स्कर्व्ही, खोकल्यावर अंबाडी उपयुक्त

अंबाडीची फळे
अंबाडीची फळे
  • स्थानिक नाव    :     अंबाडी, लाल अंबाडी, पांढरी अंबाडी 
  • शास्त्रीय नाव     :  Hibiscus sabdariffa       
  • इंग्रजी नाव    :  Rosella,Hibiscus,   Jamaica sorrel, Red sorrel        
  • संस्कृत नाव     :     अम्बस्थकी, अन्वष्टा       
  • कुळ    :     Malvaceae       
  • उपयोगी भाग    :     कोवळी पाने, पुष्पमुकुट, सदल मंडळ,
  • बिया उपलब्धीचा काळ    :     ऑगस्ट- नोव्हेंबर        
  • झाडाचा प्रकार    :     झुडूप        
  • अभिवृद्धी     :     बिया         
  • वापर    :     भाजी, लोणचे, जॅम, सरबत, चहा
  • आढळ  अंबाडीचे झुडूप सगळ्याच भागात आढळते. बऱ्याच वेळा मागील वर्षीचे बी पडून पावसाळ्यात आपोआप ही झाडे उगवतात. वनस्पतीची ओळख

  •    अंबाडी हे वर्षायू झुडूपवर्गीय वनस्पती असून साधारण ९० ते १५० सें.मी. उंचीपर्यंत वाढते. फांद्या अनेक, सरळ, उभ्या तसेच जमिनीला संमातर वाढणाऱ्या असतात. पाने गडद हिरव्या रंगाची, ४ ते ११ सें.मी लांब व ३ ते ८ सें. मी रुंद असून अनेक आकाराची असतात. काही पाने लांबट आकाराची येतात तर काही भेंडीच्या पानासारखी, तळाहाताप्रमाणे दिसणारी व ३ ते ५ खंडित भाग असणारी असतात.
  •    पानाचा मधला खंडित भाग इतर दोन भागांपेक्षा मोठा असतो. पाने साधी, एका आड एक येणारी, टोकाशी टोकदार असून खाली निमुळती होत गेलेली. फांद्या, पानाच्या शिरा व देठे (६ ते ८ सें.मी. लांब) आकर्षक लाल रंगाची असतात. 
  •    फुले उभयलिंगी, अकुंठीत पुष्पमंजिरीत येणारी, पिवळसर रंगाची असून पानाच्या तसेच फांद्याच्या बगलेतून येतात. फुले साधारण ६ ते ७ सें.मी व्यासाची, ५ ते ७ पाकळ्या, प्रत्येक पाकळीच्या टोकाशी गडद लाल रंग असून पुष्पमुकुटही गडद लाल रंगाचे असून, १ ते ४ सें.मी. लांब, परागीकरणानंतर जाडसर, मांसल गराचे बनते. 
  •    देठ १ ते १.५ सें.मी. लांब असते. अंबाडीला साधारण ऑगस्ट- नोव्हेंबरपर्यत फुले येतात. फळे उभय पंचकोनाकृती, शंखाच्या आकाराची, वरच्या बाजूस निमूळती असलेली, ४ ते ६ सें.मी लांबीचे ३ ते ४ सें.मी. व्यासाची असतात. 
  •    बिया अनेक, काळ्या किंवा करड्या रंगाच्या असतात. नोव्हेंबरपर्यंत फळे तयार होतात. ही फळे झाडावरच वाळू देतात.  
  • औषधी गुणधर्म 

  •    अंबाडीचे पाने, बिया तसेच पक्व पुष्पमुकुट हे औषधात वापरले जाते. पानामध्ये तसेच पुष्पमुकुटामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशिअम, लोह तसेच जीवनसत्त्व कचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते स्कर्व्हीविरोधक म्हणून वापरले जाते. 
  •    अंबाडीचे फळे थोड्या पाण्यात उकळून हा काढा खोकला व पोटाची बाधा झाल्यास देतात. 
  •    पक्व पुष्पमुकुटापासून बनविलेले सरबत हे पित्तनाशक म्हणून वापरतात.
  •    बिया ह्या रेचक, लघवीचे प्रमाण वाढविणाऱ्या तसेच शक्तिवर्धक असून त्याच्या सेवनाने अशक्तपणा कमी होतो. 
  •    पाने अतिशय चिकट असून ती वेदनाहारक, शीतल तसेच त्वचा नरम करण्यासही वापरली जातात. पानाचा शेक वेदना कमी करण्यासाठी तसेच रक्ताभिसरण सुधारण्यासाठी दिला जातो.  
  • टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधी उपयोग करावा.

    इतर उपयोग 

  •  फुले रंग नैसर्गिक रंग बनविण्यासाठी वापरतात.
  •  अंबाडीचे  खोड  मुळाशी धरून झोडपतात. वाळल्यावर त्यापासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात. 
  •  पुष्पमुकुटापासून जॅम, जेली व सरबत बनवले जाते.
  •  अंबाडीची बोंडे तसेच पाने वाळवून भाजीमध्ये त्याचा वापर केला जातो. 
  •  खेकड्याचे कालवण बनवताना आवर्जून अंबाडी पानांचा वापर केला जातो. कालवणला चव चांगली येते. सुक्या मच्छीमध्येही वाळलेले पुष्पमुकुट चवीसाठी मिसळले जातात.
  • पाककृती 

    पानाची सुकी भाजी   साहित्य : २ ते ३ वाट्या अंबाडीची पाने, २ ते ३ मोठे उभे चिरलेले कांदे, २ ते अडीच चमचे हिरवी मिरची व लसूण पेस्ट किंवा ३ कापलेल्या हिरव्या मिरच्या, व ४-५ लसूण पाकळ्या,  चिमूटभर हिंग, जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ व गूळ, आवश्यकतेनुसार शेंगदाण्या कूट.   कृती : प्रथम अंबाडीची पाने निवडून स्वच्छ धुवून व चिरून घ्यावी. एका कढाईत तेल गरम करून जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्यावी, त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची-लसूण पेस्ट घालून चांगला परतून घ्यावा. भाजीला कांदा जरा जास्तच मिसळावा. त्यामुळे चांगली चव येते. नंतर त्यात बारीक चिरलेली पाने टाकून एकजीव करून घ्यावे. ५ ते १० मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. त्यापूर्वी शेंगदाणा कूट व गूळ बारीक करून घालावा. चवीनुसार मीठ मिसळावे. कोवळ्या पानांची पातळ भाजी   साहित्य : १ वाटी अंबाडीची कोवळी पाने, १-२ बारीक चिरलेले कांदे, ४-५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १ चमचा हळद, २-३ चमचे लाल मिरची पावडर, १ वाटी तूर डाळ/मसुराची डाळ, थोडे शेंगदाणे, चवीपुरता गूळ, फोडणीसाठी मोहरी, जिरे, चिमुटभर हिंग, तेल, मीठ चवीप्रमाणे. कृती :  प्रथम अंबाडीची कोवळी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. बारीक वरीलपैकी एका डाळीसोबत शिजवून घ्यावे. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, लसणाची फोडणी तयार करून त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्यावा. त्यात लाल मिरची पावडर, हळद, शेंगदाणे टाकून नीट परतून घ्यावे. नंतर शिजवलेले वरील सर्व जिन्नस टाकून चांगले उकळून घ्यावे. चवीप्रमाणे गूळ व मीठ टाकावे. अंबाडीच्या फळाचा चहा (एका कपासाठी)    साहित्य : २ ते ३ वाळलेले अंबाडीचे पक्व पुष्पमुकुट, २ चमचे साखर, १ काप पाणी, लिंबूचा रस- ४ ते ५ थेंब.   कृती :  प्रथम वाळलेले अंबाडीचे पक्व पुष्पमुकुट घेऊन त्याची पावडर करून घ्यावी. ही पूड एका मलमलच्या कापडात बांधून त्याची एक पुरचुंडी तयार करावी. एका पातेल्यात पाणी व साखर उकळून घ्यावी. एका कपात हे पाणी घेऊन त्यात वरील पुरचुंडी ५ ते १० मिनिटे बुडवून ठेवावी व चहाला चांगला रंग आला की काढून घ्यावी. नंतर आवडीप्रमाणे ४ ते ५ थेंब लिंबाचा रस टाकावा. 

    - ashwinichothe7@gmail.com,  (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com