अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यात

अतिवृष्टीनतंर सुपारी फळगळीला सुरवात झाली आहे. हे प्रमाण मोठे असून पुढील काही दिवस अशीच फळगळ होत राहिली तर झाडावर फळच शिल्लक राहणार नाही असा धोका आहे. सुपारी पीक व्यवस्थापनावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. संपूर्ण पीकच वाया गेले, तर शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. - गणेशप्रसाद गवस, शेतकरी, सावंतवाडी
सुपारी
सुपारी

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता सुपारी पीकही धोक्यात आले आहे. पाऊस ओसरल्यानंतर बुरशी आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फळगळीमुळे सुपारीच्या झाडाखाली फळांचा खच पडला आहे. त्यामुळे सुपारी बागांवर अर्थकारण चालणाऱ्या दोडामार्ग, वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी येथील शेतकरी आणखी एका संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणपणे १ हजार १४६ हेक्टर क्षेत्र सुपारी पिकाखाली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ आणि मालवण या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात सुपारीची लागवड आहे. येथील काही शेतकऱ्यांचे अर्थकारण सुपारी आणि नारळ पिकांवरच अवलंबून आहे. सिंधुदुर्गात ३ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत सलग अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने भातशेती, केळी, फळबागांसह विविध भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु सुपारी बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पुढे येत आहे. सतत पडलेल्या पाऊसामुळे सुपारीच्या फळांना बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. याशिवाय फळगळीने बागायतदार हैराण झाले आहेत. बागांमध्ये पक्व होण्याच्या स्थितीत असलेली फळे गळून पडत असल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. येत्या दोन महिन्यांत ही फळे परिपक्व होणार होती. सुपारीला गोव्यात मोठी मागणी आहे. येथील सर्व माल गोव्यात चांगल्या दराने विकला जातो. परंतु ही सर्व पिकेच आता हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पिकांवर ज्या शेतकऱ्यांचे अर्थकारण आहे. त्यांची मात्र झोप उडाली आहे. तालुकानिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये): सावंतवाडी-४५९, दोडामार्ग-६७, वेंगुर्ला-१५२, कुडाळ-२३६, मालवण-१६६, कणकवली-३९, देवगड-१४, वैभववाडी-८ प्रतिक्रिया माड आणि सुपारीचे झाड मोडले तर त्याची शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाते. परंतु आता अतिवृष्टीमुळे फळगळीचे संकट ओढवले आहे. या नुकसानीचे पंचनामेदेखील कृषीचे अधिकारी करीत नाहीत. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. - दीपक सिद्धये, बागायतदार, कोलझर, सावंतवाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com