नारळ बागेत आंतरपिके फायदेशीर

नारळ बागेत दालचिनी लागवड
नारळ बागेत दालचिनी लागवड

सुरवातीच्या काळात नारळ बागेत भाजीपाला, केळी, अननस, तृणधान्य, कडधान्य ही आंतरपिके म्हणून घेता येतात. याचबरोबरीने मसाला पिकांची लागवड फायदेशीर ठरते. उपलब्ध जागेनुसार पिकांचे नियोजन आणि व्यवस्थापन करावे.

नारळाचे झाड पाच वर्षांचे झाल्यानंतर फक्त २५ टक्के जागेचा वापर करते. त्यामुळे ७५ टक्के जागा आणि ५५ टक्के सूर्यप्रकाश उपलब्ध होतो. सुरवातीचे काळात नारळ बागेत भाजीपाला, केळी, अननस, तृणधान्य, कडधान्य ही आंतरपिके म्हणून घेता येतात. याचबरोबरीने नारळ बागेत आंतरपीक म्हणून जायफळ, दालचिनी, काळीमिरी, लवंग, ऑलस्पाईस लागवड फायदेशीर ठरते.

  •  नारळ झाडाचा विस्ताराचा विचार करता ७.५ बाय ७.५ मीटर अंतराने नारळाची लागवड करतो. पूर्ण वाढलेल्या नारळ झाडांची कार्यक्षम मुळे आडवी १.८ मी. आणि ३० ते १२० सें.मी खोलवर पसरतात. त्यामुळे नारळाचे झाड बागेतील फक्त २३ ते २५ टक्के जागा उपयोग आणते. त्यामुळे शिल्लक ७५ ते ७७ टक्के जागेचा उपयोग आंतरपिके घेण्यासाठी होऊ शकतो. योग्य अंतरावर नारळाची लागवड केल्यास जास्तीत जास्त सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचतो. नारळाच्या वयोमानानुसार तीन गटांत विभागणी केली जाते. 
  • अ) लागवडीपासून ८ वर्षांपर्यंत : अशा बागांमध्ये कमी उंचीची हंगामी आणि एकवर्षिय पिके घेण्यासारखी पुरेशी जमीन आणि सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. 
  • ब) ८ ते २० वर्षे वयाची नारळ बाग : अशा बागेत कमी सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत असतो. त्यामुळे सूर्यप्रकाश विचार करून आंतरपिके लागवड करणे योग्य ठरते. 
  • क) २० वर्षांपेक्षा मोठी नारळ बाग : अशा बागेतील नारळ झाडे ६ मीटर पेक्षा उंच असतात. त्यामुळे जवळजवळ ५५ टक्के सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचतो. अशा बागांमध्ये विविध प्रकारची आंतरपिके घेता येतात. 
  • नारळ बागेत मसाला पिकांची लागवड 

  •  नारळाची लागवड ७.५ बाय ७.५ मीटर अंतरावर आहे आणि झाडाचे वय ७ ते ८ वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा बागेत दोन झाडांच्या मधोमध म्हणजे ३.७५ मीटर अंतरावर लवंग किंवा जायफळ लागवड करावी. 
  • जर बागेत कमी अंतर ठेवले असेल तर चार झाडांच्या मध्यभागी एक झाड याप्रमाणे लागवड करावी. दालचिनी लागवड करताना नारळाच्या बुंध्यापासून १.८० मीटर अंतर सोडून १.२०  बाय १.२० मीटर अंतरावर लागवड करावी. 
  •  मिरीची लागवड करताना नारळ अगर सुपारीच्या झाडांवर मिरीचे वेल सोडावेत. नारळ झाडांच्या ओळीमधील पट्टयात ३ बाय ३ मीटर अंतरावर पांगारा किंवा गिरीपुष्पाचे खुंट लावून त्यावर मिरीवेल सोडावेत. परंतु, जर नारळाची मुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीच्या वर आली असतील तर अशा झाडांवर मिरीवेल सोडू नयेत. 
  •  नारळाच्या बागेत दोन झाडातील अंतर खूपच कमी असेल अगर नारळ बागेतील झाडे ओळीत न लावता वेडीवाकडी लावली असतील, तर अशा बागेत ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पुरेसा येतो अशा ठिकाणीच मसालापिकांची लागवड करावी. 
  •  कोकणातील नदीखोऱ्यातील नारळ बागांमध्ये घट्ट लागवड असल्याने दाट सावली असते, अशा बागेत वेलदोड्याची लागवड यशस्वी होऊ शकते.
  • नारळ लागवड करताना दालचिनीची लागवड केली तरी चालेल.
  • लागवड केल्यापासून तीन ते पाच वर्षांपर्यंत नारळाच्या पानांचा लवंग व दालचिनी झाडांना उपद्रव होतो. अशावेळी या झाडांना लागणारी पाने न तोडता बाजूच्या पानाला बांधावीत. 
  • नारळ, लवंग याच्याबरोबर योग्य अंतर ठेवून केळीची लागवड केल्यास लवंग झाडांना सावली मिळते. त्यानंतर त्यावर नारळाच्या पानांची सावली निर्माण होते. 
  • जायफळ व वेलदोडा यांना मात्र सूर्यप्रकाश सहन होत नाही. मिरीच्या वेलांना थोडीफार सावली व आधार मिळतो. त्यामुळे जायफळ वेलदोडा आणि मिरी यांची सुरवातीपासून सुध्दा योग्यप्रकारे काळजी घेऊन लागवड करता येते. 
  •  - ०२३५२-२५५३३१ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com