दुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता महत्त्वाची

दुधाळ जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गोठा तसेच परिसराची स्वच्छता महत्त्वाची आहे.
दुधाळ जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गोठा तसेच परिसराची स्वच्छता महत्त्वाची आहे.

दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव त्यांचे आरोग्य व दूध उत्पादनाला मारक ठरतो. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते. पशुवैद्यकीय उपचार आणि व्यवस्थापनावरील खर्च वाढतो. अशा रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गोठ्याची जैवसुरक्षितता हाच एकमेव पर्याय आहे.

दुभत्या गाई-म्हशी व इतर जनावरांची जैवसुरक्षितता म्हणजे त्यांचे विविध प्रकारच्या जीवाणू, विषाणू, बुरशी तसेच इतर रोग पसरविणाऱ्या गोष्टीपासून संरक्षण. रोग पसरविणारे विविध घटक जनावरांना वातावरण, पाणी, खाद्य व चारा यांच्या माध्यमातून आणि आगंतुक माणसे, भटके श्वान, पक्षी इत्यादींच्या माध्यमातून रोग पसरवू शकतात. जगभरातील ज्या देशांनी दुग्ध व्यवसायात प्रगती केली आहे तिथे जैवसुरक्षिततेला अतिशय प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आपल्यालाही या विषयी जागरूक राहणे गरजेचे आहे.

  • दुभत्या गाई-म्हशींमधील रोगाचा प्रादुर्भाव त्यांचे आरोग्य व दूध उत्पादनाला मारक ठरतात. त्यामुळे दूध उत्पादनात घट, पशुवैद्यकीय उपचारांवरील खर्च, इतर व्यवस्थापनावरील खर्च असे नुकसान होते. अशा रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गोठ्याची जैवसुरक्षितता हा एकमेव पर्याय आहे.
  • जनावरांना लाळ्या खुरकूत, कासदाह, ब्रुसेलोसिस, ट्युबरक्युलोसिस, व्हायरल डायरिया, त्वचेचे रोग होतात. या सर्व रोगांना जैवसुरक्षिततेमुळे प्रतिबंध केल्यास उपचारांवर होणाऱ्या खर्चापेक्षा केवळ पाच टक्क्याहून कमी खर्चात हे रोग नियंत्रणात राहू शकतात. 
  •  संसर्गजन्य रोगांना आपल्या गोठ्यात येण्यास प्रतिबंध करण्यासाठी चांगले व्यवस्थापन, जैवसुरक्षितता नियमावली, गोठ्याची स्वच्छता, आजारी जनावरांची वेगळी व्यवस्था व आगंतुकांवर नियंत्रण या गोष्टी अमलात आणाव्या लागतील. 
  •  रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग आपल्या गोठ्यावर येऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेणे गरजेचे आहे. जैवसुरक्षितता प्रणालीमुळे दुभत्या जनावराची उत्पादन क्षमताही टिकून राहते. दुधाची प्रत चांगली राहाते. 
  • चारा, खाद्यातून बुरशी तसेच बुरशीजन्य विषारी घटकांचा प्रादुर्भाव 

  •  जैवसुरक्षितता प्रणाली आपल्या गोठ्यावर लागू करताना गोठ्यात येणारी कुठलीही नवीन गोष्ट ही रोगकारक जीवाणू, विषाणू किंवा बुरशीची वाहक असू शकते हे लक्षात ठेवावे. 
  •   खाद्य तसेच चाऱ्याबरोबरसुद्धा बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बुरशीयुक्त चाऱ्यामुळे जनावराला मायकोसीस नावाचा आजार होतो, त्यामुळे जनावराचे फुफ्फुस, कास, गर्भाशय, आतड्याला इजा होऊ शकते. आतड्यामध्ये झालेल्या मायकोसीसमुळे अंतर्भागात रक्तस्रावदेखील होऊ शकतो. 
  •  बुरशीने तयार केलेल्या विषारी घटकांना मायकोटॉक्सीन असे म्हणतात. असे मायकोटॉक्सीनयुक्त खाद्य किंवा चारा जनावरांनी खाल्ल्यामुळे त्यांना त्याची हलकी विषबाधा होते. याचे परिणाम लगेच दिसत नसले तरी दूध उत्पादनात अनपेक्षित घट, दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम व यकृत खराब होणे ही लक्षणे दिसून येतात. 
  •  बुरशीयुक्त सायलेज ब्र्युअरी वेस्ट किंवा ओले बिअर वेस्ट, ज्यादा पाणीयुक्त पशुखाद्यावर बुरशीचा प्रादुर्भाव लगेच होतो. रवंथ करणारी जनावरे, चारा, कृषी उत्पादनाचे उपपदार्थ, प्रक्रिया केलेला कच्चा माल खात असल्यामुळे ते मायकोटॉक्सीनयुक्त खाद्यामुळे होणाऱ्या आजारांना लवकर बळी पडतात.
  •  अॅसपरजीलस बुरशी अफलाटॉक्सीन तयार करते, फ्युजारीयम बुरशी झीरेलिनोन, टी-२ टॉक्सीन व फुमोनिसीन तयार करते. पेनिसिलियम नावाची बुरशी ओक्राटॉक्सीन व रोग्यूफोतीन-सी असे विषारी घटक तयार करते. बुरशीने खराब झालेले खाद्य चारा यावर एकापेक्षा जास्त बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. सदर टॉक्सीनचे अंश दुधावाटेही बाहेर येतात, जे मनुष्याला हानिकारक असतात.
  •     रवंथ करणाऱ्या जनावरांना बुरशीजन्य रोगांपासून वाचण्यासाठी नैसर्गिक प्रतिकार क्षमता असते, परंतु दुधाचा ताण असणारी जनावरे, वासरे, आजारी जनावरे लवकर बळी पडतात.   
  •     जनावरांची भूक कमी होणे, पचनक्षमता कमी होणे, कोठीपोटातील किण्वन प्रक्रियेला बाधा येणे, अनियमित माज, रोगप्रतिकारशक्ती खालावणे, प्रजनन क्षमता कमी होणे, रखरखीत त्वचा इ. विपरीत परिणाम मायकोटॉक्सीनमुळे दिसतात. या परिणामांचे मूळ लवकर सापडत नाही, त्यामुळे रोगांचे निदान लवकर होत नाही.
  •     पशुखाद्य किंवा चाऱ्याच्या थोड्या भागाला बुरशी लागत असल्यामुळे प्रयोगशाळेतील खाद्य विश्लेषणात ती लवकर दिसून येत नाही. बुरशी किंवा त्यांनी तयार केलेल्या मायकोटॉक्सीनसचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी प्रयोगशाळेतील चाचण्या सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. तसेच सर्व प्रकारचे मायकोटॉक्सीन ओळखण्यासाठी चाचण्या अजूनही तयार झालेल्या नाहीत. बुरशीच्या बिजाणूची संख्या बुरशीची ओळख पटविण्यासाठी सहाय्य करतात. 
  •  पशुपोषण व्यवस्थापनातून बुरशी व मायकोटॉक्सीनसचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो. कच्चा माल खरेदी करताना नऊ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रतेचा असल्यास उत्तम ठरते.
  •  खाद्यातून परिपूर्ण प्रथिने, ऊर्जा, तंतुमय पदार्थ, खनिजे, रोगप्रतिकारक्षमता वाढविणारे आयुर्वेदिक अर्क, सिद्ध टॉक्सीन बाइंडर व बफर यांचा वापर आवश्यक ठरतो. याबरोबरच पशुखाद्यावर किंवा चाऱ्यावर दिसणारी पांढरी, गुलाबी, राखाडी वा काळी बुरशी, डाग असलेला मका जनावरांच्या खाद्यामध्ये देऊ नये.
  • जैवसुरक्षितता प्रणाली 

  •     नवीन जनावर गोठ्यामध्ये आल्यास रोग पसरण्याची जोखीम वाढते, म्हणून पहिले तीन आठवडे नवीन जनावराला वेगळे बांधावे. त्याची नियमित तपासणी पशुवैद्यकाकडून करून घ्यावी. 
  •     गोठ्यातील माणसांच्या सवयीदेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. घरचे लोक किंवा कामगारांना स्वच्छ हात धुवून दूध काढण्याची सवय लावावी. 
  •     आगंतुक, गोठ्याला भेट देणारे पाहुणे यांना थेट गोठ्यात प्रवेश देऊ नये. भेट देणाऱ्या पाहुण्यांचे हात, चपला बुटाचे निर्जंतुकीकरण करून त्यांना आत जाऊ द्यावे. 
  •     गोठ्यामध्ये उंदीर, घुशी, माशा, डास हे रोगांचा प्रसार करतात. त्यांचे नियंत्रण करावे. 
  •     गोठा बंदिस्त ठेवावा. मुक्त संचार गोठासुद्धा कुंपण घालून बंदिस्त करता येतो. जेणेकरून आगंतुक इतर मार्गाने गोठ्यात प्रवेश करणार नाहीत. 
  •     जनावरे विकत घेताना आरोग्य तपासणी करावी. शक्य झाल्यास जनावरांचा पूर्व इतिहास तपासावा.
  •     जीवाणू व विषाणूनाशक औषध तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावीत. त्याची आठवड्यातून एक वेळेस गोठ्यामध्ये फवारणी करावी.
  •  गोठ्यावर येणाऱ्या लोकांसाठी फूट बाथ व गाड्यांसाठी टायर बाथ किंवा स्प्रे वापरून त्यांचे निर्जंतुकीकरण करावे. 
  • कासदाहाला प्रतिबंध करण्यासाठी दूध काढण्याअगोदर आणि नंतर कास स्वच्छ करून खाद्य सुरक्षित (फूड सेफ) जंतुनाशक द्रावणात डीपकपद्वारे चारही सड बुडवून घ्यावेत. जेणेकरून स्वच्छ दूध उत्पादनाला हातभार लागेल. कॅलिफोर्निया मस्टायटीस टेस्ट कीटच्या माधमातून प्रादुर्भाव होणारे जनावर अगोदरच ओळखून औषधोपचार सुरू करावेत.
  •  विषाणूनाशक, जीवाणूनाशक, बुरशीनाशक औषधे प्रमाणित केलेली असावीत. ती खाद्यसुरक्षित असल्याची खात्री करावी. त्याचा कुठलाही अंश दुधामध्ये आल्यास जनावरे, मनुष्याला ते अपायकारक नाही याची खात्री करावी.
  •  जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशी, वासरे, रोगप्रतिकार क्षमता कमी असलेली जनावरे रोगांना लवकर बळी पडतात, म्हणून त्यांची विशेष काळजी घ्यावी.
  •     गव्हाणीमध्ये कधीही पाय ठेवू नये.
  •     मेलेले जनावर तसेच पडलेल्या वाराची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.  
  •     पशुखाद्य व चारा यांच्यासोबत कीडनाशके, खतांची साठवणूक करू नये. 
  •     गोठा नियमितपणे स्वच्छ करावा, जनावरांना बसण्यासाठी रबर मॅटस असतील तर त्यांच्याखालील भागाची स्वच्छता करावी. 
  •     गोठ्यातील सर्व भांडी, दूध काढणी यंत्र, इतर उपकरणे यांचे नियमित निर्जंतुकीकरण करावे. 
  •     गोठ्यात काम करणाऱ्या माणसे, कामगारांना टीटॅनसची लस टोचून घ्यावी. जनावरांचे वेळेवर लसीकरण करावे.
  • -  डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९ (लेखक पशुपोषण व दुग्ध-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com