणी, चारा लागवड क्षेत्र, चराऊ कुरणे, जंगल व अन्य स्रोतातून जिल्हाभरात किती चारा उपलब्ध होईल याची माहिती संकलित करून जिल्हाभरात असलेली जनावरे, त्यांना दर दिवसाला किती चारा लागेल, उपलब्ध चारा किती दिवस पुरेल, प्रशासनाला टंचाई भासली तर काही उपाययोजना करता येतील का? याचे नियोजन केलेले जाते. यंदा परतीच्या पावसाच्या शेवटी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रब्बीची पेरणी झाली. हाच अंदाज बांधून जिल्हाभरात टंचाई निर्माण होणार नाही असा कृषी व पशुसंवर्धन विभागाचा कयास आहे.
दरवर्षी टंचाई व अन्य बाबींचा विचार करून चारा किती उपलब्ध होईल. पाण्याची काय स्थिती असेल याचा आराखडा केला जातो. यंदा टंचाई आराखडा झालाय. मात्र खरीप, रब्बी हंगामासह चारापीके, कुरण, जंगल यातून जिल्हाभरात यंदा किती चारा उत्पादन होणार याची सध्यातरी प्रशासनाकडे माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. कृषी विभागाकडून माहिती उपलब्ध होत असते असे पशुसंवर्धन विभाग सांगतो. आत्तापर्यंत मात्र दोन्ही विभागांकडे चारा उपलब्धतेचा आकडाच नाही. विशेष म्हणजे दरवर्षी मार्च महिन्यात हमखास टंचाईला सामोरे जावे लागते. यंदा जिल्हाभरात नाही, पण काही गावांत टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. चारा उपलब्धतेवर मात्र कोणतेही अधिकारी, पदाधिकारी बोलायला तयार नाहीत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.