मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
ताज्या घडामोडी
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात पाऊस
मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट असल्याने अचानक वातावरण बदलले. त्यामुळे प्रचंड पाणी साचून वाहू लागले. यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व टोमॅटो लागवडीचे नुकसान झाले. रोपे व ठिबक साहित्य वाहून गेले.
- किरण लभडे, शेतकरी, निमगाव मढ, ता. येवला
पाणी तुंबल्याने मोठ्या प्रमाणावर साठवलेला कांदा, जनावरांचा चारा, घरासमोर व खळ्यांवरील साहित्यासह दोन जनावरे वाहून गेली. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
- सोमनाथ सयराम लभडे, निमगाव मढ, ता. येवला
नुकसानाबाबत पंचनामे करण्यासाठी शासकीय यंत्रणेला सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांना तत्काळ कशी मदत करता येईल, याकामी लक्ष देईन. जुना पाझर तलावाची दुरुस्ती लवकर व्हावी.
- छगन भुजबळ,आमदार.
नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लागवड झालेल्या मका, कापसाला फायदा मिळणार आहे. येवला, देवळा, मालेगाव आणि सटाणा तालुक्यांतील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पावसाअभावी खरिपाचे नियोजन अडून पडले होते. आता मात्र पेरणीला वेग येणार आहे. अजूनही जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये पाऊस पडलेला नाही. त्यामुळे येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, यापेक्षा चांगला पाऊस झाला तरच पेरण्या करता येतील, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नाशिकच्या मालेगाव आणि सटाणा तालुक्यांतील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. शनिवारी (ता. २२) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पावसाने देवळा तालुक्यातील विठेवाडी, भऊर, मालेगाव तालुक्यांतील कोठरे, दुंधे, सातमाने आणि सटाणा तालुक्यातील वायगाव, सारदे भागांत जोरदार हजेरी लावली. चांगला पाऊस पडण्याची शेतकऱ्याला अपेक्षा आहे.
येवला तालुक्यात नुकसान
येवला तालुक्यातील निमगाव मढ या गावात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गावाच्या पूर्व भागातील मंडपी नाल्यावरील १९९२ साली झालेला वाणी बंधारा पाणी साचून फुटला. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्यात वाहून गेला. या भागात अगोदर पाऊस नसल्याने शेततळ्यांच्या भिस्तीवर मोठ्या प्रमाणावर लावलेला भाजीपाला व टोमॅटो याचे नुकसान झाले.
शेतकरी सयराम लभडे यांच्या कांद्याच्या चाळीसह दोन गायी वाहून गेल्या. त्यात एक गाय सापडली आहे. एक गाय मृत पावली. दोन शेळ्या व कोंबड्या वाहून गेल्या. पाइप, स्प्रिंकलर सेट, ठिबक सिंचन सेट, क्रेट यांसारखे शेतीसाहित्य वाहून गेले आहे. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठी अडचण निर्माण झाली. आमदार छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी प्रांत राजेंद्र पाटील, तहसीलदार रोहिदास वारुळे उपस्थित होते.
कांद्याला फटका
एक हजार क्विंटल कांदा वाहून गेला. ३ ते ४ हजार कांदा पावसात भिजून खराब झाला. गावाच्या पूर्व भागातील ३० ते ४० टोमॅटो लागवड उद्ध्वस्त झाली. साठवलेला जनावरांचा चारा वाहून गेला. शेतीसाहित्यासह शेळ्या, कोंबड्या व गाय हे पाळीव प्राणी पाण्यात वाहून गेले.
- 1 of 587
- ››