agriculture news in marathi article regarding cultivation of rabi sorghum | Agrowon

रब्बी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्र

डॉ. शरद जाधव, डॉ. तानाजी वळकुंडे
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

महाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू किंवा पर्जन्य आधारित आहे. कोरडवाहू क्षेत्रात रब्बी हंगामातील हंगामातील ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे. रब्बी ज्वारी ही धान्य आणि कडबा उत्पादनासाठी उपयुक्त ठरते.

महाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू किंवा पर्जन्य आधारित आहे. कोरडवाहू क्षेत्रात रब्बी हंगामातील हंगामातील ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे. रब्बी ज्वारी ही धान्य आणि कडबा उत्पादनासाठी उपयुक्त ठरते. मात्र, उत्पादनातील अनियमितता, जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित वाणांचा कमी वापर, पेरणीनंतरचे व्यवस्थापन, खतांचा अत्यल्प वापर अशा कारणांमुळे उत्पादनामध्ये घट येते. हे टाळण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.

जमिनीची निवड

 • मध्यम ते भारी जमिनीत ओल जास्त काळ टिकून राहते. अशा जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी करावी.
 • सर्वसाधारणपणे ५.५ ते ८.५ सामू असणाऱ्या जमिनीत ज्वारी घेता येते.

पूर्वमशागत 
पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उन्हाळ्यात मशागतीची कामे उतारास आडवी करावीत. नांगरट झाल्यानंतर हेक्टरी ५ टन (१० ते १२ गाड्या) शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील काडीकचरा धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे.

मूलस्थानी पाणी व्यवस्थापन 

 • पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीच्या उतारावर ३.६० x ३.६० चौ. मी. आकाराचे वाफे तयार करावेत. वाफे तयार करण्यासाठी सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात.
 • ट्रॅक्टर चलीत यंत्राने एकावेळी (६.००x २.०० चौ.मी.) आकाराचे वाफे तयार करता येतात.
 • हे वाफे रब्बी ज्वारी पेरणीपूर्वी ४५ दिवस आधी करावेत. पेरणीपूर्वी पडणारा पाऊस शक्य तितका त्यामध्ये जिरवावा. पेरणीच्या वेळी वाफे मोडून पेरणी करावी. पुन्हा सारा यंत्राच्या साह्याने गहू, हरभरा पिकासारखे वाफे पाडून आडवे दंड पाडावेत. यामुळे पेरणीनंतर पाऊस पडल्यावर तो अडवून जिरवता येईल. मूलस्थानी पाणी व्यवस्थापन तंत्रामुळे रब्बी ज्वारीच्या उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ होते.

कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी शिफारशीत वाण
रब्बी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात जिरायती क्षेत्रावर केली जाते.जिरायती क्षेत्रावर जास्त उत्पादन येण्यासाठी योग्य वाणांची निवड जमिनीच्या प्रकारानुसार करावी.

हलकी जमीन (खोली ३० सें.मी. पर्यंत)- फुले अनुराधा, फुले माउली
मध्यम जमीन (खोली ६० सें.मी. पर्यंत)- फुले सुचित्रा, फुले माउली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी -३५-१
भारी जमीन (खोली ६० सें.मी. पेक्षा जास्त)-

 • सुधारित वाण- फुले वसुधा, फुले यशोदा, सी. एस. व्ही. २२, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती.
 • संकरित वाण- सी. एस.एच.१५ आणि सी. एस.एच.१९

बागायतीसाठी- फुले रेवती, फुले वसुधा, सी. एस. व्ही.१८, सी. एस.एच १५, सी. एस.एच १९
हुरड्यासाठी वाण- फुले उत्तरा, फुले मधुर
लाह्यांसाठी वाण- फुले पंचमी
पापडासाठी वाण- फुले रोहिणी

पेरणीची वेळ  
रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या ओलीवर ५ सें.मी. खोलीपर्यंत करावी.

पेरणीचे अंतर व बियाण्याचे प्रमाण 
रब्बी ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी हेक्‍टरी १.४८ लाख रोपे ठेवणे जरुरीचे आहे. त्याकरिता ज्वारीची पेरणी ४५ x १५ सें.मी. अंतरावर करावी. बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी रब्बी ज्वारीची पेरणी ४५ x १२ सें.मी. अंतरावर करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाच वेळी खत व बियाणे पेरावे.

बीज प्रक्रिया
काणी रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे) चोळावे. तसेच प्रति किलो बियाण्यास ॲझोटोबॅक्टर व पी. एस. बी. जिवाणूसंवर्धक कल्चर २५ ग्रॅम प्रत्येकी चोळावे.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
सेंद्रिय खत
पूर्वमशागतीच्या वेळी नांगरट झाल्यानंतर हेक्टरी ५ टन ( १० ते १२ गाड्या शेणखत) जमिनीत मिसळून द्यावे.

रब्बी ज्वारीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांची मात्रा

जमिनीचा प्रकार रासायनिक खतांचे हेक्टरी प्रमाण (किलो/ हेक्टर)
कोरडवाहू बागायती
नत्र स्फुरद पालाश नत्र स्फुरद पालाश
हलकी २५ -- -- -- -- --
मध्यम ४० २० -- ८०* ४० ४०
भारी ६० ३० -- १००* ५० ५०

 

 • *बागायती जमिनीत नत्र दोन हप्त्यात (पेरणीच्या वेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे), संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळीच द्यावे.
 • कोरडवाहू जमिनीस संपूर्ण नत्र आणि स्फुरद दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.
 • रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जाती नत्र खताचा चांगला प्रतिसाद देतात.
 • कोरडवाहू ज्वारीस दिलेल्या प्रति एक किलो नत्रामागे दहा ते पंधरा किलो धान्य उत्पादन वाढत असल्याचे प्रयोगाअंती आढळले आहे.

पीक फेरपालट 
खरिपात मूग, उडीद,भुईमूग आणि सोयाबीन ही पिके घेऊन नंतर रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी केली असता २० ते ३० किलो नत्राची बचत होते. मात्र, सोयाबीन-रब्बी ज्वारी हा पीक क्रम विशेषतः बागायतीसाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर दिसून आला आहे.

आंतर मशागत 
पिकाच्या सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसात तण व पिकामध्ये जमिनीतून अन्नद्रव्य शोषणासाठी तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे सुरुवातीस ३५ ते ४० दिवसात पीक तण विरहित ठेवणे महत्त्वाचे आहे. पेरणीनंतर आवश्‍यकतेनुसार १ते २ वेळा निंदणी आणि तीन वेळा कोळपणी करावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी, दुसरी पेरणीनंतर ५  आठवड्यांनी पासेच्या कोळप्याने कोळपणी करावी आणि तिसरी ८ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावी. शेवटच्या कोळपणीच्या वेळी कोळप्याला दोरी बांधून कोळपणी केल्यास पिकांच्या मुळांना मातीची भर दिली जाईल. शेतात सऱ्या पडल्यामुळे पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होईल.

पाणी व्यवस्थापन 
कोरडवाहू रब्बी ज्वारीस संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी पाणी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे.

बागायती रब्बी ज्वारीस मध्यम जमिनीत पाणी देण्याच्या अवस्था

 • पीक गर्भावस्थेत असताना (पेरणीनंतर २८ ते ३०दिवसांनी)
 • पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी)
 • पीक फुलोऱ्यात असताना ( पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी)
 • कणसात दाणे भरतांना पेरणीनंतर ( ९० ते ९५ दिवसांनी)
  भारी जमिनीत बागायती ज्वारीस चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.

कोरडवाहू क्षेत्रात आच्छादनाचा वापर
जमिनीतून ६०ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा  होतो. हा ओलावा टिकविण्यासाठी शेतातून आणलेले तण, तुरकाट्या यांचा वापर आच्छादनासाठी करावा. आच्छादन ज्वारी पेरल्यापासून ५० दिवसांच्या आत टाकणे गरजेचे आहे. आच्छादनामुळे उत्पादनात १४ टक्क्यापर्यंत वाढ होत असल्याचे प्रयोगात आढळले आहे.

संपर्क- डॉ. शरद जाधव, ९९७०९९६८९०
(कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ जि. सोलापूर.)


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...