परसबागेतील कोंबड्यांसाठी आरोग्य, खाद्य व्यवस्थापन

कोंबड्यांना पुरेसा आहार द्यावा. आरोग्य व्यवस्थापन करावे.
कोंबड्यांना पुरेसा आहार द्यावा. आरोग्य व्यवस्थापन करावे.

केंद्रीय पक्षी संशोधन संस्था विकसित केलेल्या वनराजा, ग्राम प्रिया, कृष्णा-जे, नंदनम, ग्रामलक्ष्मी या जाती अंडी, मांस उत्पादनाच्या दृष्टीने चांगल्या आहेत. या जाती देशी जातींमध्ये मोडत असल्यामुळे चांगली मागणी आहे. चांगले उत्पादन आणि आर्थिक लाभासाठी कोंबड्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे.

परसबागेतील कुक्कुटपालन हे ५ ते २० अशा कोंबड्याचे पालन घरगुती स्वरुपामध्ये सुरू करावे, या प्रकारच्या कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना विशेष असा आहार देण्याची आवश्यकता भासत नाही. या कोंबड्या मोकळ्या सोडलेल्या असल्याने या कोंबड्यांना उरलेले खाद्य, निम्न दर्जाचा तांदूळ किंवा गहू यांचा भरडा अशा प्रकारचे खाद्य देता येते. 

परसबागेसाठी कोंबड्यांच्या जाती  

  • पारंपरिक पद्धतीमध्ये साधारणतः गावठी कोंबड्यांचा वापर करण्यात येतो. गावठी कोंबड्यांची अंडी आणि मांस यांना चांगला दर मिळतो. परंतु त्यांच्यामध्ये उत्पादन क्षमता कमी असते, यासाठी शासनाच्या संशोधन संस्थांनी गावठी कोंबड्यांच्या जातीमध्ये सुधारणा करून नवीन जाती विकसित केल्या आहेत. केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेने विकसित केलेल्या वनराजा, ग्राम प्रिया, कृष्णा -जे, नंदनम, ग्रामलक्ष्मी या जाती अंडी, मांस उत्पादनाच्या दृष्टीने चांगल्या आहेत. या जाती देशी जातींमध्ये मोडत असल्यामुळे चांगली मागणी आहे. वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे कडकनाथ ही जात लोकप्रिय झाली आहे. 
  • कोंबड्यांच्या देशी आणि विदेशी जाती यांचा संकर करून केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेने कॅरी शामा, कॅरी निर्भिक, हितकारी या जाती विकसित केल्या आहेत. या सर्व जाती भारतीय वातावरण आणि भौगोलिक परिस्थिती यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढतात, चांगले उत्पादन देतात.
  •  सुधारित देशी जातीच्या कोंबड्या प्रतिवर्ष साधारणतः १८० ते २०० अंडी देतात. कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असते. त्यामुळे औषध उपचारांचा खर्च कमी होतो. मात्र शिफारशीनुसार कोंबड्यांना लसीकरण करावे लागते. 
  • प्रजनन व्यवस्थापन 

  •  एकदा कोंबड्या खरेदी केल्यानंतर बऱ्याच काळापर्यंत त्याच कोंबड्या व नर प्रजननासाठी वारंवार वापरण्यात येतात. कालांतरानंतर त्यांच्यामध्ये प्रजननासंदर्भातील समस्या आढळून येतात. याला अंत: प्रजनन असे म्हणतात. यामुळे पिल्ल्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढते, अंडी देखील खराब दर्जाची असतात. 
  •  प्रजननासाठी वापरण्यात येणारा नर प्रतिवर्षी बदलावा. यामुळे अंडी   उत्पादन आणि प्रजननाची क्षमता चांगली राहते. पिलांमध्ये मरतुकीचे प्रमाण कमी होते. 
  • कोंबड्यांची सुरक्षितता

  • परसबागेतील कुक्कुटपालन करताना कोंबड्यांच्या सुरक्षिततेसाठी काही उपाय योजना करणे गरजेचे असते. कोंबड्या खरेदी केल्यानंतर त्यांची पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी.
  •  नवीन कोंबड्या घेतल्यानंतर प्रथम साधारणतः एक आठवडा जुन्या कोंबड्यांसोबत मिसळू देऊ नये, यामुळे नव्या कोंबड्यांमध्ये काही आजार असल्यास जुन्या कोंबड्यांमध्ये त्याचा प्रसार होणार नाही.
  • रोगप्रतिबंधक उपाय

  •   देशी कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, त्यांना रोगांचा प्रादुर्भाव लवकर होत नाही. मात्र काही विषाणूजन्य आजार हे प्राणघातक असतात, त्यामुळे लसीकरण आवश्यक असते. 
  •   सर्व कोंबड्यांना लसीकरण द्यावे. वेळच्या वेळी जंतनाशक द्यावे. 
  •   आपल्याकडील कोंबड्या आजारी पडल्यास त्यांना निरोगी कोंबड्यापासून वेगळे ठेवावे. जर कोंबडी आजाराने दगावली तर पशुवैद्यकाकडून शवविच्छेदन करावे, यामुळे आजाराचे निश्चित कारण समजून येते. इतर कोंबड्यांचा आजारापासून बचाव करता येतो.
  • खाद्य व्यवस्थापन 

  •  चांगले उत्पादन आणि आर्थिक लाभासाठी कोंबड्यांच्या खाद्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. ज्या त्या मोसमामध्ये उपलब्ध असणारे धान्य हे कोंबड्यांच्या खाद्यात दिले जाते. मात्र या धान्यांमध्ये काही ही अन्नद्रव्यांची कमतरता असते ज्यामुळे कोंबड्यांचे योग्य पोषण  होत नाही. चांगल्या प्रकारे वाढ दिसून येत नाही. याकरिता धान्यासोबतच इतर पोषणयुक्त आहार दिला गेला पाहिजे. 
  •  पोषक आहारामध्ये प्रथिने, खनिजे क्षार मिश्रण आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश असावा. या करिता बाजारात मिळणारे खाद्यच दिले पाहिजे असे नाही. आपणसुद्धा अशा प्रकारचे खाद्य तयार करू शकतो. घरी उपलब्ध असणाऱ्या घटकातून अशा प्रकारचे खाद्य तयार करता येते. 
  • घरच्या घरी खाद्यनिर्मितीचा नमुना  

  •    भरडलेला मका     ३८ भाग
  •    सोयामिल     ४० भाग
  •    तांदळाची कणी    १९.५० भाग
  •    जीवनसत्त्व  पावडर     ००.१० भाग
  •    खनिज क्षार पावडर     ००.२० भाग
  •    डायकॅल्‍शियम फॉस्‍फेट     ०१.०० भाग
  •    लाइमस्‍टोन पावडर     ०१.०० भाग
  •    मीठ     ००.५० भाग 
  • - डॉ. सचिन राऊत, ७५८८५७१५११    

    (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com