शेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ मिळाले, की महिला देखील शेतीमध्ये वेगळेपण
कृषिपूरक
संगोपन जातिवंत गोवंशाचे
आज वसुबारस... प्राचीन काळापासून या दिवशी गोधनाची (गायी व वासरू) पूजा केली जाते. आजही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशू हे अनमोल धन आहे. व्यावसायिक पशुपालनात गायींची संख्या आणि उत्पादकता महत्त्वाची असते. त्यामुळे गोधनाची शास्त्रोक्त पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे.
आज वसुबारस... प्राचीन काळापासून या दिवशी गोधनाची (गायी व वासरू) पूजा केली जाते. आजही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशू हे अनमोल धन आहे. व्यावसायिक पशुपालनात गायींची संख्या आणि उत्पादकता महत्त्वाची असते. त्यामुळे गोधनाची शास्त्रोक्त पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे.
नुकत्याच झालेल्या १९ व्या पशुगणनेनुसार देशात गोवंशाची संख्या वाढल्याचे पाहायला मिळाले. गोवंशाची संख्या २०१२ या वर्षी १९०.९० दशलक्ष होती. ती वाढून २०१९ मध्ये १९२.४९ दशलक्ष इतकी वाढलेली आहे. यामध्ये गायींच्या संख्येत १८ टक्के वाढ आणि बैलांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळते. यामध्ये संकरित गायींची २६.९ टक्क्यांनी वाढ होऊन, देशी गायींची संख्या ६ टक्के कमी झाली आहे. वातावरणाशी समरूप होण्याची उत्तम क्षमता देशी गायींमध्ये जास्त असते,
याउलट संकरित गायींमध्ये ही क्षमता कमी असते.
वासरांचे शास्त्रोक्त संगोपन
- जन्मल्यानंतर दोन तासांच्या आतमध्ये नवजात वासरांना त्यांच्या वजनाच्या १० टक्के प्रमाणात चीक पाजवा. वासरू पिण्यास असमर्थ असल्यास, स्वच्छ बाटलीमध्ये चीक काढून काळजीपूर्वक पाजावा.
- गाय विताना परिसर स्वच्छ ठेवावा. यामुळे नवजात वासराला होणारे अतिसार, फुफ्फुसदाह व सांधेदुखी सारखे संसर्गजन्य आजार टाळता येतात.
- वासराची नाळ १ इंच शिल्लक ठेवून निर्जंतुक कात्री किंवा ब्लेडने कापून, त्याला आयोडीनचे द्रावण लावावे. नाळ पूर्ण गळेपर्यंत गायीच्या चाटण्याने किंवा ती कडक झाल्यामुळे त्या जागेवर इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- वासराला जन्मल्यानंतर ३-६ दिवसांत, त्यानंतर ६ महिन्यांपर्यंत दर महिन्याला व त्यापुढे वर्षातून ३ वेळा जंतनाशक देण्यात यावे.
- वयाच्या ३ महिन्यांपर्यंत आहारात दूध (वजनाच्या १० टक्के) व काही प्रमाणात चारा याचा समावेश खाद्य म्हणून करावा. यामुळे वाढीचा दर चांगला राहण्यास मदत होते.
- तीन महिने वयापासून घटसर्प, फऱ्या, लाळ्या-खुरकत या प्रतिबंधात्मक लसींचे लसीकरण नियमितपणे करावे. यामुळे संसर्गजन्य आजार टाळता येतात.
- प्रादुर्भावग्रस्त परिसरात मादी वासरांना संसर्गजन्य गर्भपात प्रतिबंधात्मक लसींचे लसीकरण ६ ते ८ महिने वयापर्यंत एकदा तरी करून घ्यावे.
- वासरांना पिण्यासाठी योग्य प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.
- वासरांमध्ये रक्ती हगवण हा आजार न होण्यासाठी, गोठा हवेशीर व कोरडा ठेवणे गरजेचे आहे. तसेच चारा व पाणी शेणाने दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी.
- अतितीव्र वातावरण जसे की थंडी, पाऊस, कडक ऊन यांपासून वासरांना जपावे.
आहार आणि आरोग्य व्यवस्थापन
- शास्त्रोक्त व्यवस्थापन केल्यामुळे प्रजनन व दुग्धोत्पादन उत्तम राहते.
- गरजेनुसार पोषक घटक पुरविणारे चारा व खाद्य, दुधाच्या प्रमाणात २.५ ते ३ लिटर दुधासाठी १ किलो खुराक द्यावा.
- किफायतशीर दूध व्यवसाय व उत्तम आरोग्यासाठी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करून, त्यामध्ये कोंबड्या सोडाव्यात. कोंबड्या गोठ्यातील किडे, गोचिड नियंत्रण करतात.
- गोठ्याची स्वच्छता योग्यप्रकारे ठेवावी. त्याद्वारे संसर्गजन्य आजार टाळता येतात.
- दुभत्या गायींच्या कासेची योग्य ती काळजी घ्यावी, जेणेकरून कासदाह आजारास प्रतिबंध घालता येईल.
- पशुवैद्यकाच्या सल्ल्याने नियमितपणे प्रतिबंधात्मक लसीकरण व जंतनिर्मुलन करावे.
- गोठ्यात स्वच्छता ठेवल्यामुळे परजीविचा प्रादुर्भाव टाळता येतो.
- चांगले उत्पादन व प्रजननविषयक आरोग्यासाठी आहारात नियमितपणे खनिजक्षार मिश्रणाचा (२५ ते ५० ग्रॅम) वापर करावा.
- आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नियमितपणे गायींचा विमा उतरवावा.
- प्रजननासाठी उच्च प्रतीच्या जातिवंत वळुच्या रेतमात्राचा वापर करावा. यामुळे नवीन पिढीमध्ये ते गुण संक्रमित होतात.
- विण्याच्या किमान ६० दिवस अगोदर गाय दुधातून आटवावी. तिला आटवत असताना कासदाह नियंत्रणासाठी सडात पशुवैद्यकाकडून प्रतिजैविक औषधे सोडावीत.
- गाभणकाळातील शेवटचा महिना व विल्यानंतर सुरवातीच्या काळामध्ये आहार व व्यवस्थापनाची योग्य काळजी घ्यावी. जेणेकरून गायी आजारी पडणार नाहीत.
- डॉ. रवींद्र जाधव : ९४०४२७३७४३
- डॉ. अनिल भिकाने : ९४२०२१४४५३
(चिकित्सालयीन औषधशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
- 1 of 34
- ››