जनावरांतील गोचीड ताप

गोचीड ताप अनेक दिवस राहू शकतो. या आजारामुळे जनावरे चारा खात नाहीत. रवंथ करीत नाहीत. कातडीलगतच्या लीम्फ गाठीमध्ये सूज येते. श्वासोच्छ्वास व हृदयाचे ठोके वाढतात. गोठ्याची स्वच्छता आणि तातडीने उपचार करणे महत्त्वाचे आहे.
Tick fever
Tick fever

गोचीड ताप अनेक दिवस राहू शकतो. या आजारामुळे जनावरे चारा खात नाहीत. रवंथ करीत नाहीत. कातडीलगतच्या लीम्फ गाठीमध्ये सूज येते. श्वासोच्छ्वास व हृदयाचे ठोके वाढतात. गोठ्याची स्वच्छता आणि तातडीने उपचार करणे महत्त्वाचे आहे. गोचीड ताप हा गाई आणि म्हशींमध्ये आढळणारा आदिजीवजन्य आजार असून तो आता शेळ्या आणि मेंढ्यामध्ये सुद्धा आढळून येतो. गोचीड ताप हा आजार थायलेरिया अन्यूलाटा, थायलेरिया ओरिएन्टालीस आणि थायलेरिया पार्व्हा या एकपेशीय आदिजीवामुळे होतो. त्यामुळे या आजारास थायलेरियासीस असेही म्हणतात. हा आदिजीव रक्तपेशीमध्ये वाढून त्यांचा नाश करतो. जनावरांमध्ये पंडुरोग (एनेमिया) सारख्या अनेक व्याधी निर्माण होतात. प्रसार 

  • गोचीड ताप हा असंसर्गजन्य आजार आहे. उष्णकटिबंधीय हवामानाच्या परिणामामुळे भारतात या आजाराचे वाहक अतिशय जास्त प्रमाणात आहेत.
  • हायलोमा आणि रिफिसिफ्यालस प्रजातीचे गोचीड थायलेरिया परोपजीवीचे वाहक असतात.
  • गोचिडामार्फत या आजाराचा प्रसार सर्वाधिक होतो. उपचाराने ठीक झालेली जनावरे या रोगाची दीर्घकाळ वाहक असतात.
  • या आजाराचा प्रादुर्भाव गोचिडाच्या चावण्यामुळे सर्व वयोगटाच्या संकरित आणि विदेशी जनावरांमध्ये जास्त प्रमाणात होतो. गोचिडाद्वारे होणारा आजार जास्त तीव्र असतो. म्हशींमध्ये तीव्रता तुलनेने कमी दिसून येते.
  • देशी जनावरे आणि म्हशी बाधित असल्या तरी लक्षणे दाखवतीलच असे नाही. परंतु आजाराच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.
  • या आजाराचा प्रादुर्भाव ऋतुमानाप्रमाणे बदलणारा असून, तो एप्रिल महिन्यात सुरु होऊन जुलै -ऑगस्ट महिन्यांत जास्त प्रमाणात दिसून येतो. गोचिडांची कार्यक्षमता उष्ण आणि दमट वातावरणात जास्त असल्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. 
  • आजाराचा प्रसार

  • आजाराचा पूर्वकाळ १० ते २५ दिवसांचा असतो. सर्वप्रथम थायलेरियाने संक्रमित प्रौढ गोचीड जनावरांच्या कातडीवर चिकटतात. त्यानंतर गोचिडांच्या लाळग्रंथीमध्ये या आदिजीवाची वाढ होऊन स्पोरोझाइट अवस्था तयार होते.
  • स्पोरोझाइटची संख्या वाढून गोचिडांच्या लाळेद्वारे जनावरांच्या शरीरात सोडले जातात. स्पोरोझाइट जनावरांच्या लीम्फ पेशींना बाधित करतात. त्यानंतर त्यांची सायझांट ही पुढील अवस्था विकसित होते. या अवस्थेत सायझांट लिम्फोसाईट या पांढऱ्या रक्तपेशीत प्रवेश मिळवून प्रजोत्पादन करतात. त्यापासून निघणारे मेरोझाईट लाल रक्तपेशींमध्ये प्रवेश करतात. त्यांची पायरोप्लाझम ही अवस्था विकसित होऊन लाल रक्त पेशींचा नाश होतो. 
  • सायझांट लीम्फ संस्थेमध्ये प्रादुर्भाव करून नुकसान करतात. कातडी, यकृतामध्ये लक्षणे दिसून येतात.
  • लक्षणे 

  • उच्च ताप (१०२ ते १०७ अंश फॅरानहाइट) येतो. हा ताप अनेक दिवस राहू शकतो. जनावरे चारा खात नाहीत. रवंथ करीत नाहीत.
  • कातडीलगतच्या लीम्फ गाठीमध्ये सूज येते.
  • श्वासोच्छ्वास व हृदयाचे ठोके वाढतात. श्वास घेण्यास त्रास होतो.
  • डोळे व नाकातून जास्त प्रमाणात स्राव वाहतात.
  • रक्तमिश्रित विष्ठा दिसते. रक्त क्षय होतो. रक्तक्षयामुळे शरीरातील श्लेषमल आवरण फिक्कट दिसतात.
  • जनावरांमध्ये उदासीनता आणि क्षीणता वाढते. दुग्धोत्पादनात घट दिसून येते.
  • थायरॉइड संप्रेरकाची मात्रा कमी झाल्यामुळे जनावरांच्या शरीरवाढीवर व चयापचयाच्या क्रियेवर विपरीत परिणाम होतो.
  • कावीळ होण्याची शक्यता असते.
  • उपचारांअभावी जनावरांचा एक आठवड्यात मृत्यू होऊ शकतो.
  • निदान

  • लक्षणांवरून आजाराचे निदान केले जाते. परंतु लक्षणे इतर काही आजारांशी साधर्म्य दाखवीत असल्याने पक्के निदान होणे महत्त्वाचे असते.
  • निदानासाठी कानाच्या पाळीतील शिरेतून घेतलेल्या रक्ताची काचपट्टी तयार करून सूक्ष्मदर्शिकेद्वारे निरीक्षण केले जाते.
  • पक्के निदान लीम्फ गाठीतील द्रव आणि रक्त नमुन्यावर रक्तजल चाचण्या आणि जनुक आधारित चाचण्या करून करता येते.
  • उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय

  •  उपचारासाठी आपल्या जवळील नोंदणीकृत पशुवैद्यकाशी संपर्क करावा. सहायक उपचार म्हणून ताप कमी करणारी औषधे, डेक्सट्रोज सलाइन, ब-जीवनसत्त्वे, लोहयुक्त औषधी इत्यादींचा उपयोग करता येतो.
  •  आजारास प्रतिबंध करण्यासाठी जनावरे आणि गोठ्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते.
  •  गोचिडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रयत्न करावा. जनावरांच्या शरीरावरून जमिनीवर पडलेले मादी गोचीड भिंत किंवा लाकडाच्या भेगांमध्ये शिरतो. त्या ठिकाणी हजारो अंडी घालतो. अंडी उबवून निघालेले सूक्ष्म गोचीड जनावरांच्या अंगावर चिटकून रक्त पितात आणि खाली पडतात. दोन-तीन वेळा कात टाकल्यानंतर मादी गोचीड परत अंडी घालते. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार गोचीडनाशकाची फवारणी जनावरांच्या अंगावर व गोठ्यामध्ये ठरावीक अंतराने करावी. गोठ्याची जमीन सिमेंट काँक्रीटची करावी. परसबागेत कोंबडीपालन केल्यामुळे गोचीड नियंत्रणाला मदत होते. गोठ्यातील भेगा दर सहा महिन्यांनी फ्लेम गनने जाळून घ्याव्यात.
  • आजारावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे.
  • संपर्क : डॉ. महेश कुलकर्णी ९४२२६५४४७०, डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९ (पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com