agriculture news in marathi article on cotton cultivation | Page 2 ||| Agrowon

एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी कापसाची उत्पादकता

डॉ. बसवराज भेदे, पुंडलीक वाघमारे, डॉ. खिजर बेग, अरविंद पांडागळे
शनिवार, 30 मे 2020

अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत असल्याचे अनुभव काही शेतकरी सांगत आहेत. मागील हंगामात राज्यातील कापूस लागवडीचे क्षेत्र जवळपास ४२ लाख हेक्टर होते. मात्र राज्यातील कापसाची उत्पादकता राष्ट्रीय स्तरावरील उत्पादकतेपेक्षा फार कमी आहे. ती वाढवण्यासाठी एकात्मिक लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा वापर करणे गरजेचे झाले आहे.

अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत असल्याचे अनुभव काही शेतकरी सांगत आहेत. मागील हंगामात राज्यातील कापूस लागवडीचे क्षेत्र जवळपास ४२ लाख हेक्टर होते. मात्र राज्यातील कापसाची उत्पादकता राष्ट्रीय स्तरावरील उत्पादकतेपेक्षा फार कमी आहे. ती वाढवण्यासाठी एकात्मिक लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा वापर करणे गरजेचे झाले आहे.

उत्पादकता कमी असण्याची कारणे

 • राज्यात कोरडवाहू लागवडीचे मोठ्या प्रमाणात असलेले क्षेत्र
 • पावसाचा लहरीपणा
 • किडी-रोगांचा प्रादुर्भाव
 • योग्य लागवड तंत्राचा काहीसा अभाव

लागवड व्यवस्थापन- महत्त्वाच्या टीप्स
लागवड मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीवर करावी. हलक्या जमिनीत लागवड करू नये.

सेंद्रिय खतांचा वापर
पूर्वमशागतीच्या काळात शेवटच्या वखर पाळीपूर्वी कोरडवाहू लागवडीसाठी पाच टन शेणखत तर बागायतीसाठी १० टन शेणखत प्रति हेक्टर मातीमध्ये समप्रमाणात मिसळावे.

पीक फेरपालट
कापूस पीक एक पीक पद्धतीमध्ये घेऊ नये. त्यासाठी बागायती गहू, भुईमूग यानंतर लागवड करावी. तर कोरडवाहू लागवडीसाठी ज्वारी, सोयाबीन यांच्यानंतर कापसाचे पीक घ्यावे.

वाण निवड
वाणाची निवड हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. सध्या विविध कंपन्यांचे मोठ्या संख्येने वाण उपलब्ध आहेत. मागील हंगामातील अनुभव व वाणांच्या वैशिष्ट्यांवरून निर्णय घ्यावा.

वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असावीत.

 • वाण आपल्या भागामध्ये अधिक उत्पादन देणारा असावा.
 • त्याचे धाग्याचे गुणधर्म सरस असावेत.
 • रस शोषक किडी व रोगांना तो सहनशील असावा. जेणेकरून पीक संरक्षणावरील खर्च कमी करता येईल.
 • कोरडवाहू लागवडीसाठी बीटी कपाशीचा वाण कमी (१४०-१५० दिवस) ते मध्यम (१५०-१६० दिवस) कालावधीचा असावा.
 • बागायती लागवडीसाठी हाच कालावधी १६० ते १८० दिवसांचा असावा.
 • बोंडांचा आकार कोरडवाहूसाठी मध्यम (३ ते ४ ग्रॅम) तर बागायतीसाठी मोठा (४ ग्रॅमपेक्षा अधिक) असावा.
 • कोरडवाहू लागवडीसाठी तो पाण्याचा ताण सहन करणारा असावा.

विद्यापीठांचे वाण
मागील हंगामात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे अनुक्रमे एनएचएच ४४ बीटी व पीकेव्ही संकर २ हे बीटी वाण बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत.

लागवडीची वेळ

 • लागवडीची वेळ ही चांगल्या उत्पादनासाठी फार महत्त्वाची असते. बागायतीसाठी २५ मे ते ७ जून हा कालावधी अनुकूल आहे. मात्र मागील काही हंगामांमध्ये मराठवाड्यात ठिबक संचावर मे महिन्यात लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळात कापसाची पाने लालसर होऊन वाढ खुंटत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार मातीचे तापमान वाढलेले असल्याने होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ठिबकवर लागवड करताना जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी.
 • कोरडवाहू परिस्थितीमध्ये मॉन्सूनचा (७५-१०० मिमी) ३-४ इंच पाऊस पडताच लागवड करावी. लागवड १५ जुलैनंतर केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. त्यामुळे त्यानंतर लागवड टाळावी.

बिगर बीटी आश्रयात्मक बियाणे (रेफ्युजी)
बाजारपेठेत उपलब्ध होणाऱ्या बियाण्यामध्ये वजनाच्या ५ टक्के प्रमाणात बिगर बीटी बियाणे हे बीटी बियाण्याच्या पाकिटामध्ये मिसळून देण्यात येणार आहे.

लागवडीचे अंतर
लागवडीचे अंतर ही देखील महत्त्वाची बाब असते. प्रत्येक विभागासाठी संबंधित कृषी विद्यापीठाने लागवड अंतराबाबत पुढीलप्रमाणे शिफारशी केल्या आहेत.

मराठवाडा (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ)

 • कोरडवाहू-  १२० x ४५ सेंमी. (१८,५१८ झाडे प्रति हेक्टर)
 • बागायती - १५० x ३० सेंमी. (२२,२२२ झाडे प्रति हेक्टर)
  १८० x ३० सें.मी. (१८,५१८ झाडे प्रति हेक्टर)
 • जोडओळ- १२०-६० x ६० सें.मी. (१८,५१८ झाडे प्रति हेक्टर)
 • सघन लागवड - ९० x ३० सें.मी. (३७,०३७ झाडे प्रति हेक्टर)

विदर्भ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ)

 • कोरडवाहू - ९० x ६० सें.मी. (१८,५१८ झाडे प्रति हेक्टर)
 • बागायती - १२० x ९० सें.मी. (९,२६० झाडे प्रति हेक्टर)

खानदेश व पश्चिम महाराष्ट्र (महात्मा फुले कृषी विद्यापीठ)

 • कोरडवाहू - मध्यम जमीन - ९० x ६० सें.मी. (१८,५१८ झाडे प्रति हेक्टर)
 • भारी जमीन- ९० x ९० सें.मी. (१२,३४५ झाडे प्रति हेक्टर)
 • बागायती- १२० x ६० सें.मी. (१३,८८८ झाडे प्रति हेक्टर)
  ९० x ९० सें.मी. (१२,३४५ झाडे प्रति हेक्टर)

बीज प्रक्रिया
बाजारात उपलब्ध बियाण्याला रासायनिक कीडनाशकाची प्रक्रिया केलेली असते. मात्र बुरशीजन्य रोग व मातीतील अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्यासाठी पुढीलप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

बुरशीनाशक
सुडोमोनास फ्लुरोसन्स- मात्रा- १० ग्रॅम प्रति किलो बियाणे- मर व करपा रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी

जीवाणूसंवर्धके
अ‍ॅझोटोबॅक्टर (नत्र स्थिरीकरण) व स्फुरद विद्राव्य करणारे
जीवाणू (अविद्राव्य स्फुरद विद्राव्य करण्यासाठी)

मात्रा
पावडर स्वरूपातील जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम किंवा द्रव स्वरूपातील ६ मिली प्रति किलो बियाणे

महत्त्वाची टीप- बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतरच जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

आंतरपिके
मागील काही वर्षांपासून पिकाची वाढ, फुले लागणे, बोंडे लागण्याच्या काळात पावसाचा खंड आदी बाबी अनुभवास येत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट येते. हवामानाचा धोका कमी करण्यासाठी कापसामध्ये आंतरपीक घेणे फायदेशीर आहे. याशिवाय आंतरपिकांमुळे मातीची धूप थांबते. पावसाचे पाणी जमिनीत जास्त मुरते. द्विदलवर्गीय आंतरपिकांमुळे नत्र स्थिरीकरण होते. त्यामुळे
कापसात पुढीलप्रमाणे आंतरपिके घ्यावी.

 • कापूस + मूग (१:१)- रुंद ओळींत कापूस + मूग (१:२), कापूस + उडीद (१:१),
 • कापूस + सोयाबीन (१:१), कापूस + तूर (४-६:१ किंवा ६-८:२)

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
एकात्मिक अन्न्नद्रव्य व्यवस्थापनात सेंद्रिय खतांचा वापर, जिवाणू संवर्धके, हिरवळीची तसेच रासायनिक खते यांचा अंतर्भाव होतो. जागेअभावी या लेखात सविस्तर शिफारशी देणे शक्य नाही. तथापि पुढील लेखांत त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल.

तण नियंत्रण
तण नियंत्रणासाठी दोन वेळा निंदणी व तीन-चार वेळा वखरणी वा डवरणी करावी. सध्या मजुरांची उपलब्धता, मजुरीचे दर यामुळे निंदणी वेळेवर होत नाही. झाली तरी खर्चीक होत आहे. त्यासाठी तणनाशकांचे पर्याय वापरता येईल. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मजुरांची गरज कमी करून सामाजिक अंतर ठेवणेही शक्य होईल. कापसात उगवणी पूर्व आणि उगवणी पश्चात वापरावयाची तणनाशके पुढीलप्रमाणे आहेत.

उगवणीपूर्व
पेंडीमिथॅलीन प्रमाण २.५ ते ३.३ लीटर प्रति हेक्टर (२५ ते ३३ मिली प्रति १० लीटर) पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी मातीवर समप्रमाणात फवारावे.
एक हेक्टरसाठी एकहजार लीटर पाणी वापरावे.

उगवणीनंतर
पायरीथायोबॅक सोडिअम- ६२५ मिली प्रति हेक्टर किंवा १२.५ मिली प्रति १० लीटर अधिक क्विझॉलफॉप इथाइल- ५०० मिली प्रति हेक्टर किंवा १० मिली प्रति १० लिटर (ही तणनाशके दोन्ही एकमेकांत मिसळून वापरण्याची ॲग्रेस्को शिफारस आहे.)

वापरण्याची वेळ
लागवडीनंतर २१ ते २८ दिवसांनी किंवा तणे २-४ पानावर असताना

मूलस्थानी जलसंधारण
कोरडवाहू लागवडीमध्ये जमिनीमध्ये अधिकाधिक पावसाचे पाणी मुरवणे आवश्यक आहे. यासाठी उतारास आडवी पेरणी करावी. मॉन्सून माघारी परतण्यापूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात वखराच्या वा डवऱ्याच्या जानोळ्यास वा जानकुडास दोरी अथवा पोते बांधून सऱ्या तयार कराव्यात. यामुळे शेवटच्या पावसाचे पाणी जमिनीमध्ये जास्त मुरेल आणि बोंडे भरण्याच्या काळात त्याचा फायदा होईल.

संरक्षित पाणी देणे
पिकास पाण्याची गरज पाते लागणे, फुले लागणे व बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत जास्त असते. या काळात पावसाची उघडीप वा खंड असल्यास उपलब्धतेनुसार संरक्षित सिंचन द्यावे. सिंचनाच्या पाण्याची उपलब्धता कमी असल्यास सोडओळ पद्धतीने पाणी द्यावे. याकरिता लागवड जोडओळ पद्धतीने केल्यास फायदा होईल.

संपर्क- डॉ. खिजर बेग, ७३०४१२७८१० (कापूस विशेषज्ज्ञ)
अरविंद पांडागळे, ७५८८५८१७१३ (सहाय्यक कृषी विद्यावेत्ता)
(लेखक कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे कार्यरत आहेत.)
-------------------------------------------------------------------------------------
कपाशीतील पीक संरक्षण टीप्स

लागवडीआधी

 • शेतातील मागील हंगामातील पऱ्हाट्यांची विल्हेवाट लावावी. त्यात मागील हंगामातील किडींच्या अवस्था राहतात.
 • खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील किडीच्या अवस्था जमिनीवर येऊन प्रखर सूर्यप्रकाशाने मरतात किंवा पक्षी त्यांना खातात.
 • गेल्या हंगामातील कापूस शिल्लक राहिला असल्यास तेथे गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावे. त्यात अडकलेले पतंग मारून त्यांची विल्हेवाट लावावी.
 • कपाशीच्या शेताच्या जवळपासच्या परिसरातील किडीच्या यजमान वनस्पती उदा. पेठारी, कोळशी, गाजर गवत, धोतरा, कंबरमोडी, रानभेंडी, रूचकी, कडूजिरे आदींचा बंदोबस्त करावा.

लागवड करतेवेळी

 • रोग व रस शोषक किडींस प्रतिकारक्षम वा सहनशील आणि कमी कालावधीच्या वाणांची निवड करावी.
 • पीक फेरपालट करावी. त्यामुळे किडींना सतत खाद्य उपलब्ध होणार नाही व त्यांच्या जीवनक्रमात खंड पडेल.
 • लागवड शिफारस केलेल्या अंतरावर करावी.
 • रासायनिक खतांचा शिफारशीनुसार वापर करावा. नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
 • मका, चवळी, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी यासारखी आंतरपिके किंवा मिश्र पिके घेतल्यास कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धन होते.
 • कपाशीभोवती झेंडू आणि एरंडी या सापळा पिकाची कडेने एक ओळ लावावी.

लागवडीनंतर

 • पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
 • कोळपणी व खुरपणी किंवा तणनाशकाचा वापर करून पिकाच्या सुरुवातीचे ८ ते ९ आठवडे तणांचे व्यवस्थापन करावे.
 • रासायनिक कीटकनाशकाची पहिली फवारणी जेवढी लांबवता येईल तेवढी लांबवावी.
 • त्यामुळे मित्र किटकांचे संवर्धन होईल. तसेच त्यांना जास्त हानिकारक कीटकनाशकांचा वापर करू नये.
 • सुरुवातीच्या काळात निओनिकोटिनॉईडस गटातील कीटकनाशकांचा वापर टाळावा.
 • प्रादुर्भावग्रस्त व गळालेली पाते, बोंडे जमा करून नष्ट करावी.
 • गुलाबी बोंडअळीग्रस्त डोमकळ्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.
 • पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत.
 • कामगंध सापळे लावावेत. गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी पाच तर पतंगाना सामूहिकरीत्या आकर्षित करण्यासाठी २० सापळे प्रति हेक्‍टरी लावावेत.
 • २५ पक्षीथांबे प्रति हेक्‍टरी लावावेत.
 • गुलाबी बोंडअळीसाठी उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा टॉयडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधिलमाशीच्या अंडयांचे कार्ड (१.५ लाख अंडी प्रति हेक्टरी) पिकावर लावावेत.

तण व आंतरमशागत काही टीप्स

 • सुरुवातीच्या काळात वखराच्या अथवा कोळप्याच्या उभ्या आणि आडव्या पाळ्या द्याव्यात. रोपांच्या भोवताली हात खुरपणी करून घ्यावी.
 • सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत १९-१९-१९ तसेच फुले येताना अथवा बोंडे वाढीच्या अवस्थेत ००:५२:३४ आणि बोंडाची पक्वता होण्याच्या अवस्थेत १३-०-४५ या विद्राव्य खतांच्या १ ते २ फवारण्या कराव्यात.
 • फुले व पात्या यांची गळ होऊ नये यासाठी एनएए या संजीवकाची ३ ते ४ मिलि प्रति १५ लीटर पाण्यातून फवारणी करावी.

रोग नियंत्रण
बीजप्रक्रियेसाठी शिफारस केलेली बुरशीनाशके

रोगाचे नाव बुरशीनाशक प्रमाण
पानावरील कोनात्मक ठिपके कार्बोक्झीन ७५ टक्के डब्ल्यूपी २ ते २.५ ग्रॅम
मूळकूज टेट्राकोनॅझोल ११.६ टक्के एसएल १.२ मिली

फ़वारणीसाठीची बुरशीनाशके

पानावरील ठिपके 

 • क्रेसोक्झिम-मिथाईल ४४.३ टक्के एससी १० मिली
 • प्रोपीकोनॅझोल २५ टक्के इसी १० ग्रॅम
 • अझॉक्सीस्ट्रोबीन १८.२ टक्के अधिक  डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के एससी १० मिली
 • फ़्ल्युक्झॅपायरोक्झॅड १६७ ग्रॅ प्रति लिटर अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबीन ३३३ ग्रॅ प्रति लि. एससी ६ मिली

अल्टरनेरिया करपा 

 • पायरॅक्लोस्ट्रॉबीन २० डब्ल्यूजी १० ग्रॅम 
 • मेटीराम ५५ + पायरॅक्लोस्ट्रोबीन ५ डब्ल्यूजी २०-२५ ग्रॅम

दहिया 

 • ​क्रेसोक्झिम-मिथिल ४४.३ % एससी १० मिली 
 • अझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के अधिक डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के एससी १० मिली

संपर्क- डॉ. बसवराज भेदे, ९८९०९१५८२४
(लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)


इतर नगदी पिके
उसावरील रोगांचा ओळखा प्रादुर्भाव सध्याच्या पावसाळी वातावरणात ऊस जोमदार वाढीच्या...
उसावरील खोड कीड, लोकरी मावा, हुमणीचे...ऊस पिकामध्ये प्रामुख्याने खोड कीड, कांडी कीड,...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचे...राज्यामध्ये उसाची लागवड आडसाली, पूर्वहंगामी आणि...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनगुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे...
कपाशीवरील तुडतुड्याचे नियंत्रणतुडतुडे ही बी टी कपाशीवरील सर्वात महत्त्वाची रस...
आडसाली उसासाठी खतमात्रेचे नियोजनउसाच्या योग्य वाढीसाठी माती परिक्षणाच्या...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
शेतकरी नियोजन (पीक कापूस)पीक - कापूस गणेश शामराव नानोटे, निंभारा, ता....
कपाशी लागवडीमध्ये नवा दृष्टिकोन हवा दरवर्षी कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी पूर्वहंगामी...कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या...
ऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतउसासाठी योग्य ठिबक सिंचन ठिबक सिंचन पद्धती...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...