द्राक्षबागेत पावसामुळे उद्भवलेल्या अडचणींवरील उपाययोजना

द्राक्ष फुलांवरील टोपण गळून होणारी घडांची कूज.
द्राक्ष फुलांवरील टोपण गळून होणारी घडांची कूज.

गेल्या आठवड्यात बऱ्याच भागांत अतिवृष्टीसारखी पावसाची स्थिती होती. यापूर्वीच्या पावसामुळे बागेत झालेले नुकसान किंवा त्यामुळे उद्भवलेल्या अडचणीतून बाहेर येण्यापूर्वी पुन्हा  पाऊस सुरू झाला. परिणामी द्राक्षबागेतील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सध्याच्या अडचणी आणि संभाव्य उपाययोजनांबाबत आजच्या लेखात माहिती घेत आहोत.

कुजेची समस्या 

  • घड कुजेची समस्या असलेल्या बागेमध्ये दाट कॅनोपी हेच कारण जास्त प्रमाणात दिसून येते. जास्त पावसामुळे वेलीचा वाढत असलेला जोम पानाची लवचिकता वाढवतो. यामुळे प्रकाश संश्लेषणास बाधा निर्माण होते. तसेच दोडा अवस्थेतील घडामध्ये साचलेल्या पाण्याच्या थेंबामुळे कुजेची समस्या निर्माण होते. या वेळी कॅनोपी मोकळी करून शक्य तितक्या लवकर पालाशच्या २ ते ३ फवारण्या कराव्यात. यासाठी पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे एक फवारणी किंवा २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे २ ते ३ फवारण्या कराव्यात. शेतकरी अनेक वेळा आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाण घेऊन फवारणी करतात, परिणामी पानावर स्कॉर्चिंग दिसून येते. अशी पाने पुढील काळामध्ये उपयोगी राहत नाहीत. 
  •    या वेळी महत्त्वाचे म्हणजे घडातून पाणी निघून जावे, याकरिता शक्य झाल्यास ब्लोअर फिरवणे फायद्याचे ठरेल. यासोबत काडीच्या बगलफुटी व तळातील २-३ पाने कमी करावीत. 
  •  पाने पिवळी झाली असल्याची स्थिती अनेक ठिकाणी दिसते. अशा बागेमध्ये युरिया दीड ते दोन ग्रॅम अधिक झिंक सल्फेट अर्धा ते ०.७५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. कॅनोपी वाढ पाहूनच मात्रा कमी-जास्त करावी. या फवारणीनंतर लगेच फेरस सल्फेट २ ते २.५ ग्रॅम अधिक मॅग्नेशिअम सल्फेट दीड ते २ ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी. 
  • बोदामध्ये पाणी साचणे 

  • बऱ्याचशा बागेत बोदामध्ये पाणी साचलेले दिसून येते. पुढील काळात घडाच्या विकासात आवश्‍यक असलेली पांढरी मुळे याच बोदामध्ये तयार होतात. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जुनी मुळे कार्य करणे बंद झाले. परिणामी ही मुळे काही ठिकाणी काळी पडली, तर काही ठिकाणी कुजलेली दिसून आली. कोणत्या भागात पाऊस किती प्रमाणात झाला यावर या बोदामधील मुळांची कमी अधिक परिस्थिती असेल. मात्र, बऱ्याच बागेत ही मुळे खराब झाल्याचे दिसते.
  • बागेत झालेल्या पावसामुळे मुळांच्या कक्षेत दिले गेलेले अन्नद्रव्य वाहून गेले. याचसोबत अति पावसामुळे मुळांनी कार्य करणे बंद केले. अशा स्थितीमध्ये बागेत वेलीची वाढ होत असली तरी पाने पातळ, निस्तेज व पिवळी पडलेली दिसून येतील. जोपर्यंत बोद मोकळा होत नाही, तोपर्यंत बागेत खतांचा पुरवठा करणे फायद्याचे नाही. सततच्या पावसामुळे जमिनीतील असलेल्या मातीच्या प्रत्येक कणामध्ये पाणी साचले आहे. परिणामी मुळांनी काम करणे बंद केले आहे. त्यानंतर बागेत वेलीच्या वरच्या भागात उदा. काडी, खोड व ओलांडा यावर मुळ्या निघालेल्या दिसतील. वेलीने स्वतःच्या बचावाकरिता ही तात्पुरती व्यवस्था आहे. त्यानंतरच्या कालावधीत बोदामधील मुळी कार्य करणे गरजेचे आहे.
  • ज्या बागेत लवण भाग आहे किंवा काळी जमीन आहे, अशा बागेत जास्त प्रमाणात पाणी जमा झाले असेल. अशा बागेत दोन ओळींमध्ये नांगराच्या साहाय्याने चारी घ्यावी. म्हणजे बोदामधून पाणी चारीत येऊन जमिनी वापसा स्थितीत लवकर येतील. बागेत परिस्थिती कुठलीही असली तरी खतांचा वापर मात्र वापसा आल्यानंतरच करावा. बागेत बोद ओलसर किंवा घट्ट असल्यास मातीची रचना बदलली असेल. त्यामुळे पुढील काळात पांढरी मुळी तयार होण्यास अडचणी येतील. मातीच्या अशा रचनेमुळे जमिनीत हवा खेळती राहणार नाही, तसेच बोदामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीस अडचण येतील. 
  • जास्त दाट कॅनोपी असलेली बाग 

  • ज्या बागेत पावसाळी वातावरणात फेलफुटी काढणे शक्य झाले नाही, अशा बागेत दाट कॅनोपी तयार झाली आहे. तसेच सध्याच्या पावसामुळे वेलीवर बगलफुटीसुद्धा अधिक प्रमाणात दिसतील. परिणामी कॅनोपीमध्ये गर्दी वाढून आर्द्रतेचे प्रमाण ८० ते १०० टक्क्यांपर्यंत पोचलेले असेल. अशा गर्दीमध्ये पाऊस आल्यास दोडा अवस्थेतील घडामध्ये पाणी साचल्यामुळे फुलावरील टोपण चिकटले असेल. परिणामी घडाची कूज होताना दिसून येईल. 
  • या वेळी वेलीच्या वाढीचा जोम जास्त असतो. अशा वेळी फुटींची विरळणी महत्त्वाची असते. यामुळे कॅनोपीमधील आर्द्रता कमी होईल व उपलब्ध पाने प्रकाश संश्‍लेषण चांगल्या प्रकारे करतील. या वेळी वेलीच्या वाढीचा जोम कमी करण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश (एसओपी) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. जर जमिनीतून सल्फेट ऑफ पोटॅश द्यायचे असल्यास बोदावर अशा प्रकारे द्यावे की ते पाण्याद्वारे उपलब्ध होईल आणि मातीची रचनासुद्धा बिघडणार नाही. 
  • ज्या बागेत ५ ते ७ पाने अवस्था आहे, अशा बागेमध्ये पाऊस थांबल्यानंतर मॅग्नेशिअम सल्फेट दीड ते दोन ग्रॅम अधिक झिंक सल्फेट अर्धा ग्रॅम अधिक बोरीक अॅसिड अर्धा ग्रॅम प्रति लीटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. जमिनीची वापसा स्थिती असल्यास सिंचनाद्वारे झिंक सल्फेट, मॅग्नेशिअम सल्फेट व बोरीक अॅसिडची उपलब्धता करावी. 
  • दोडा अवस्थेतील गळ  

  • बऱ्याचशा बागेमध्ये गळीची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. दोडा अवस्थेपासून सुरू होत असलेली गळ जवळपास फुलोरा ते मणी सेटिंगच्या अवस्थेपर्यंत चालत असल्याचे दिसले. गळीची समस्या निर्माण होण्याकरिता खालील गोष्टी महत्त्वाच्या असतील.
  •    पाऊस जास्त प्रमाणात झाला.
  •    शेंडावाढ जास्त जोरात आहे.
  •    कॅनोपीची गर्दी जास्त झाली आहे. 
  • जेव्हा वेलीवर असलेल्या कॅनोपीमध्ये दमट वातावरण निर्माण होते, त्या वेळी दोडा अवस्थेत असलेल्या घडाचा नाजूक देठ अशक्त होतो. त्यानंतर गळायला सुरवात होते. कधी कधी एक ते दोन दिवसात पूर्ण घड खाली झालेला दिसतो. 
  • हे टाळण्यासाठी वेलीचा जोम कमी करणे आवश्यक आहे. याकरिता शेंडा पिंचिंग करणे, पालाशची फवारणी (२.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर - दोडा अवस्था) व सायटोकायनीनयुक्त संजीवकांची फवारणी (०.७५ ते १ मिलि प्रति लिटर पाणी) या उपाययोजना महत्त्वाच्या  ठरतील. 
  • -  ०२०-२६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com