जनावरांना चावणाऱ्या माशांवर नियंत्रण आवश्‍यक

लम्पी स्कीन डिसीज या आजाराच्या विषाणूचा प्रसार जनावरांना चावणाऱ्या रक्तपिपासू किटकवर्गीय माश्या जसे की, टॅबॅनस स्टोमोक्‍सीस, क्‍यूलीकॉईडस आणि गोचिडांच्या मार्फत होतो. हे लक्षात घेऊन चावणाऱ्या माशांचे नियंत्रण करावे. आजारी जनावरांवर तातडीने उपचार करावेत.
The cleanliness of animals shelter is important for the health of the animals.
The cleanliness of animals shelter is important for the health of the animals.

लम्पी स्कीन डिसीज या आजाराच्या विषाणूचा प्रसार जनावरांना चावणाऱ्या रक्तपिपासू किटकवर्गीय माश्या जसे की, टॅबॅनस स्टोमोक्‍सीस, क्‍यूलीकॉईडस आणि गोचिडांच्या मार्फत होतो. हे लक्षात घेऊन चावणाऱ्या माशांचे नियंत्रण करावे. आजारी जनावरांवर तातडीने उपचार करावेत. सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील गाई,म्हशींमध्ये एलएसडी (लम्पी स्कीन डिसीज)आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. हा एक विषाणूजन्य आजार असल्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी आजारी जनावरांवर योग्य औषधोपचार आणि प्रसारावर नियंत्रणाची गरज आहे. या आजाराच्या विषाणूचा प्रसार जनावरांना चावणाऱ्या रक्तपिपासू किटकवर्गीय माश्या जसे, की डास, टॅबॅनस स्टोमोक्‍सीस, क्‍यूलीकॉईडस आणि गोचिडांच्या मार्फत होतो.

आजाराचा प्रसार

  • कीटवर्गीय माश्या आजारी जनावरांचा चावा घेऊन रक्त शोषण करतात.त्यावेळेस आपल्या प्रोबोसीसमध्ये (तोंड) विषाणू घेतात. जेव्हा निरोगी जनावरांना या माश्या चावतात,तेव्हा त्यांच्या तोंडातून वहन केलेले विषाणू शरीरात सोडतात.
  • वहन होण्याच्या कालावधीमध्ये या विषाणूची कीटकामध्ये जैविक वाढ न होता केवळ तांत्रिक पद्धतीने वहन केले जाते. या आजाराचा प्रसार करण्यास काही प्रकारच्या माश्या (स्टोमोक्‍सीस, टॅबॅनस) महत्त्वाची भूमिका बजावतात. या कीटकवर्गीय माशांचे वैशिष्ट्य म्हणजे आपला एका वेळेचा आहार एका जनावरास न चावता कमी कालावधीमध्ये दोन-तीन जनावरांचा चावा घेऊन पूर्ण करतात. या अल्प कालावधीमध्ये विषाणू तांत्रिक पद्धतीने तात्काळ दोन-तीन जनावरांमध्ये प्रसारित होतो.
  • ऋतुमानानुसार खरे तर कीटकवर्गीय माश्या जसे, की डास, क्‍यूलीकॉईडस्‌, टॅबॅनस, स्टोमोक्‍सीस यांची संख्या उन्हाळ्यामध्ये घटते. परंतु या आजाराचा प्रसार पाहता जनावरांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
  • नियंत्रणाच्या उपाययोजना 

  • जनावरांना प्रखर सूर्यप्रकाशामध्ये चरावयास सोडू नये. कारण प्रखर सूर्यप्रकाशामध्ये चावणाऱ्या माशांचा ( टॅबॅनस, स्टोमोक्‍सीस) प्रादुर्भाव अधिक होतो.
  • गोठ्यामधील कचरा तसेच गव्हाणीच्या कडा-कपारीतील कचरा झाडून गोठ्याच्या बाहेर शेकोटीमध्ये जाळून टाकावा. याद्वारे गोचिडांची अंडी नष्ट होतात.त्यामुळे गोठ्यातील गोचिडांची संख्या कमी होते. जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेली वैरण, कडबा, मूत्राने माखलेली वैरण तात्काळ खताच्या खड्ड्यामध्ये टाकावी. जर अशी वैरण गोठ्याच्या परिसरात राहिली तर त्यावर स्टोमोक्‍सीस माशांचे प्रजनन प्रभावीपणे होते.
  • गोठ्यासभोवताली असलेल्या नाल्या, खाच-खळगे स्वच्छ करावेत. त्यावर उगवलेली झुडुपे छाटून टाकावीत.नाल्या वाहत्या कराव्यात, यामुळे डास, टॅबॅनस इत्यादी माशांचे प्रजनन प्रभावीपणे रोखता येते.
  • जनावरांच्या शरीरावर वनस्पतिजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी. हे कीटकनाशक तयार करण्यासाठी कडुनिंब/ निंबोळी तेल - १५ मि.लि., करंज तेल - १५ मि.लि., साबण - २ ग्रॅम हे सर्व घटक एक लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. त्यास चांगले ढवळावे. हे द्रावण- जनावराच्या शरीरावर फवारावे. द्रावण जनावरांचे तोंड आणि डोळ्यावर फवारले जाणार नाही याची काळजी घ्यावी. हे द्रावण गोठ्यामधील भेगा,कपारी, दावणीखालील जागा, गोठ्याच्या परिसरातील नाली, खाचखळगे, पाण्याच्या डबक्यावर फवारावे. ज्या परिसरात जनावरांच्यामध्ये आजाराचा प्रादुर्भाव आहे, तेथे हे द्रावण दर तीन दिवसांच्या अंतराने फवारावे. या द्रावणाची फवारणी केल्यामुळे चावणाऱ्या माश्या आणि गोठ्यातील गोचिडांचे प्रभावी नियंत्रण होते.
  • घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करून त्याची देखील जनावरांचे शरीर आणि गोठ्याच्या परिसरात फवारणी करावी.
  • चावणाऱ्या माश्या आणि गोचिडांची संख्या वाढली असल्यास पशूतज्ज्ञांच्या सल्याने गोचिडनाशकांची फवारणी करावी.
  • आजारी जनावरांची पशू तज्ज्ञांकडून तात्काळ तपासणी करून औषधोपचार सुरू करावेत. आजारी जनावरास स्वतंत्र गोठ्यात बांधावे. जेणेकरून इतर जनावरांमध्ये आजाराचा प्रसार होणार नाही.
  • संपर्क - डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com