बाजरीची आवक घटली, दरात सुधारणा

खानदेशातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची आवक घटली असून, दरात क्विंटलमागे ६० ते १०० रुपयांची सुधारणा दिसत आहे. पुढे आवक आणखी कमी होण्याचे संकेत आहेत.
bajara
bajara

जळगाव ः खानदेशातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची आवक घटली असून, दरात क्विंटलमागे ६० ते १०० रुपयांची सुधारणा दिसत आहे. पुढे आवक आणखी कमी होण्याचे संकेत आहेत.  बाजरीची रब्बी हंगामातील पेरणी अनेक भागात झाली होती. धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे सात हजार हेक्‍टरवर तर जळगाव जिल्ह्यात सुमारे नऊ हजार हेक्‍टरमध्ये पेरणी झाली होती. मळणी मे महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण झाली. परंतु लॉकडाउनमुळे दरात घसरण झाली. मागील वर्षी मे व जूनमध्ये बाजरीचे दर १९०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. परंतु यंदा कोरोनामुळे सर्वच बाजार समित्यांमधील कामकाजावर परिणाम झाला आणि दर दबावातच राहिले.  मध्यंतरी जळगाव, चोपडा व अमळनेर येथील बाजार समितीचे कामकाज अधूनमधून कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे बंद केले जात होते. मागील पंधरवड्यात बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत सुरू आहे. तसेच बाजरीची आवक कमी झाली आहे. बाजरीची आवक सध्या चाळीसगाव, चोपडा, अमळनेर व धुळ्यातील शिरपूर येथील बाजारात सुरू आहे. या बाजारांमध्ये प्रतिदिन सरासरी १८०० क्विंटल एवढी आवक मागील तीन-चार दिवसात झाली आहे. तर दर १६०० ते १६६० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले आहेत. मे महिन्यात दर १५५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. दर्जेदार बाजरीचे दर १७०० पर्यंत पोचले आहेत.  जळगाव, यावल, रावेर येथील बाजारात बाजरीची कुठलीही आवक सध्या होत नसल्याची स्थिती आहे. बाजरीची आवक पुढील आठवड्यात आणखी कमी होऊ शकते. कारण कमाल शेतकऱ्यांनी बाजरीची विक्री केली आहे. परंतु यंदा दर मागील हंगामाच्या तुलनेत कमी मिळाल्याने बाजरी उत्पादकांमध्ये नाराजी आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com