agriculture news in Marathi, article regarding conservation of Dangi cattle | Agrowon

जैव-सांस्कृतिक आत्मियता जाणून डांगी गोवंश संवर्धन

विजय सांबरे, डॉ. पांडुरंग खोत
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

अकोले तालुक्यातील (जि. नगर) कळसूबाई- हरिश्चंद्रगड परिसरात लोकपंचायत संस्था महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमाच्या माध्यमातून डांगी गोवंशाच्या संवर्धनावर काम करत आहे. डांगी जतन करणाऱ्या समूहांसोबतचा लोकसंवाद व अभ्यासासोबतून डांगी गोवंशासंबंधी समोर आलेल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आजच्या लेखात देत आहोत. 

अकोले तालुक्यातील (जि. नगर) कळसूबाई- हरिश्चंद्रगड परिसरात लोकपंचायत संस्था महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमाच्या माध्यमातून डांगी गोवंशाच्या संवर्धनावर काम करत आहे. डांगी जतन करणाऱ्या समूहांसोबतचा लोकसंवाद व अभ्यासासोबतून डांगी गोवंशासंबंधी समोर आलेल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आजच्या लेखात देत आहोत. 

स्थानिक लोक डांगीचे रंगसंगतीनुसार नऊ प्रकार सांगतात. बैलामध्ये बहाळा, वानेरा, खैरा, मन्यारा, तांबडा, पारा, गवळा, काळा असे प्रकार दिसतात. त्यापैकी बहाळा म्हणजे पांढऱ्या रंगावर मोठे काळे ठिपके असणारा बैल किंवा गोऱ्हा याला बाजारात सर्वाधिक मागणी आणि किंमत असते. गायींमध्ये मसुरी रंग हा महत्त्वाचा मानतात. मसुरी म्हणजे पांढऱ्या रंगावर अगदी लहान लहान काळे ठिपके. या व्यतिरिक्त किमान अर्धा फूट रुंद कपाळ, मोठे वशिंड, लांब शेप, मजबूत पाय, चपळ व तरतरीतपणा, आखूड बेंबी इ. लक्षणे तपासूनच जातीची निवड होते. या बाह्यरूपावरून निवड केल्या जाणाऱ्या बैलांमध्ये खरोखरच गुणात्मक फरक असतो का? एखादा वर्ण जास्त लोकप्रिय असल्यामुळे त्या बैलाचे भरण- पोषण जास्त केले जाते, परिणामत: त्यांची गुणात्मकता वाढते का? अशा प्रश्नांवर संशोधन करण्यास वाव आहे. 

डांगी गाय आणि दुधाचे अर्थकारण

  • डांगी वंशाच्या उत्तम बैलाच्या विक्रीतून चांगले पैसे मिळतात. शेतात मशागतीला उपयोग होतो म्हणून डांगी वंशाचे गोऱ्हे, बैलजोडी यांची चांगली जोपासना करण्याची पद्धत आहे. परंतु डांगी गाईच्या दूध उत्पादनाचे अर्थकारण केंद्रिभूत मानले जात नाही. गायीला लक्ष्मी म्हणत असूनही तिची जाणीवपूर्वक जोपासना करण्याचा दृष्टिकोन येथे नव्हता. विविध कार्यक्रम, बैठका, भेटी यांच्या माध्यमातून ‘उत्तम बैल उपजासाठी सुलक्षणी गाय’ यावर भर दिला.
  • गाय मुख्यत्वे उत्तम बैलाच्या पैदाशीसाठी पाळली जात असली तरी स्थानिक पातळीवर दूधविक्री व घरच्या घरी खवा तयार करण्याची व्यवस्था, याचा समावेश डांगी पालनातील अर्थकारणात होतो. 
  • डांगी गाईच्या आरोग्याच्या दृष्टीने इथले वातावरण अनुकूल आहे. ती डोंगराळ जंगलात फिरून चरू शकते, त्यामुळे तिच्यासाठी वेगळे गोठे बांधून चराईची विशेष व्यवस्था करावी लागत नाही. गुंतवणूक कमी असल्यामुळे दुधाचे गणितही फायद्याचे ठरते. पावसाळ्यानंतर मुबलक पाणी व जंगलातील चारा यावर कमी खर्चात डांगी पालन करता येते. फक्त उन्हाळ्यातील तीन महिने अडचणी येतात.

डांगी पालनात वापरल्या जाणाऱ्या वनौषधी

  • रानातील विविध चारा प्रकार व त्याचे वैविध्यपूर्ण महत्त्व डांगी पालक मोठ्या खुबीने सांगतात. अशक्त जनावराला आठ दिवस ‘सामरट’ या जंगली वेलीचा पाला चारला तर तरतरी येते. 
  • कारवीला सात वर्षांतून एकदा फुले येतात. नंतर त्याचे बोंडात रुपांतर होते. ही बोंडे गोडसर अशी मादक असतात. त्यांना स्थानिक लोक ‘कारवीच कैफ’ संबोधतात. ही बोंडे खाऊ घातल्यावर त्यातून मिळणारी ताकद पुढील सात वर्ष टिकते, अशी त्यांची समजूत आहे. 
  • दुभत्या गायींना पिवळसर रंगाच्या रान फुलांची वनस्पती चारली तर त्यांच्या दुधाला पिवळसर रंग येतो, तूप पण अधिक पिवळे दिसते. तसेच व निळ्या फुलांच्या वनस्पती खाल्ल्यावर दुधास निळसर झाक येते, असा समज आहे. 
  • डांगीच्या आजारावर जंगलातील विविध औषधी वनस्पतीचा वापर करण्याची परंपरा आजही अनेक वैदुंनी जपली आहे. २०१४-१५ सालच्या नमुना सर्वेक्षणानुसार ८३ टक्के डांगी पालक जनावरे आजारी पडल्यावर घरगुती उपचार करतात किंवा वैदुकडे जातात. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

जनावरांना होणारे आजार 
    फऱ्या : हा आजार अशक्त जनावरांना पावसाळ्याच्या सुरवातीला होतो. खूप ताप येणे, पाय व मांसल भागाला सूज येणे, फुटलेल्या जखमेतून काळसर पाणी येणे, ही फऱ्या आजाराची लक्षणे आहेत. 
    लाळ्या खुरकूत : हा संसर्गजन्य आजार आहे. हवामान बदलामुळे हिवाळा व उन्हाळ्यापूर्वी होतो. तोंडातून चिकट लाळ गळणे, नाक, जीभ, हिरड्या व कासेवर पांढरे फोड येतात. खुरांमध्ये जखमा होतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो.
    बुळकांडी : पावसाळ्याच्या दिवसात चारा व पाणी याद्वारे बुळकांडी आजाराचा प्रादुर्भाव होतो. ताप येणे, पातळ रक्त मिश्रित जुलाब होणे, नाक-तोंडातून घाण येणे, प्रकाश सहन न होणे, ही आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
    फाशी : अती पाऊस व दुष्काळजन्य परिस्थितीत हा आजार होतो. खूप ताप येणे, श्वसनाला त्रास होणे, थरथर कापणे, तोल जाणे, जनावर मेल्यावर नाकातोंडातून रक्त येणे, ही फाशीची लक्षणे. हा आजार माणसालाही होऊ शकतो. 
 वरील आजाराबरोबर सर्पदंश व श्वान दंश यामुळे जनावरांच्या जीविताला धोका निर्माण होतो. यापैकी बहुतांशी आजारावर रोगप्रतिबंधक लसीकरण उपलब्ध आहेत.

बहुविध चारा खाणारा गोवंश
    लोकपंचायतच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पशुपालक व वनस्पती तज्ज्ञ जुई पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या जंगली चाऱ्याच्या अभ्यासातून या परिसरातील सुमारे २१३ पेक्षा अधिक वनस्पतीची नोंद झाली. त्यातील ५३ प्रकारच्या वनस्पती चारा म्हणून डांगी गोवंश खातात. डांगी पालकांच्या दृष्टिकोनातून सामरट (Cacia torta), भालवंड (Meytenus rothiana), कारवीची बोंड (Carvia callosa), हुडा बांबू (Oxytenanthera monostigma) हे जलद पोषण देणारी चारा पिके आहेत. डांगी गाय रानातला विविध औषधी चारा खात असल्यामुळे तिच्या दुधातही औषधी तत्त्वे असल्याचे अनेकजण मानतात. 

गोवंश संवर्धनाची दिशा 

  • डांगी संवर्धनावर काम करत असताना मानव व निसर्गाचे कसे जैव-सांस्कृतिक असे शाश्वत नाते आहे, याची नव्याने उकल झाली. नव्या पिढीतील डांगी पालकांना या प्रश्नावर संवेदनशील बनविले, त्याचाही एक चांगला परिणाम दिसतो आहे. गायी आजारी पडल्या तर डांगी मित्र व पशुवैद्यक यांना बोलावणे येते. गाभण गाईंची विशेष काळजी घेतली जाते. अशा या विविध प्रयत्नातून एक उत्साहाचे वातावरण कार्यक्षेत्रात दिसत आहे. 
  • कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरातील डांगी पालकांनी पशुपालक संघाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून डांगी केंद्रित उपजीविका सक्षम होण्यास मदत होईल.
  • दूध प्रक्रिया व पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या खव्याच्या अर्थकारणाला चालना देण्यात येत आहे. या जैव- सांस्कृतिक नात्याला शाश्वत अर्थकारणाची जोड मिळाल्यास नवी पिढीही डांगी पालनाची परंपरा चालू ठेवेल, भविष्यात लोकपंचायतचे काम थांबले तरी, डांगी या देशी गोवंशासंबधी एक व्यवस्था टिकून राहील अधिक उत्क्रांत होईल, अशी आशा आहे.

 - विजय सांबरे : ०९४२१३२९९४४
(लेखक लोकपंचायत संस्था, संगमनेर, जि. नगर येथे कार्यरत आहेत)


फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
संतुलित खाद्य व्यवस्थापनातून दूध...जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने...
वेळीच ओळखा कोंबड्यांतील विविध रोगांचा...कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात...
प्रक्रियेतून वाढवा चाऱ्याची पोषकतावाळलेल्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यामुळे...
हिवाळ्यात जपा कोंबड्यांचे आरोग्यहिवाळ्यात पोट्री शेडच्या लिटरमधील ओलसर भाग...
उबविण्यापूर्वी तपासा अंड्यांची गुणवत्ता कुक्कुटपालन व्यवसाय करताना अंड्यांची निवड अत्यंत...
जनावरांच्या दातांचे आजार अन् उपचारजनावरांची निवड करताना किंवा खरेदी करताना कास, सड...
देशी कोंबड्यांमधील कृमीचे नियंत्रणकोंबड्यांमध्ये कृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे...
प्रतिबंधात्मक उपायांनी रोखा कोंबड्यातील...कोंबड्यांमध्ये मानमोडी या आजाराचा प्रादुर्भाव...
प्रतिजैविकांचा वापर अन् वाढता प्रतिरोधजनावरांमध्ये आणि मानवीय आजारांमध्ये वापरण्यात...
दुधाळ जनावरांना हिवाळ्यात होणारे आजार...दुधाळ व गाभण जनावरांच्या व्यवस्थापनात आणि आहार...
आजार निदानासाठी शवविच्छेदन आवश्यकविमा काढलेल्या जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन...
मिथेन उत्सर्जन कमी करून दुग्धोत्पादनात...भारतातील एकूण मिथेन उत्सर्जनापैकी निम्मे मिथेन...
...असा बांधा मुक्त संचार गोठा आणि जपा...बंदिस्त गोठ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या...
खनिज कमतरतेमुळे दुभत्या जनावरांमध्ये...खनिजाचा अभाव असलेल्या मातीत जर पिके घेतली तर...
वाढवा ऊस चोथ्याची पोषकताउसाचा चोथा फेकून न देता यावर योग्य ती प्रक्रिया...
प्रतिबंधात्मक उपायातून टाळा...रक्ती हगवण रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेड...
राजगिरा ः मुबलक पोषकद्रव्यांचा स्रोत अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये विविध प्रकारचे...
वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी मुरघास...सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी महिन्यापर्यंत...
शेळ्या-मेंढ्यांतील देवी आजारदेवी आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने सुरवातीला लालसर...
जनावरांच्या आहारात असावीत योग्य चिलेटेड...गाई, म्हशींकडून जास्त दूध उत्पादन,...