agriculture news in Marathi, article regarding importance of linseed, | Agrowon

बहुगुणी अन्‌ बहुपयोगी जवस

अविल बोरकर
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक तेलाच्या उत्पादनासाठी होतो. झाडापासून मिळणाऱ्या तंतूचा उपयोग कापड व्यवसाय, वेगवेगळ्या प्रकारचे कागद तयार करण्यासाठी व शोभेच्या वस्तू निर्मितीकरिता उपयोग होतो. जवसाच्या पेंढीचा उपयोग पशू खाद्यात केला जातो.  

जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक तेलाच्या उत्पादनासाठी होतो. झाडापासून मिळणाऱ्या तंतूचा उपयोग कापड व्यवसाय, वेगवेगळ्या प्रकारचे कागद तयार करण्यासाठी व शोभेच्या वस्तू निर्मितीकरिता उपयोग होतो. जवसाच्या पेंढीचा उपयोग पशू खाद्यात केला जातो.  

जवस (लीनम युसिटेटिसियम) हे मुख्यत्वे गळीत धान्य आहे. प्राचीन काळापासून भारतात जवसाची लागवड करण्यात येत आहे. काही वैदिक ग्रंथात जवसाच्या बिया, झाडाचे विविध उपयोग सांगितले आहेत. भारतात जवसाची मुख्य पिकात गणना होत नाही. मात्र सध्या जवसाच्या बियांतील विशेष घटकामुळे आहारशास्त्रात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. पूर्वीपासून आपल्या आहारात जवसाची चटणी, तेलाचा ग्रामीण आहारात समावेश आहे. 

खाद्य तेलबियाच्या बरोबरीने औषधी, औद्योगिक उपयुक्तता, पशुआहार, झाडाच्या तंतुंपासून कापडनिर्मिती असे जवसाचे अनेक उपयोग आहेत. विदर्भात कमी पाऊस झालेल्या वर्षीही रब्बी हंगामात जवसाचे रोप तग धरू शकते, शेतकऱ्याला उत्तम मोबदला देऊ शकते. जवसाचे पीक कुठेही सहज येऊ शकते. जवसाच्या विविध उपयोगांबाबत पुरेशी जनजागृती झाले तर जवस हे एक कमीखर्चात उत्तम मोबदला देणारे पीक म्हणून सिद्ध होईल. 
जवसाचे गुणधर्म 
 १०० ग्रॅम जवसामध्ये १८.२८ टक्के प्रोटीन, २८.८८ टक्के कार्बोहायड्रेड, स्निगधांश-४२.१६ टक्के, फायबर २७.२३ टक्के तसेच अल्प प्रमाणात जीवनसत्त्व ब-५, ब-१२, फोलेट, नायसिन, रायबोक्लेबीन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सेलेनियम असते. या गुणधर्मामुळे बाजारात जवसतेलाच्या गोळ्या खरेदी करण्याचा कल वाढलेला आहे.

कमी खर्चाचे पीक 
महाराष्ट्रात सुमारे ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर जवसाची लागवड केली जाते. त्यापैकी विदर्भात ६० हेक्टरवर लागवड असते. जवसासाठी विशिष्ट प्रकारची जमीन, फारश्या पर्जन्यामानाची गरज नसते. त्यामुळे जवसाचे उत्पादन भारताच्या कोणत्याही भागात घेता येते. विदर्भातील हिवाळी हवामान जवसाच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. या पिकाला फारशी सायनिक खताची गरज नाही, जास्त मशागतीची गरज नाही. तसेच कापसासारखी सारख्या फवारण्याची गरज नाही. बियाणे स्थानिक असल्यामुळे बियाणावरील खर्च कमी येतो. साधारणपणे १२० ते १२५ दिवसांत पीक कापणीला येते. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार केल्यास इतर पिकाच्या तुलनेत हे पीक कमी श्रमात, कमी खर्चात व कमी वेळात घेता येते. तसेच उत्पादन देखील चांगले आहे. सध्या जवसाला चांगली बाजारपेठ उपलब्ध असून चांगला दर देखील मिळत आहे.

असे आहे जवस 

 •  झाडाची सरासरी उंची एक मीटर असते. झाडाला मुख्य दंडावर उगवणाऱ्या बाजूच्या फांद्या असतात. 
 •  फांदीवर पान एकानंतर एक प्रकारे उगवतात. पाने लांबट, चिंचोळी असून त्याच्या कडा गुळगुळीत केसविरहीत असतात.
 •  फांद्यावर फुले वरच्या भागात उगवतात. फुलांच्या आकार २५ ते ३० मि. मी. पाच पाकळ्या असतात त्यात पांढरा, निळा, निळसर लाल हे तीन वेगवेगळे रंग आढळतात. 
 •    जवस फळ लहान आकाराचे असते. कवच पातळ सालीचे आकाराने गोल किंवा अंडाकृती असते. एका फळात साधारण दहा अंडाकृती चपट्या बिया असतात.
 •  जवस बीजोत्पादनकरिता दोन वाणामधील विहित अंतर ५० मीटर प्रमाणे असावे. तसेच भेसळ काढणे व रोगग्रस्त झाडे काढणेही काळजी घ्यावी लागते.

लागवड पद्धत  

 •  जमीन मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणारी, पाण्याचा निचरा होणारी निवडावी. जमिनीचा सामू ६.५ तर ७.५ असावा. 
 •  मुळ्यांची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करून एक कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर शेणखत मिसळून दुसरी कुळवाची पाळी द्यावी.
 •    पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा ओलिताखालील पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. 
 •  पाने व बोंडे पिवळी पडल्यावर पीक काढण्यास योग्य आहे असे समजावे. पिकाची कापणी करून, ५-६ दिवस वाळवून मळणी करतात. एकरी ११०-१२० किलो उत्पादन मिळते. 

पेरणीचे प्रकार  
  उरडीव पद्धत ः भात कापणी झाल्यावर जमिनीत ओलावा असताना नांगरणीकरून जवसाचे बी फेकून पेरण्यात येते. 
  फोकीव पद्धत : जमीन न नांगरता आधीचे पीक कापणीवर येण्यापूर्वी बी फेकून देण्यात येते. 
  उताळी पद्धत : जमिनीची मशागत करून ठेवली जाते. कोंब आलेले बीज रेतीत मिसळून फेकण्यात येते. 

पारंपरिक बियाणे संवर्धन व बौद्धिक संपदा नोंदणी 

 •    महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमात ‘पीकवाण संवर्धन’ प्रकल्पामध्ये जवस वाणाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन संवर्धन करण्यासाठी २०१४ पासून कामास सुरवात झाली. यामध्ये पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांमधील साकोली, भंडारा, सडक-अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, ब्रम्हपुरी व नागभीड या सहा तालुक्यांतील ४८ गावांमध्ये ८७ शेतकऱ्यासोबत १८२ एकरात प्रात्यक्षिके घेण्यात आली. 
 •    प्रामुख्याने स्थानिक पातळीवरील परंपरागत बियाणांचे शोध घेतला. त्यांच्या बाह्य गुणाची दरवर्षी नोंदणी घेऊन ती पडताळून पाहण्यात आली. यातून जवसाचे करडा जवस व पिवळा जवस असे दोन प्रकार आढळले. त्यांचे शुद्ध बियाणे तयार करण्यासाठी पारंपरिक कौशल्य व आधुनिक पद्धतीने अवलंब केला.
 •    अशा पद्धतीने कृतीसंशोधनाद्वारे पाच वर्षांत ४६,८८२ किलो जवस उत्पादन मिळून शुद्ध बियाणाची शेतकऱ्यांनी ३०,०३८ किलो निर्मिती केली आहे.

जवसाच्या औषधी गुणधर्माची 
ओळख देणारे ः देवाजी कापगते 

 • ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाद्वारे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यामधील पावळा(बूज) या गावात २०१५ मधे ‘ग्राम जैवविविधता समिती’ स्थापन करण्यात आली. या जैवविविधता समितीचे सदस्य देवाजी सदाशिव कापगते यांनी अनेक पिढ्यांपासून मिळालेला वैदुज्ञानाचा वारसा जपलेला आहे. ते वनऔषधीचा उपयोग करून ग्रामस्थांचे अनेक आजार बरे  करतात. उपचारामध्ये ते जवसाचा वापर करतात. 
 •    जवसाचे गुणधर्म उष्ण तसेच व्रणरोधक आहेत. त्यामुळे गळू (बेंड) झाल्यास जवसाची पेंढ(ढेप) बांधण्याचा सल्ला ते देतात. त्यामुळे  गळू लवकर पिकतो आणि फुटतो. दूषित रक्तस्राव होऊन ठणका कमी होण्यास मदत होते. 
 •    छातीमध्ये कफ झाल्याने जेव्हा ताप येतो तेव्हा जवसाच्या पिठाचे पोटीस करून छाती शेकण्याचा सल्ला देतात. परिणामी कफ पातळ होऊन वांतीद्वारे बाहेर पडून छाती मोकळी होते.
 •    भाजलेल्या जागी जवसाचे तेल व चुन्याची निवळी समभाग एकत्र करून चांगले घोटून लेप लावावा. त्याने दाह कमी होऊन जखम लवकर बरी होते. 
 •    एखाद्या व्यक्तीचे हाड तुटले असता जवसाच्या तेलाचा उपयोग हाड जोडण्याकरिता होतो. 
 •    जनावरांच्या काही आजारांवर जवसाचे तेल पाजण्याचा सल्ला ते देतात. 
 •   त्यांच्या अनुभवानुसार जवस बहुगुणी असल्याचा ते दावा करतात त्यांनी आपल्या गावातील जैवविविधता रजिस्टरमध्ये वरील रोगांच्या औषधी गुणाबाबत नोंदणी केली आहे.

(टीप ः  उपरोक्त उल्लेख वैदूंच्या पारंपरिक ज्ञानाचा भाग आहेत. ग्रामीण प्रागतिक युवा मंडळ, महाराष्ट्र जनुक कोश यांपैकी कोणत्याही औषधी उपयोगाची खात्री देत नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वरील औषधी उपयोग करू नये.)

जवसाचे उपयोग 

 •    बियापासून खाद्य तेल आणि औद्योगिक तेलाच्या उत्पादनासाठी ८० टक्के केला जातो.
 •    झाडापासून मिळणाऱ्या तंतूचा उपयोग कापड व्यवसाय, वेगवेगळ्या प्रकारचे कागद तयार करण्यासाठी व शोभेच्या वस्तू निर्मितीकरिता उपयोग होतो. 
 •    जवसाच्या तंतूपासून पक्के दोरखंड, व्ट्रीलचा धागा, पोते, पिशव्यांची निर्मिती केली जाते. 
 •    पूर्वीपासून तेलाचा उपयोग तेलरंग, वार्निश, साबण, छपाईची शाई, वंगण, मलम, चमड्याच्या पॉलिशसाठी होतो.
 •    जवसाच्या पेंढीचा उपयोग पशू खाद्यात केला जातो.  

- अविल बोरकर, ९०११९४२८२२
(लेखक भंडारा येथील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव आहेत)

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
माळशिरस, करमाळ्यात मक्याची ३० हजार...सोलापूर  ः अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊसरत्नागिरी : जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या...
चंद्रपूर कृषी विभाग देणार रानभाज्यांची...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः अळू, काटवल, सूरण, टरोटा...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवातकोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून...
असे होते ग्लायफोसेट तणनाशकाचे निसर्गात...केंद्र सरकारकडून नुकताच मसुदा आदेश प्रसिध्द...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यात पावसाच्या अंदाजानुसार ऑगस्ट...एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात...