मालवणातील प्रवाळ बेटांची गाथा अन‍् व्यथा

 समुद्रामध्ये २०१४  मधील प्रवाळ आणि जलचरांची चांगली स्थिती.
समुद्रामध्ये २०१४ मधील प्रवाळ आणि जलचरांची चांगली स्थिती.

प्रवाळ बेटांवर असंख्य दुर्मीळ मासे व इतर सागरी जीव अधिवास करतात. ‘प्रवाळ’ ही जगातील पुरातन, अतिसंवेदनशील, गुंतागुंतीची, अतिशय उत्पादक अशी परिसंस्था आहे. या प्रवाळ बेटांना जागतिक तापमानवाढ आणि अमर्याद सागरी पर्यटनाचा धोका निर्माण झाला आहे.

प्रवाळाची बेटे हे पाण्याखालची अद्भुत दुनिया आहे. ही बेटे निडारिया फायलममधील (phylum Cnidaria) स्क्लेराक्टीनिअन (Scleractinians) प्रकारच्या कठीण प्रवाळामुळे बनतात. प्रवाळ हे जगातल्या खूप जुन्या जीवांपैकी एक आहेत. पिढ्यानपिढ्या एकावर एक वाढणाऱ्या प्रवाळांमुळे चुनखडीचे खडक तयार होऊन प्रवाळांची बेटे तयार होतात. या बेटांवर असंख्य दुर्मीळ मासे व इतर सागरी जीव अधिवास करतात. ‘प्रवाळ’ ही जगातील पुरातन, अतिसंवेदनशील, गुंतागुंतीची, अतिशय उत्पादक अशी परिसंस्था आहे. ही परिसंस्था ३० उत्तर ते ३० दक्षिण अक्षांशामधे उष्णकटिबंधीय सागरी किनाऱ्यावर म्हणजेच जगातील निम्म्या सागरी किनाऱ्यांवर आढळते. जगातील किमान ५० कोटी लोक मासेमारी, पर्यटन या माध्यमातून अर्थार्जन करण्यासाठी प्रवाळ परिसंस्थेवर अवलंबून आहेत. जागतिक पातळीवर प्रवाळ बेटे दरवर्षी २.९८ कोटी डॉलरचा नफा कमावून देतात.

प्रवाळांवर होतोय परिणाम  

  •  बहुतांश प्रवाळ अधिवास हवामान बदलास आणि अमर्याद मानवी हस्तक्षेपामुळे बळी पडत आहेत आणि लुप्त होण्याच्या मार्गावर जात आहेत. गेल्या काही दशकांत सरासरी जागतिक तापमान चिंताजनक पातळीवर वाढत आहे. आधुनिक नोंदीनुसार गेली सलग पाच वर्ष सर्वाधिक उष्ण राहिली आहेत. 
  •  २०१६ या वर्षी २०१४ व २०१५ चा विक्रम मोडत गेल्या १३६ वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. याचा परिणाम समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्यात होतो, यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रवाळांचे श्वेतन होत आहे. जेव्हा पृष्ठभागावरचे पाणी कोमट होते आणि २८ दिवसांपेक्षा जास्त काळ कोमट राहते, तेव्हा प्रवाळ आणि त्याच्यासोबत राहणारे एकपेशीय सूक्ष्मशैवाल यांचे सहजीवन भंगते आणि त्याचे निष्कासन होते. हे सूक्ष्मशैवाल डिनोफ्लाजेलेट (Symbiodiniumor zooxanthellae) वर्गात मोडतात, ते सोडून गेल्यामुळे प्रवाळांची उपासमार होते प्रवाळ ‘आजारी’ पडतात आणि मृत पावतात. सागरी पृष्ठभाग तापमानवाढीचा सर्वाधिक परिणाम होतो आहे आणि त्या परिसंस्थाना चिंताजनक वेगाने उतरती कळा लागत आहे. १९७० च्या दशकाच्या अखेरीपासून प्रादेशिक पातळीवर प्रवाळ श्वेतन व मृत्यू घटनांमध्ये वाढ झालेली आहे. १९९८, २०१० आणि २०१६ मध्ये जागतिक पातळीवर व्यापक प्रवाळ श्वेतन झाल्याची नोंद आहे. 
  •  भारतीय समुद्रात एल निनोच्या प्रभावामुळे सागरी पृष्ठभागाचे तापमान वाढून १९९७-९८, २०१० आणि २०१५-१६ या वर्षी प्रवाळांवर परिणाम झाला होता. त्यातून सावरून ही बेटे आश्चर्यकारकपणे मूळपदावर आली. 
  •  प्रवाळ बेटांमध्ये व्यापक श्वेतानानंतरही मूळ पदावर येण्याची नैसर्गिक क्षमता असली ती परिसंस्था पुन्हा पूर्ववत होण्यास एखादे दशक लागते. वैज्ञानिक अभ्यासांच्या अनुमानानुसार, हरित वायू उत्सर्जन असेच चालू राहिले व प्रवाळ अवनतीचा हा कल निरंतर चालू राहिला तर प्रवाळ परिसंस्थावर सायनोबॅक्टेरिया शेवाळे आणि स्पंज या जिवांचे वर्चस्व होईल. परिणामत: २०५० पर्यंत प्रवाळ बेटे आताच्या प्रमाणाच्या ७० ते ९० टक्क्यांनी कमी होतील. 
  • भारतातील प्रवाळ बेटे  भारतात १) अंदमान निकोबारवरील, कच्छ व मन्नारच्या आखातातील किनारी प्रवाळ बेटे; २) अंदमान- निकोबार बेटांवरील बॅरीयर रीफ आणि ३) लक्षद्वीप बेटांवरील प्रवाळी कंकणद्वीप (Atoll) अशी तीन प्रकारची प्रवाळ बेटे आहेत. याखेरीज केरळच्या कुइलोन किनाऱ्यापासून ते तमिळनाडूच्या एनायाम किनाऱ्यापर्यंत आणि भारताच्या मध्य पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेच रत्नागिरी, मालवण येथे प्रवाळांचे छोटे पट्टेही आढळतात. वेंगुर्ला आणि विजयदुर्ग किनारपट्टीला समांतर महाद्वीपीय जलसीमेअंतर्गत ६० ते ११० मीटर पाण्याच्या खोलीदरम्यान जलमग्न चट्टान प्रणाली आढळते. नुकताच मालवण किनाऱ्यापट्टीजवळ २० ते ४० मीटर खोल पाण्यात प्रवाळाच्या ‘अँग्रिया किनारपट्टी चट्टानप्रणाली’चा शोध लागला आहे.

    मालवण (सागरी) वन्यजीव अभयारण्य 

  •  भारतात केवळ पाच ‘सागरी वन्यजीव अभयारण्य’ आहेत. त्यापैकी मध्यपश्चिम किनाऱ्यावरील अभयारण्य मालवण येथे आहे. मालवण (सागरी) वन्यजीव अभयारण्य २९.१२२ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरले आहे.  मालवणचा समुद्र अनेक खडकाळ पृष्ठ्भागाने आणि छोट्या खडकाळ तटबंदीच्या बेटांनी व्यापला आहे. त्यापैकी एक तटबंदीच्या बेटावर सिंधुदुर्ग किल्ला आहे. सिंधुदुर्ग बेट आणि त्याप्रकारचे जलमग्न खडक, प्रवाळांचे जोराच्या लाटांपासून रक्षण करतात, त्यामुळे तेथे प्रवाळांच्या वाढीसाठी अधिवास निर्माण होतो. 
  •  मालवण प्रवाळ बेट काही महत्त्वाच्या आणि सुंदर प्रवाळ प्रजातींचे आश्रयस्थान आहे. पोराइट्स, कॉस्कीनरी प्रकारचे दगडी प्रवाळ, टरबेनेरिया प्रकारचे चकतीसारखे प्रवाळ, गोनिओपोरा प्रजातीचे फुलदाणीसारखे प्रवाळ, गोनियास्ट्रीया प्रजातीचे जाळीदार दगडासारखे प्रवाळ, प्लेसियास्ट्री या प्रजातीचे खडकावर थर चढवल्यासारखे प्रवाळ, लेप्टास्ट्री यासारखे भव्य रंगीत दगडी प्रवाळ, सायफास्ट्री या प्रजातीचे उल्केसारखे प्रवाळ, स्यूडोसीडरेस्ट्री प्रजातीचे घुमटाकार प्रवाळ असे काही विलक्षण सुंदर प्रवाळ आणि आययूसीएनच्या यादीनुसार ‘नामशेष होण्याच्या मार्गावर’ असलेल्या या प्रजाती मालवण प्रवाळ बेटावर आढळतात. 
  • प्रवाळ आणि प्रवाळासंबंधित चमकदार रंगीत मासे या चट्टानांच्या निवासी आहेत. ही प्रेक्षणीय जीविधा अनेक पर्यटकांना आकर्षित करते. मालवण प्रवाळ बेटांची ही जीविधा पर्यटनातून स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांना रोजगाराच्या अनेक संधी देत आहे; परंतु पर्यटनाचे प्रवाळ बेटांवर गंभीर परिणाम होत आहेत.
  • पर्यटन : एक दुधारी तलवार

  • मालवण (सागरी) वन्यजीव अभयारण्याची स्थापना जरी १९८७ मध्ये झाली असली तरी दुर्दैवाने त्यासंदर्भातील नियमनाची अंमलबजावणी मात्र फक्त कागदावरच राहिली आहे. या भागाला अभयारण्याचा दर्जा देण्यास स्थानिक मच्छिमारांचा कायमच विरोध राहिला आहे; कारण त्यांना या ठिकाणी पारंपरिक मासेमारी करण्यास मज्जाव केला जाईल, अशी धास्ती वाटते. मालवणची ही प्रवाळ बेटांवर तीव्र मासेमारी, अमर्याद पर्यटन आणि किनारपट्टीचा जलद विकास त्यामुळे वाढलेले प्रदूषण, अधिवास हानी असे दुष्परिणाम दिसत आहेत. 
  •     गेल्या काही वर्षात मालवणमधील प्रवाळांचे श्वेतन आणि प्रवाळमृत्यू मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. याला कारण स्थानिक पातळीवर पृष्ठभागाच्या पाण्याचे वाढलेले तापमान. २०१४ मध्ये १५ टक्के प्रवाळ वसाहतींचे श्वेतन झाले. डिसेंबर २०१५ मध्ये हे श्वेतानाचे प्रमाण ७०.९३ टक्के झाले आणि प्रवाळाच्या मृत्यूचे प्रमाण ८.३८ टक्के झाले.  याखेरीज वेगळ्या प्रकारची व्हाईट सिंड्रोम आणि प्रवाळ ट्युमर असे नवीन आजार याठिकाणी आढळले. 
  • या प्रवाळांना आणखी एक महत्वाचा धोका म्हणजे एरोडींगस्पॉंज (Coral eroding sponges), या स्पॉंजचे वाढते प्रमाण पाण्याची गुणवत्ता खालावलेली आहे याचे संकेत देत आहे, मानवी हस्तक्षेपामुळे प्रवाळावरती वाढलेला ताण या स्पॉंजला वेगाने वाढायला मदत करत आहे.  
  • प्रवाळाचे श्वेतन रोखण्यासाठी जागतिक पातळीवर समुद्राचे तापमान वाढू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. तथापि, स्थानिक पातळीवर मानवनिर्मित धोके कमी केल्यास प्रवालांच्या स्वास्थ्यप्राप्तीस मदत हातभार लागू शकतो. मालवणच्या बाबतीत, पर्यटन आणि मासेमारी हे स्थानिकांसाठी अर्थार्जनाची साधने असली तरी या क्रिया अमर्याद प्रमाणात झाल्यामुळे त्यांचा प्रवाळांवर विपरीत परिणाम दिसून येत आहे. 
  • गेल्या काही वर्षात मालवणमध्ये स्वस्त दरातल्या ‘स्कुबा’ पर्यटनामुळे अनेक अप्रशिक्षित व अनभिज्ञ पर्यटक या छोट्या प्रवाळ बेटांवर गर्दी करीत आहेत. सेल्फी काढून समाजमाध्यमावर चमकण्याच्या नादात नाजूक प्रवाळांचे दगड पायदळी तुडवत आहेत.‘स्कुबा’ डायव्हिंग साठी खराब दर्जाचे गॅस सिलेंडर वापरले जात आहेत, त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतोच शिवाय त्यातून विषारी वायू पाण्यात मिसळत आहे. सतत बोटी नांगरल्यामुळे प्रवाळांच्या खडकांचे तुकडे पडत आहेत. या भौतिक हानीमुळे प्रवाळ आजारांना सहज बळी पडत आहेत आणि मृत होत आहेत. प्रवाळ श्वेतन, प्रवाळावरचे आजार आणि पर्यटकांचे पायदळी तुडवणे याचा एकत्रित परिणाम म्हणून मालवणच्या प्रवाळांचे पतन आणि सहनिवासी माशांची घट अभूतपूर्व दराने होत आहे. परिणामत: स्थानिक पातळीवर प्रवाळांच्या काही प्रजाती नामशेष होण्याचा धोका संभवतो. ह्याचा परिणाम अर्थातच प्रवाळावर आधारित मासेमारी आणि पर्यटनाच्या स्थानिक रोजगारावर होणार.
  • पर्यटनाची ही पद्धत स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारणारी आहे. ही पर्यटन पद्धत तत्काळ बदलायला हवी. यासाठी स्थानिक नेतृत्वाने पुढाकार घेऊन प्रवाळांचे विज्ञान समजून घेऊन शाश्वत पर्यटनाची आखणी केली पाहिजे. ज्याप्रमाणे व्याघ्र प्रकल्पांमध्ये स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना गाईड बनवून पर्यटकांचा ओघ नियंत्रित केला जातो तसे मॉडेल येथेही अंगीकारणे शक्य आहे आणि ती काळाची अनिवार्य गरजही आहे. अन्यथा सृष्टीची ही अद्भुत नाजूक परिसंस्था मालवणच्या ‘अभयारण्यातून’ नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. 
  • - संभाजी मोटे (८३८१०९९१७८)(लेखक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा येथे कार्यरत आहेत) लेखमाला संपादन-ओजस सु.वि. ः ojas.sv@students.iiserpune.ac.in

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com