जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष

जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष

गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या प्रजनन व कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन गोठा नियमित स्वच्छ ठेवावा. जनावरांमध्ये लसीकरण करून घ्यावे.

गळक्या छताचा परिणाम 

  •   गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या प्रजनन व कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
  •   गोठ्यात जर पावसाचे पाणी येत असेल किंवा छतामधून गोठ्यामध्ये पाणी येत असेल तर जनावर बैचेन होते.
  •   पाणी शेण, जनावराचे मलमूत्र यामुळे गोठ्यात अमोनियाचे प्रमाण वाढते. विषारी वायूंची निर्मिती होऊन जनावरांच्या डोळ्यावर सूज येते, शरीराची आग होऊन खाज सुटते. यामुळे जनावर शांत राहत नाही. 
  •   पोल्ट्री शेडमधील ओलसर वातावरणात कोंबड्यामध्ये कॉक्सीडायोसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
  •    शेळ्या ओलसर जागी बसत नाहीत शेळ्यांमध्ये तणाव दिसून येतो.
  • खाद्य 

  •  पावसाळ्यामध्ये गवताची उगवण क्षमता तसेच वाढ अधिक प्रमाणात असते. या चाऱ्याकडे जनावरे आकर्षित होतात, त्यामुळे जनावरांना खायला पोटभर आणि भरपूर खाद्य मिळते. परंतु, हे जनावरांसाठी अपायकारकसुद्धा आहे.
  •  पावसाळ्यात उगवणारे गवत मऊ असल्याने जनावरे कमी वेळात अधिक गवत खातात. कोरडा चारा कमी  खातात. 
  •  पावसाळ्यात उगवणाऱ्या गवतात पाण्याचे प्रमाण अधिक असते. तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जनावरांची अन्न पचनाची क्रिया बिघडते. जनावरांना हगवण लागते. 
  • खाद्यामध्ये बुरशी 

  •    जनावरांचे खाद्य जर भिजले तर खाद्यामध्ये बुरशी निर्माण होते. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम दिसून येतो.
  • कासेचे आजार 

  •    अस्वच्छ गोठ्यात कासेचे आजार दिसतात. 
  •    जनावरांना कासदाह आजार होतो. दुधाचे उत्पादन कमी होते.
  • आर्द्रता 

  •  पावसाळी वातावरणात आर्द्रता अधिक असल्याने हे वातावरण विविध प्रकारच्या जिवाणू तसेच विषाणूंच्या वाढीस पोषक ठरते.
  •  निरनिराळे जिवाणू आणि विषाणूंची झपाट्याने वाढ होऊन जनावरे जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोगास बळी पडतात. 
  • जंत, माश्यांचा प्रादुर्भाव 
  • जिवाणूप्रमाणे कृमींना सुद्धा पावसाळ्यातील वातावरण पोषक ठरते. परिणामी जनावरे वेगवेगळ्या कृमींना बळी पडतात. 
  •  गोठ्यात माश्यांचे प्रमाण वाढते. माशा जनावरांना चावतात. जनावर बैचेन होते त्याचा परिणाम दूध उत्पादनावर दिसून येतो.
  • खुरांचे आजार 

  •    खुरांमध्ये चिखल राहिल्यामुळे जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊन आजार होतात. काहीवेळेस जनावर लंगडते.
  • उपाययोजना  

  •    गोठा नियमित स्वच्छ ठेवावा, गोठ्यात पावसाची झडप येणार नाही किंवा छतामधून पाणी गळणार नाही याची दक्षता घ्यावी. 
  •    गोठ्याच्या आजूबाजूला गवत किंवा झाडेझुडपे वाढू देऊ नयेत. त्यामुले डास, माश्यांचे प्रमाण कमी होईल. 
  •    पावसाळ्याच्या सुरवातीला जनावरांना कृमिनाशकाची शिफारशीत मात्रा द्यावी. 
  •    गोठा व आजूबाजूची जागा निर्जंतुक करावी. 
  •    गोठा कोरडा ठेवावा. स्वच्छता ठेवावी. त्यामुळे कासेचे आजार होणार नाहीत.
  •    खाद्य पावसाने ओले होणार नाही याची काळजी घ्यावी.
  •    हिरव्या गवतासोबत वाळलेला कोरडा तंतुमय चारा द्यावा.
  •    जिवाणू तसेच विषाणूजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी लसी उपलब्ध आहेत. पशुवैद्यकाच्या मदतीने जनावरांमध्ये योग्यवेळी लसीकरण करून घ्यावे. उदा. एकटांग्या, घटसर्प, तोंडखुरी, पायखुरी इत्यादी. 
  •    पावसाळ्यात जनावरांच्या वागणुकीवर कटाक्षाने नजर ठेवावी. आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकाकडून योग्य उपचार करावेत.
  •  - डॉ. सी. व्ही. धांडोरे, ९३७३५४८४९४ (विषय विशेषज्ञ (पशुवैद्यकीय), श्री. सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ, कोल्हापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com