परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळी

अमेरिकन लष्करी अळी
अमेरिकन लष्करी अळी

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा (फाॅल आर्मीवर्म-स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा) प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. इटलापूर (ता. परभणी) येथील शेतकरी बाळासाहेब पुंड यांच्या शेतातील ज्वारीवर ही अळी आढळून आली आहे. यापूर्वी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील मक्यावर ही अळी आढळली होती. इटलापूर येथील शेतकरी बाळासाहेब पुंड यांनी आॅक्टोबर महिन्यात दीड एकरांवर रब्बी ज्वारीची पेरणी केली. परंतु पाने तसेच पोंगे कुरतडल्याचे निदर्शनास येताच पुंड यांनी शोध घेतला असता अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. पाने, पोंगे कुरतडल्यामुळे ज्वारीची वाढ खुंटली होती. कीटकनाशकांच्या दोन फवारण्या केल्यामुळे ही कीड काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचे पुंड यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात मक्यावर आढळून आलेल्या या अमेरिकन लष्कारी अळीने आता रब्बी ज्वारीकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या महिन्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वारी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील पिकांवर ही अळी आढळली होती. मका, ऊस या पिकांनंतर ज्वारीत ही अळी आढळल्याची नोंद झाली आहे.  ही अळी ज्वारीचे पाने कुरतडून पोंग्यामध्ये शिरते. ही अळी अतिशय खादाड आहे. तिच्या विष्ठेमुळे पानांची प्रत खराब होते. या अळीचा प्रसार खूप वेगाने म्हणजेच एका रात्रीमध्ये पतंग १०० किलोमीटर अंतर पार करून जातो. सध्या रब्बी ज्वारी, मकाची पेरणी सुरू आहे. वेगवेगळ्या कालावधीत पेरणी केली जात असल्यामुळे या अळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. यामुळे अळीचे जीवनचक्र वर्षभर सुरू राहाते. ज्वारीवर पहिल्या दीड महिन्याच्या कालावधीत ही अळी आढळून येते. यंदा उद्‌भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी ज्वारीचा पेरा घटल्याने येत्या काळात चाराटंचाई भासणार आहे. या परिस्थितीत ज्वारी, मका आदी चारा पिकांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वेळेवर ओळखण्यासाठी शेतकऱ्यांनी दररोज ज्वारीच्या पिकांची निरीक्षणे घ्यावीत. प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर या अळीच्या व्यवस्थापनासाठी तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा, चारा तसेच धान्याच्या उत्पादनात मोठी घट येऊ शकते, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॅा. बि. व्ही. भेदे यांनी सांगितले. ...असे करा व्यवस्थापन अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि तो कमी असल्यास प्रादुर्भावग्रस्त पोंगे नष्ट करावेत. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. अर्थात, पीकनिहाय ‘सीआयबीआरसी’ मान्यताप्राप्त शिफारशीनुसार फवारणीसाठी थायामेथोक्झाम (१२. ६ टक्के अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के) १२५ मिलि प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी एकरी दोन या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत. तज्ज्ञ म्हणतात... यंदा उद्‌भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे येत्या काळात चाराटंचाई होऊ शकते. अमेरिकन लष्करी अळी या बहुभक्षी, खादाड किडीचा प्रसाराचा वेग जास्त असल्यामुळे तिचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तत्काळ उपायोजना केल्यास तिचे नियंत्रण होते असे ज्येष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. बी. बी. भोसले, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर व कीटकशास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. भेदे यांनी सांगितले.  : डॉ. बी. व्ही. भेदे, 7588082028

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com