कीड नियंत्रणात पक्षी ठरतात महत्त्वाचे

शेतात थांबे उभे केल्याने पक्षी त्यावर बसून पिकावरील किडी खातात.
शेतात थांबे उभे केल्याने पक्षी त्यावर बसून पिकावरील किडी खातात.

हानिकारक किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यामध्ये पक्ष्यांची महत्त्वाची भूमिका आहे. गायबगळे, वेडा राघू, खाटीक, कोतवाल यांसारखे अनेक पक्षी शेतांमधील अळ्या व किडी वेचून खातात. या पक्ष्यांना शेतात आकर्षित करण्यासाठी शेतात पक्षी थांबे उभारावेत.

एकात्मिक कीडनियंत्रणात वेगवेगळ्या उपायांमध्ये पक्षी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पूर्वी शेतीच्या परिसरात भरपूर प्रमाणात चिमण्या, कावळे, पोपट, कबुतर, मैना, साळुंकी असे कितीतरी पक्षी दिसायचे. हानिकारक किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यामध्ये पक्ष्यांची महत्त्वाची भूमिका आहे. सुमारे ९० टक्के पक्षी मांसाहारी आहेत. गायबगळे, वेडा राघू, खाटीक, कोतवाल यांसारखे अनेक पक्षी शेतांमधील अळ्या व किडी वेचून खातात. पक्ष्यांना जर किडी, अळ्या उपलब्ध झाल्या; तर ते धान्य पिकाचे नुकसान करीत नाहीत. सुमारे ३३ टक्के नियंत्रण पक्षांमार्फत होऊ शकते. शेताच्या मध्यापेक्षा बांधावर आणि झाडाच्या जवळ किडींचे प्रमाण कमी असते. पक्ष्यांपासून होणारा हा फायदा पाहता काही प्रसंगी पक्ष्यांपासून होणारे नुकसान म्हणजे काही प्रमाणात दाणे खाण्याचे नुकसान गौण ठरते.

पक्ष्यांना शेताकडे आकृष्ट  करण्याच्या पद्धती 

  •   कापसाची पेरणी करताना बियासोबत मका, सूर्यफुलाचे काही दाणे मिसळून पेरावे. या झाडांवर पक्षी सहजपणे दाणे खाण्याच्या निमित्ताने आकर्षित होऊन कापसातील अळ्यांना शोधून खातात.
  •  कपाशी किंवा हरभऱ्याच्या शेतात तुरळक ठिकाणी दोन-तीन दिवसांच्या अंतराने सकाळी लवकर पक्ष्यांना दिसेल एवढ्या उंचीवर भात ठेवावा. तो खाण्यासाठी पक्षी जमा होऊन पिकांवरील किडी खातात.
  •  शेतात १५ ते २० मीटर अंतरावर दोन वासे उभे करून त्यांच्या वरच्या टोकावर बारीक दोरी बांधावी. या दोरीवरही अनेक पक्षी बसून किडींना खातात.
  •  टीव्ही अँटेनाप्रमाणे शेतात काही ठिकाणी लाकडी अँटेना उभे केल्यास पक्ष्यांना बसण्यास जागा उपलब्ध होते.
  •   शेतात एक-दोन ठिकाणी उंचावर रुंद तोंडाची मडकी बांधून त्यात रोज ताजे थंड पाणी भरावे, त्यामुळे पक्षी पाणी पिण्याच्या निमित्ताने आकर्षित होऊन आपोआपच किडींचे नियंत्रण होईल.
  •  शेताच्या बांधावर वृक्षलागवड केल्यास वेगवान वारा थांबवला जातो. बाष्पीभवन कमी होते. पक्ष्यांना बसण्यासाठी सावली मिळते, त्यामुळे पक्षी आकृष्ट होतात.
  •  लोकर, सुतळी, वाळलेले गवत, काड्या, वाळलेली पाने झाडांच्या जवळपास विखरून टाकल्यास किंवा झाडाला टांगून ठेवल्यास पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कृत्रिम घरटी दोन मीटरपेक्षा जास्त उंचीवर बांधावीत. वाळलेल्या झाडावर छिद्र करून ठेवल्यास सुतार पक्षी आकर्षित होतात.
  •  भाताच्या शेतात पक्षी बसण्यासाठी खास पक्षिथांबे उभे करावेत. यावर दिवसा कोतवालसारखे पक्षी बसून खोडकिडी, पाने गुंडाळणाऱ्या अळ्या, नाकतोडे या किडी खातात; तर रात्री याच जागेवर घुबड बसून उंदरांचे नियंत्रण करतात.
  • पक्ष्यांचे महत्त्व 

  •     महाराष्ट्रात ४३ प्रकारचे, तर भारतात १०४ प्रकारचे शिकारी पक्षी आढळतात.
  •     पिंगळा, शिंपी, घुबड, घार, कापसी या पक्ष्यांचा उंदीर, घुशी, खेकडे नियंत्रणात महत्त्वाचा वाटा. 
  •     खाटीक, शिंपी, नीलकंठ, माळढोक, कोतवाल इ. पक्ष्यांचे मुख्य खाद्य कीटक.
  •     दक्षिण भारतामध्ये भातशेतीमधील पट्टेरी ढेकूण नियंत्रणासाठी बदकांचे संगोपन.
  •     झाडांवरील रस शोषणाऱ्या मावा नियंत्रणासाठी सुतार पक्ष्यांची चांगली मदत.
  •     वेडा राघू हवेत उडणारे कीटक पकडतो. काही पक्षी झाडांच्या सालीवरील कीटक खातात. त्यामुळे         झाडाच्या खोडाचे संरक्षण होते. 
  •     काही पक्षी तणांचे बी खात असल्याने तणनियंत्रणास मदत. कुरणात किंवा शेतात चरणाऱ्या जनावरांच्या बरोबर गायबगळे दिसतात. चरणाऱ्या जनावरांची पावले आणि तोंडाने गवत चाळविले जाऊन त्यातील किडी हालचाल रू लागल्याबरोबर पक्षी त्यांना टिपतात. पक्षी जनावरांच्या पाठीवर बसून त्यांच्या अंगावरील गोचीड, गोमाश्या खात असतात. गवतावरील नाकतोडे, टोळ, माश्या विविध प्रकारचे किडे हे त्यांचे मुख्य खाद्य.
  •     पेरणीच्या दिवसात कुळवलेल्या शेतामध्ये पारवे, कबुतरे येऊन किडे वेचून खातात. शेतात नांगरट सुरू असताना बगळे जमिनीत लपून बसलेल्या अनेक किडी खातात.
  •     गव्हाच्या शेतात इंग्रजी ‘टी’ अक्षराप्रमाणे खांब रोवल्यास त्यावर रात्री घुबडे बसून उंदीर पकडतात. 
  •     शेतात कोंबडीपालन केल्यास त्या दिवसभर पिकांमध्ये हिंडून किडींचे नियंत्रण करतात. कबुतर पालन करूनही कीडनियंत्रण शक्य आहे. 
  • - उत्तम सहाणे ः ७०२८९००२८९  (शास्त्रज्ञ (पीकसंरक्षण), कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. पालघर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com