agriculture news in Marathi, article regarding Janarth NGO,Nandurbar | Agrowon

शेती, आरोग्य विकास अन् पर्यावरण संवर्धनात ‘जनार्थ’चे विविध उपक्रम

विक्रम कान्हेरे
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांचे आरोग्य आणि शिक्षण सुधारणे, जीवनमान उंचावणे यासाठी सर्व स्त्री-पुरुष समाजाच्या सक्षमीकरणासाठी जनार्थ आदिवासी विकास संस्था कार्यरत आहे. याचबरोबरीने संस्थेने जल- मृद्‌संधारण, जंगल संवर्धन आणि शेती विकासाला गती दिली आहे.

नंदुरबार हा आदिवासी जिल्हा मानव विकास निर्देशांकानुसार महाराष्ट्रात सर्वांत मागे आहे. जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य आणि शिक्षण सुधारणे, जीवनमान उंचावणे यासाठी सर्व स्त्री-पुरुष समाजाचे सक्षमीकरण आवश्यक असते. हा सक्षमीकरणाचा धागा सर्व प्रश्नांमध्ये गुंफत जनार्थ आदिवासी विकास संस्थेने आपल्या कामाची उभारणी केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांचे आरोग्य आणि शिक्षण सुधारणे, जीवनमान उंचावणे यासाठी सर्व स्त्री-पुरुष समाजाच्या सक्षमीकरणासाठी जनार्थ आदिवासी विकास संस्था कार्यरत आहे. याचबरोबरीने संस्थेने जल- मृद्‌संधारण, जंगल संवर्धन आणि शेती विकासाला गती दिली आहे.

नंदुरबार हा आदिवासी जिल्हा मानव विकास निर्देशांकानुसार महाराष्ट्रात सर्वांत मागे आहे. जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य आणि शिक्षण सुधारणे, जीवनमान उंचावणे यासाठी सर्व स्त्री-पुरुष समाजाचे सक्षमीकरण आवश्यक असते. हा सक्षमीकरणाचा धागा सर्व प्रश्नांमध्ये गुंफत जनार्थ आदिवासी विकास संस्थेने आपल्या कामाची उभारणी केली आहे.

पर्यावरणाचे संवर्धन 

 • पर्यावरणाच्या समस्येवर काम करताना परिसराचा माणसाच्या गरजा भागवायला उपयोग करण्यासाठी त्यामध्ये बदल करून; पण त्यावर स्वार न होता पर्यावरण संतुलन राखणे हे चिकाटीचे काम आहे.
 •  नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात विरपूर, भुते, आकासपूर अशा पट्ट्यातील १८०० हेक्टर जंगलाच्या रक्षणासाठी दोन गावांतील आदिवासींनी सामूहिक प्रयत्न सुरू केले. २००२ पासून जंगल सामूहिकरीत्या संरक्षण व जतन करण्याच्या संकल्पाचे महत्त्व पटल्यामुळे या गावांनी हा प्रकल्प हाती घेतला. २००६ ला वनहक्क कायदा झाला. आदिवासींना त्यांचे पारंपरिक हक्क मिळण्यासाठी व जंगलाचे संरक्षण चांगल्या तऱ्हेने व्हावे यासाठी कायद्याने सामूहिक वनहक्क आणि वैयक्तिक वनहक्क दिले; पण सामूहिक हक्कापेक्षा आदिवासींना जमिनीची वैयक्तिक मालकी मिळण्यावर राजकीय पक्ष, संघटना, संस्था यांनी जोर दिला. शेतीवरील संकटातून मार्ग काढत असतानाच शेतजमीन, शेतीचा तुकडा आपल्या वैयक्तिक मालकीचा होणे हे स्वप्नही त्याचबरोबर प्रवास करीत होते.
 •  सद्यःस्थितीत विरपूरमधील २०६ हेक्टर जंगल विरपूरवासींना सामूहिक वनहक्क म्हणून २०१८ मध्ये मिळाले; पण त्याआधी २०१५ मध्येच लोकांचे प्रयत्न व जनार्थ संस्थेचे सहकार्य यामुळे या जमिनीत ३ हजार रोपांची लागवड विरपूरकरांनी केली. त्याला वनखाते-महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनीही साथ दिली.
 •   तेरा वर्षांच्या कामातून नागझिरी, कोटबाधणी या दोन गावांतील लोकांचाही संस्थेवर विश्वास बसला होता, त्यामुळे या दोन गावांच्या एकूण ६,००० हेक्टर सामूहिक वनाचे जतन, संरक्षण व वृद्धी करण्याची जबाबदारी जनार्थ आदिवासी विकास संस्थेला देण्याचे या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी ठरवले.
 •  तिन्ही गावांतील लोकांचा सहभाग आणि जंगल संरक्षण- जतन- संवर्धन साध्य करण्यासाठी लोकांचे सक्षमीकरण ही आवश्यक व महत्त्वाची बाब होती. लोकसहभागातून विरपूर गावाने पेसा निधीतून जंगलात पाइपलाइन टाकून टाकी बांधली, त्यामुळे जंगलातील रोपांना पाणी घालण्याचे काम सोपे झाले.
 •  वनभाज्या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक भाज्या लोकांच्या समोर आणणे, तसेच वनभाज्या लागवडीसाठी नागझिरी ग्रामसभेत स्त्रियांना १०० हेक्टर सामूहिक वनजमीन वापरायला देण्याचा ठराव करणे अशा सकारात्मक गोष्टीही घडल्या आहेत. या प्रयत्नात डॉ. माधव गाडगीळ, जैवविविधता गट, महाराष्ट्र, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग, आयसर संस्थेच्या महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रमाद्वारे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे.

आरोग्य सखी उपक्रम

 •  धडगाव तालुक्यातील १७ गावांमध्ये बाल मृत्युदर कमी करण्याच्या कामात संस्थेला बऱ्यापैकी यश मिळाले. गावातील प्रशिक्षित आरोग्य सखी या कार्यक्रमाचा कणा होती. सिकल सेल अनिमिया या आदिवासींमध्ये आढळणाऱ्या आजाराबाबत जनजागृतीबरोबरच ५ तालुक्यांत शिबिरे आयोजित केली जातात. ‘जन आरोग्य अभियान’ या राज्य पातळीवरील अभियानाच्या सहकार्याने शासनाला याचे गांभीर्य जाणवून दिले. याच्या परिणामी सर्व आदिवासी जिल्ह्यांमध्ये सिकल सेलबाबत शासकीय प्रकल्प सुरू झाला होता.
 • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ‘लोकाधारित देखरेख व नियोजन प्रकल्प’ लोकसहभागाने शासकीय आरोग्य सेवा सुधारण्यासाठी राबवण्यात आला. या प्रकल्पात संस्था २००७-०८ पासून नंदुरबार जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहे.
 • आदिवासी विकास विभागामार्फत २०१८-१९ पासून सुरू झालेल्या ‘कम्युनिटी ॲक्शन फॉर न्यूट्रिशन’ प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेवा लोकसहभागातून सुधारण्यासाठी शहादा व धडगाव तालुक्यातील प्रत्येकी ४० गावांमध्ये संस्था काम करत आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून बजाज ऑटो लि.च्या सहकार्याने नंदुरबार तालुक्यातही ५० गावांमध्ये लहान मुले व महिलांमधील पोषण व आरोग्य सुधारण्यासाठी संस्था काम करत आहे. 
 • मानसिक आजाराबद्दल असलेल्या अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करणे, गावकऱ्यांचे आणि आजारी व्यक्तीचे व कुटुंबीयांचे प्रबोधन करून उपचारासाठी प्रवृत्त करणे याबरोबरच शासकीय पातळीवर पाठपुरावा करून मानसिक आजारी व्यक्तींना मोफत औषधोपचार मिळावे यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. 
 • या सर्व उपक्रमांना जैवविविधता समिती, गाव आरोग्य- पोषण- पाणीपुरवठा- स्वच्छता समिती, शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत यांच्या सक्षमीकरणातून शाश्वतता मिळावी असा उद्देश आहे. लोकशाही व्यवस्था बळकट करणे आणि आदिवासी समाजाचा त्या व्यवस्थेत बरोबरीचा सहभाग असणे या दिशेने जाण्यात संस्था आपला वाटा उचलत आहे.

बालकेंद्रित शिक्षण मंच  

 • संस्थेने बालवाड्या, अनौपचारिक शिक्षण वर्ग, खेळघर असे उपक्रम राबवले. शासनाने मूल्यमापन धोरण सुरू केल्यावर ‘बालकेंद्रित शिक्षण मंच’ सुरू केला. त्यातून प्रयोगशील शिक्षकांचा गट तयार करण्याचा प्रयत्न दोन वर्षे केला. 
 • धडगाव तालुक्यात गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण २० गावांतील २००० मुलांपर्यंत पोचवण्याचे काम सुरू आहे.
 • शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांचे सक्षमीकरण करून त्यांनी शिक्षकांबरोबर पुढील पिढीला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी संयुक्त पुढाकार घ्यावा असेही प्रयत्न संस्था करत आहे.  

शेती, पाणलोट विकासाला गती

 • शेती व पाणलोट विकास, आरोग्य, शिक्षण, विकास व नियोजन याबाबत शहादा, धडगाव व नंदुरबार तालुक्यात चिकाटीने संस्था काम करीत आहे. संस्थेच्या कामाची सुरवात शहादा तालुक्यातील २० गावांमध्ये झाली. संस्थेने गावांचे पायाभूत सर्वेक्षण केले. 
 • शेती, पाणलोट विकास, शिक्षण, आरोग्य, लोकशाही मूल्य, आदिवासी स्वशासन याबाबत जनजागृती, महिला सक्षमीकरण अशा विविधांगी विषयांवर संस्थेने काम केले. संस्थेत पुढाकार घेणारे विक्रम, रंजना, रूपसिंग हे पूर्वी आदिवासी शेतमजूर संघटनेत कार्यकर्ते होते, त्यामुळे प्रश्नांची समजही होती. जनार्थ, औरंगाबादची शाखा म्हणून सुरवातीला हे काम सुरू करण्यात आले. याला ॲक्शन एड इंडियाची आर्थिक मदत होती.
 • चार गावांतल्या ३०० हेक्टरवरील शेतजमिनीला बांध घालून पाणलोट विकासाची सुरवात झाली, विहीर पुनर्भरण, विहिरीतील गाळ काढणे, पाणी मुरण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचे प्रयत्न, पर्यावरणाविषयी जनजागृती, असे कार्यक्रम हाती घेतले.
 • आदिवासी शेतकऱ्यांनी शेणखत दुसऱ्याला न विकता स्वतःच्या शेतात वापरावे, रासायनिक खतावरील अति-अवलंबित्व सोडून पिकांना योग्य खते देणे, गांडूळ खत निर्मिती, खते, बियाणे घेण्यासाठी गावाचा स्वनिधी उभा करणे, असे उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत.
 • नंदुरबार जिल्ह्यामध्ये दर काही वर्षांनी येणारा केसाळ अळीचा पिकावरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामूहिक प्रबोधन आणि नियंत्रणाचे उपाय हा एक महत्त्वाचा उपक्रम संस्था राबविते.  
   

 - विक्रम कान्हेरे, ८२७५१२३६२२


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...
चुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...
स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
बारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...
जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...
डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या...एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...