परभणी जिल्ह्यात लष्करी अळीमुळे चारा पिके संकटात

परभणी जिल्ह्यातीलष्करी अळीचा धुमाकूळ
परभणी जिल्ह्यातीलष्करी अळीचा धुमाकूळ

परभणी ः जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. या अळीचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे यंदा ज्वारी, मका या चारा पिकांवर संकट आले आहे. लष्करी अळीने ज्वारी आणि मक्याचे नुकसान केल्यामुळे चारा तसेच अन्नधान्य पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा परभणी जिल्ह्यात प्रथमच रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळी (फाॅल अर्मीवर्म - स्पोडोप्टेरा फुर्जीपर्डा) चा प्राद्रुर्भाव झाल्याचे आढळून आले. दोन आठवड्यांपूर्वी इटलापूर (ता. परभणी) येथील शेतकरी बाळासाहेब पुंड यांच्या शेतातील ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळी आढळून आली. सद्यःस्थितीत परभणी, जिंतूर, पाथरी तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या शेतावरील ज्वारी, मका या पिकांचे पाने, पोंगे कुरतडून लष्करी अळीने नुकसान केले आहे.

ज्वारीची वाढ खुंटली आहे. अतिशय खादाड असलेल्या या अळीच्या विष्ठेमुळे चारा पिकांच्या पानांची प्रत खराब होत आहे. या अळीचा प्रसार खूप वेगाने होत असतो. सध्या पाणी असलेल्या भागातील शेतकरी रब्बी ज्वारी, मकाची पेरणी सुरू आहे. यापूर्वी पेरणी केलेली ज्वारी आणि मका ही पिके शेतामध्ये आहेत. त्यामुळे या अळीसाठी खाद्य उपलब्ध आहे.

ज्वारी पिकांवर पहिल्या दीड महिन्याच्या कालावधीत ही अळी आढळून येते. यंदा उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे रब्बी ज्वारीचे पेरणी क्षेत्र कमी झाले आहे. त्यात लष्करी अळीने हल्लाबोल केल्यामुळे शेतातील उभ्या ज्वारी, मका या चारा पिकांचे नुकसान होत आहे.

त्यामुळे यंदा ज्वारीचा कडबा तसेच मक्याचा चारा यांची उपलब्धता कमी होऊ शकते. परिणामी, चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव ओळखून कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com