गाभण जनावरांकडे द्या लक्ष

गाभण जनावरांचे स्वतंत्र गोठ्यात व्यवस्थापन ठेवावे.
गाभण जनावरांचे स्वतंत्र गोठ्यात व्यवस्थापन ठेवावे.

पावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात. याचबरोबरीने जनावरांच्या प्रजननात बदल घडून येतो. गाई, म्हशीतील ताण कमी करणे, प्रजनन प्रक्रियेवर लक्ष द्यावे. भरपूर पाणी, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, संतुलित खाद्याचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा.

अधिक दूध उत्पादनाकरिता दुधाळ गाई, म्हशीतील प्रजनन सक्षम असणे महत्त्वाचे आहे. माजाचे नियोजन, म्हणजेच योग्य माज ओळखणे आणि वेळेवर रेतन करणे गर्भधारणेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. विण्याची प्रक्रिया सुलभ होणे, कालवडी लवकर वयात येणे किंवा गर्भधारणा होण्याकरिता सक्षम असणे गरजेचे असते. व्याल्यानंतर ८५ दिवसांत पुन्हा गर्भधारणा होणे, वंध्यत्वाचे प्रमाण व इतर प्रजननविषयक अडथळे फायदेशीर व्यवसायाच्या दृष्टीने कमी असणे गरजेचे असते.

वातावरण बदलानुसार प्रजननातील बदल 

  • उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे तीन ऋतू मध्ये प्रजननविषयक बाबीमध्ये अनेक वेगवेगळे बदल होत असतात. त्यामुळे वातावरणातील बदलानुसार प्रजनन कार्यात बराच बदल दिसून येतो.
  •  तीव्र माज येणे अथवा मुका माज, माजेवर न येणे, वारंवार उलटतात.
  •  गर्भधारणा होणे अथवा न होणे.
  •  गर्भपात होणे किंवा विण्याच्या प्रक्रियेतील बदल होतो. या व इतर अनेक बाबींमध्ये बदल दिसून येतो.
  • प्रजनन संस्थेतील बदल 

  •  कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होतो. त्यानुसार जनावरांतील व्यवस्थापनात बदल केला पाहिजे.
  •  सर्व साधारणपणे जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. या दरम्यान बहुतांश जनावरे गाभण असतात आणि विण्याचा काळ या दरम्यानच असतो.
  • गाभण जनावरांची काळजी 

  •  वासरांची गर्भाशयातील वाढ, पुढच्या वेतात दूध उत्पादन, तंदुरुस्त वासरांची निर्मिती व व्याल्यानंतर गर्भाशायचे आरोग्य हे सर्व प्रसूतिपूर्व जनावरांचे व्यवस्थापनावर अवलंबून असते. 
  •  दोन ते अडीच महिन्यांनी तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून ती तपासून गाभण असल्याची खात्री करून घ्यावी. 
  •  गाभण असल्यास रेतनाच्या तारखेवरून ती सर्वसाधारणपणे कोणत्या तारखेला विणार हे निश्‍चित करता येते. जनावरे विण्याची तारीख नोंदवावी.
  •  गायीचा गाभण काळ ९ महिने ९ दिवस (२८० दिवस) तर म्हशीतील १० महिने १० दिवस (३१० दिवस) असतो.
  •  गाभण जनावरे सर्वप्रथम इतर जनावरांपासून वेगळे करावे. 
  • गर्भाशयातील वासरांची वाढ  

  • गर्भधारणा झाल्यापासून गर्भाशयात वासराची वाढ पहिले सहा महिने हळूहळू होत असते, तसेच याच काळात गाई-म्हशी दूधही देत असतात. त्यामुळे त्यांना नियमित अधिकचा समतोल आहाराचा पुरवठा करावा. त्याचा उपयोग गर्भ वाढीलाही होतो. 
  •  गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाची वाढ फार झपाट्याने होत असते. म्हणून शेवटचे तीन महिने गाभण जनावरे आणि गर्भ या दोघांच्याही दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. या काळात जनावरांचे दूध कमी होते, त्यामुळे याच काळात पशुपालकांकडून गाभण जनावरांकडे दुर्लक्ष होते.
  • गाभण गाई, म्हशींचा आहार 

  •  गाभण जनावरांना शरीरात मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि प्रथिने साठवून ठेवणे गरजेचे असते. यांचा उपयोग त्याच्या दैनंदिन शारीरिक वाढीसाठी, गर्भाच्या पोषणासाठी, कासेमध्ये चीक तयार करण्यासाठी, व्यायल्यानंतर प्रथम दुग्ध काळासाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आणि इतर शारीरिक क्रियांसाठी होतो.
  •  शरीरातील घटकांची पूर्तता न झाल्यास गाभण जनावरे अशक्त होतात. गर्भपात होण्याची शक्‍यता असते. वासरू कमी वजनाचे जन्माला येते, विताना त्रास होतो, वार वेळेवर पडत नाही, दूध उत्पादन क्षमता कमी होते. 
  •  गाभण जनावरांना आहारातून आवश्‍यक ती प्रथिने, ऊर्जा, क्षार, जीवनसत्त्वे आणि स्वच्छ पाणी देणे आवश्‍यक असते. त्यासाठी गाभण जनावरांना नेहमीचा चारा, वैरण आणि शरीर पोषणासाठी आवश्‍यक असलेला दोन किलो पशुखाद्याशिवाय एक ते दोन किलो अधिक पशुखाद्य त्याबरोबर मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी द्यावे. 
  •  गाभण जनावरांना रोज थोडा चालण्याच्या व्यायामाची अत्यंत जरूरी असते, यामुळे प्रसूतिच्या वेळी जनावरांना त्रास होत नाही.
  • पावसाळ्यात विणाऱ्या गाई, म्हशींची निगा 

  •  शेवटच्या दोन महिन्यांत गाभण गाई, म्हशींचे दूध आटविण्याची प्रक्रिया करावी. 
  •  शेवटचे तीन आठवडे शेतात, तसेच डोंगर भागात चारण्यासाठी पाठवू नये.
  •  गाभण जनावरे गोठ्यात स्वतंत्र बांधावे. गोठ्यातच चारा-पाण्याची व्यवस्था करावी. 
  • गोठ्याचे व्यवस्थापन  

  • पावसाचे पाणी गोठ्यात येऊ नये याची खात्री करावी. गोठाचे छत पाणी गळणारे नसावे.
  •  गोठा स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर असावा. गोठ्याला जास्त उतार नसावा. 
  •  गोठ्यात जास्तीचा उतार असल्यास गर्भाच्या वजनामुळे मायांग बाहेर येण्याची शक्‍यता असते. 
  •  गोठ्यात गाभण जनावरांना बसण्यासाठी गवत किंवा चुणीचा गादीप्रमाणे वापर करावा.
  •  या काळामध्ये गाभण जनावरांवर कोणताही प्रकारचा ताण तणाव येऊ नये याची काळजी घ्यावी.
  •  विल्यानंतर पुन्हा जनावरांचा माज योग्य वेळी येण्याकरिता, विताना योग्यरीत्या काळजी घ्यावी. पशुवैद्यकाकडून तपासणी करावी.
  • - डॉ. अनिल पाटील, ७५८८०६२५५६ (सहायक प्राध्यापक (पशुप्रजननशास्त्र), पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com