संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रे

सद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या पिढीनंतर दूध उत्पादकता कमी होत आहे. तसेच रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन त्या लवकर आजारी पडतात. हे लक्षात घेऊन संकरित गाईंच्या व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक आहे.
article regarding cattle management
article regarding cattle management

सद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या पिढीनंतर दूध उत्पादकता कमी होत आहे. तसेच रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन त्या लवकर आजारी पडतात. हे लक्षात घेऊन संकरित गाईंच्या व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक आहे. दूध उत्पादन वाढीमध्ये संकरित गाईंचा प्रमुख वाटा आहे. देशाच्या एकूण दूध उत्पादनातील सुमारे २७ टक्के इतके दूध हे संकरित व पूर्ण विदेशी गाईंपासून तयार होते. देशातील देशी गाईची प्रतिदिन प्रतिगाय दूध उत्पादकता ३.७३ किलो आणि गावठी गाईंची २.४१ किलो आहे. याउलट विदेशी गाईंची प्रतिदिन प्रतिगाय दूध उत्पादकता ११.४८ किलो आणि संकरित गाईची ७.६१ किलो आहे. संकरित गाईंच्या प्रजनन क्षमतेत सुधारणा झाली. यामध्ये प्रथमतः विण्याचे वय, भाकड काळ, दोन वितांमधील अंतर लक्षणीयरित्या कमी झाले. उत्पादकता वाढल्यामुळे देशी गाईंच्या तुलनेत प्रति लिटर दूध उत्पादनावरील खर्च कमी झाला. संकरीकरणाच्या सुरुवातीच्या अडीच दशकांमध्ये हे फायदे प्रामुख्याने दिसून आले; परंतु गेल्या दशकापासून यामधील उणिवा आणि त्याचा एकूण दूध उत्पादकतेवर होणारा विपरित परिणाम लक्षात येत आहे. सद्यःस्थितीतील संकरित गाईमध्ये दुसऱ्या-तिसऱ्या पिढीनंतर दूध उत्पादकता कमी होत आहे. या गाईची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन त्या जिवाणू व विषाणूजन्य आजारास लवकर बळी पडतात. उदा. कासदाह, लाळ्या खुरकूत, गोचिड ताप इत्यादी. याशिवाय त्यांची उष्ण हवामानात तग धरून राहण्याची क्षमता उल्लेखनीयरित्या कमी झाली आहे. वाढत्या खाद्य किमती, व्यवस्थापन खर्च आणि अनिश्‍चित दूध दरामुळे पशुपालकांच्यासमोर आर्थिक अडचणी आहे. हे सुधारण्यासाठी व्यवस्थापनामध्ये बदल आवश्यक आहेत.

  • मुळात संकरीकरण धोरण हे चुकीचे नव्हते; परंतु हे धोरण राबविताना सुसूत्रीकरणाचा अभाव व प्रत्यक्ष संकरीकरण करताना पशुपालक आणि तज्ज्ञांच्याद्वारे जाणते - अजाणतेपणे झालेल्या चुकांचा परिणाम दूध उत्पादकता कमी होण्यावर झाला. यातील प्रमुख कारण म्हणजे स्वैर संकरीकरण.
  • आपल्याकडील गाईचे अनुवांशिक गुणधर्म विचारात न घेता वेगवेगळ्या पिढींमध्ये वेगवेगळ्या जातींचा (होल्स्टिन फ्रिझीयन/ जर्सी) आणि अनुवांशिक गुणधर्म (टक्केवारी) असलेल्या वळूचा वापर, जास्त विदेशी जातीची टक्केवारी म्हणजे जास्त दूध हा गैरसमज. या सर्वांमुळे संकरित गाईमध्ये अपेक्षित विदेशी गाईचे गुणधर्म राखता आले नाहीत.
  • उच्चतम क्षमता असलेल्या सिद्ध वळूंची कमतरता, योग्य व्यवस्थापनाचा अभाव हे घटकसुद्धा उत्पादकता कमी होण्यास कारणीभूत ठरले.
  • उपाययोजना 

  • संकरित गाईंची उत्पादकता वाढविणे आणि पुढील पिढीत अनुवांशिक सुधार करून उत्पादकता वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे.
  • सद्यःस्थितीतील संकरित गाईंचे अनुवांशिक गुणधर्म निश्‍चित झाले असल्यामुळे त्यामध्ये बदल करता येत नाही. या गाईंचे दूध उत्पादन योग्य व्यवस्थापन करून वाढविता येऊ शकते.
  • संकरित गाईंच्या अनुवांशिक क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी त्यांना दूध उत्पादन क्षमतेनुसार चारा व खाद्य द्यावे. अशा गाईस उच्च पोषणमूल्य असलेला एकदलवर्गीय (मका, ज्वारी, ओट इत्यादी) आणि द्विदलवर्गीय (ल्युसर्न, बरसीम इत्यादी) हिरवा चारा वर्षभर देणे आवश्‍यक असते. याचबरोबर सुका चारा व प्रथिनयुक्त खुराक, खाद्य त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार (४०० ग्रॅम/ लिटर) द्यावे.
  • आरोग्य व्यवस्थापन (उदा. लसीकरण, प्रथमोपचार व विलगीकरण), गोठा व्यवस्थापन (मुक्त पद्धतीचा गोठा) आणि बारकाईने इतर दैनंदिन व्यवस्थापन केल्यास या गाईंची उत्पादकता वाढू शकते.
  • आनुवंशिक सुधारणा  भारत दूध उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांकावर असला, तरी आपल्या गाईंची दूध उत्पादकता (८ ते ११ कि.ग्रॅ.) ही प्रगत राष्ट्रांतील गाईंच्या तुलनेत (३० ते ३५ कि.ग्रॅ.) खूपच कमी आहे. उच्च आनुवांशिक गुणधर्म असलेले वळू व गाई, योग्य पशुपैदास धोरण व सुयोग्य व्यवस्थापन या त्रिसूत्रीचा वापर करून आनुवांशिक सुधारणा शक्य आहे. यामध्ये पशुपालकाची भूमिका महत्त्वाची आहे.

  • पशुपालकांनी आपल्या कळपातून सर्वाधिक दूध देणाऱ्या, वर्षातून एकदा विणाऱ्या, रोगास कमी बळी पडणाऱ्या जातिवंत गाईंची निवड पैदाशीसाठी करावी. ही निवड करण्यासाठी गाईंच्या उत्पादन व प्रजननासंबंधीच्या अद्ययावत नोंदी असणे महत्त्वाचे असते.
  • संकरित गाईंचे आनुवांशिक गुणधर्म (देशी व विदेशी जातींची टक्केवारी) माहिती असेल तर योग्य वळूच्या रेतमात्रांचा वापर करता येतो.
  • प्रत्येक गाईचे दूध उत्पादन, वंशावळ (आई-वडिलांची उत्पादनक्षमता), प्रजनन, आरोग्य व दैनंदिन व्यवस्थापन संबंधित अद्ययावत नोंदी ठेवाव्यात. दुधातील घटक (फॅट, एस.एन.एफ.) यांच्याही नोंदी ठेवाव्यात. या नोंदींच्या आधारेच उत्कृष्ट जनावरांची निवड व अनुवंश सुधारणा करणे शक्‍य होते.
  • पंजाबमधील पशुपालकांनी संघटित प्रयत्न आणि योग्य पैदास धोरण राबवून उच्च दूध उत्पादन क्षमतेच्या संकरित गाई गोठ्यात विकसित केल्या आहेत. हे आपल्यालाही शक्‍य आहे.
  • सेक्‍स सॉर्टेड रेतमात्रेचा वापर 

  • गोठ्यात जन्माला येणारे वासरू हे कालवड (मादी) असावे ही शेतकऱ्यांची इच्छा असते.
  • आधुनिक तंत्राद्वारे केवळ मादी वासरू होण्याची क्षमता असलेल्या शुक्राणूयुक्त रेतमात्रा उपलब्ध आहेत. सध्या या रेतमात्रेची किंमत जास्त वाटेल परंतु अनावश्‍यक जन्माला आलेल्या नर वासराच्या संगोपनापेक्षा हा खर्च नगण्य आहे. हे तंत्रज्ञान निश्‍चितच भारतातील दुग्धव्यवसायाची दिशा बदलण्यास उपयुक्त ठरणारे आहे.
  • प्रजननासंबंधीच्या समस्या कमी करण्यासाठी एकत्रित माज नियंत्रण आणि शक्‍य असल्यास भ्रूण प्रत्यारोपण पद्धतीचा अवलंब करून गोठ्यातील गाईची उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न करावा.
  • संकरित गाईमध्ये विदेशी गाईच्या अनुवांशिकतेचे प्रमाण 

  • विविध अभ्यासांतर्गत असे आढळून आले आहे, की ५० ते ६२.५० टक्के विदेशी गाईंचे (एच.एफ./ जर्सी) गुणधर्म असलेल्या संकरित गाईंची उत्पादकता उत्कृष्ट असते. म्हणूनच शासनानेसुद्धा आपल्या पशुपैदास धोरणात विदेशी गाईचे एवढेच प्रमाण ठेवावे, असे सुचविले आहे.
  • बागायती भागात एच.एफ. आणि दुष्काळी व डोंगराळ भागात जर्सी जातीचा संकरीकरणासाठी वापर करावा, असे सुचविले आहे.
  • साधारणपणे ७५ टक्के व त्यावरील विदेशी संकरित जनावरांची उत्पादनक्षमता ही कमी होत असल्यामुळे सामान्य पशुपालकांनी वरील ठरवून दिलेल्याच मर्यादा पाळाव्यात.
  • काही प्रगतशील शेतकरी १०० टक्के होल्स्टिन फ्रिझीयन जातीची गाय पाळतात. या गाईस अत्यंत उत्कृष्ट व्यवस्थापन पुरविणे गरजेचे आहे. जेणेकरून तिच्या उत्पादनक्षमतेचा पुरेसा वापर होईल. नाही तर नुकसानच होण्याची शक्‍यता जास्त असते.
  • पैदास वळूची निवड 

  • पुढील पिढीतील अनुवंश सुधारणेसाठी योग्य व उत्कृष्ट वळूची निवड हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रजननासाठी केवळ उच्चतम उत्पादकता असलेल्या सिद्ध वळूच्या (प्रोजेनी टेस्टेड) रेतमात्रा वापराव्यात.
  • अनुवांशिक गुणधर्म पुढील पिढीत प्रसारित करण्याची क्षमता व अचूकता ही इतर कोणत्याही पद्धतीने निवडलेल्या वळूपेक्षा सिद्ध वळूमध्ये जास्त असते. सद्यःस्थितीत भारतात सिद्ध वळूंची संख्या मर्यादित आहे; परंतु आता परदेशातून आयात केलेले उच्चतम उत्पादकता असलेल्या वळूंच्या रेतमात्रा उपलब्ध आहेत.
  • निवडलेल्या उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वळूच्या रेतमात्रा जातीवंत दुधाळ गाईसाठी वापराव्यात. यामध्ये एकच समस्या होऊ शकते ती म्हणजे या वळूंचे अनुवांशिक गुणधर्म व उत्पादनक्षमता पुढील पिढीमध्ये पूर्णपणे जातील हे खात्रीशीररीत्या सांगता येत नाही. याचे कारण म्हणजे या वळूंची सिद्धता ही परदेशी वातावरणात तपासलेली असते. आपल्याकडील स्थानिक वातावरण पूर्णपणे वेगळे आहे. यासाठी शक्‍य असल्यास स्थानिक वातावरणात निवड केलेल्या सिद्ध वळूच्या रेतमात्रेला प्राधान्य द्यावे.
  • संपर्क- डॉ. विक्रांत पवार, ९९८७२३८३७० डॉ. महादेव सवाणे ,९९८७२३८०२७ (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com