संगोपन शेळ्यांच्या स्थानिक जातींचे

स्थानिक जाती नैसर्गिक निवडपद्धतीतून निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे, अतिउच्च तापमान, कडाक्याची थंडी, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीतही या जाती तग धरून राहू शकतात.
 local breeds of goats
local breeds of goats

स्थानिक जाती नैसर्गिक निवडपद्धतीतून निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे, अतिउच्च तापमान, कडाक्याची थंडी, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीतही या जाती तग धरून  राहू शकतात.  देशाचा विचार करता राज्यांमध्ये शेळ्यांच्या विविध जाती दिसून येतात. हिमालयाच्या बर्फाच्छादित भागासाठी उत्तम प्रकारची पश्मिना लोकर देणारी चांगथांगी, काश्मिरी, गड्डी तसेच राजस्थानच्या वाळवंटात तग धरणारी, तेथील झाडपाल्यावर गुजराण करू शकतील अशा सिरोही, सोजत या उंच जाती आहेत. महाराष्ट्रासारख्या डोंगराळ  राज्यासाठी उस्मानाबादी, संगमनेरी यासारख्या जाती आणि पश्चिम बंगाल , केरळ, तामिळनाडू यांसारख्या समुद्रकाठच्या राज्यांमध्ये काळी बंगाल, मलबेरी या जाती दिसून येतात. राष्ट्रीय पशुअनुवांशिक संशोधन संस्थेच्या माध्यमातून आज शेळ्यांच्या ३६ जाती देशात  उपलब्ध आहेत. गेली ४० वर्षे शेळी सुधारणा कार्यक्रमामध्ये आफ्रिकन बोअर, टोगेनबर्ग, सानेन यांसारख्या विदेशी जातींबरोबर संकरीकरणाचा कार्यक्रम राबवून स्थानिक जातींची वजनवाढ सुधारणा, दूध उत्पादनात सुधारणा यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत विविध  संशोधन प्रकल्प राबविले गेले. मात्र या संशोधनातून असे निदर्शनास आले की, संकरामुळे पहिल्या पिढीत काही अंशी सुधारणा दिसून येते पण, पुढील पिढीमध्ये या सुधारणांमध्ये सातत्य  राहत नाही. नव्याने निर्मिती झालेल्या जाती वातावरणाशी समरस होण्याची शक्यता कमी असल्याने, त्या वारंवार आजाराला बळी पडतात. स्थानिक जातींच्या तुलनेत या जातींमध्ये त्यांच्या आहाराकडे जास्त लक्ष द्यावे लागते. परिणामी या शेळ्यांच्या आहारावर जास्त खर्च होतो. या सर्व बाबींचा सर्वांगीण अभ्यास करून शेळी पैदास धोरण ठरविताना शासनाने स्थानिक शेळ्यांच्या वापरला प्रथम प्राधान्य  दिले आहे.   स्थानिक जातींची वैशिष्टे  

  • स्थानिक जाती नैसर्गिक निवडपद्धतीतून निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे, अतिउच्च तापमान, कडाक्याची थंडी, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीतही या जाती तग धरून  राहू शकतात. 
  • स्थानिक ठिकाणी उपलब्ध असलेले चारा स्रोत उदा. गवत, झाडपाला इत्यादीची चव या शेळ्यांमध्ये विकसित झालेली असते. त्यामुळे, कडूलिंबासारखा झाडपाला खाऊनही या शेळ्या उत्तमरीत्या राहू शकतात.
  • स्थानिक झाडपाल्यामध्ये असलेले टॅनीनसारखे विषारी घटक पचविण्याची ताकद या शेळ्यांमध्ये विकसित झालेली 
  • असते.
  • कोटी पोटामध्ये स्थानिक चाऱ्याचे विघटन करणारे जीवजंतू योग्य प्रकारे तयार झालेले असल्याने, अत्यंत निकृष्ट दर्जाच्या चाऱ्याचे रूपांतर मांस व दुधामध्ये करण्याची चांगली क्षमता असते.
  • स्थानिक वातावरणात होणारे बदल सहन करण्याची क्षमता असते.
  • या शेळ्या वातावरणाशी उत्तम रीतीने समरस होत असल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थापनावर फारसा खर्च करावा लागत नाही.
  • सध्याचे बदलते हवामान व जागतिक तापमानवाढीचा विचार करता या बदलामध्ये तग धरून राहण्याची क्षमता स्थानिक जातींमध्ये विशेषत्वाने आढळते. त्यामुळे, स्थानिक जातींचा मृत्युदर तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो. व्यवसायात होणारा नफा वाढतो.
  • स्थानिक जाती लांबवर चरायला जाऊ शकतात. त्यामुळे, चाऱ्यावरचा खर्च अत्यंत कमी होतो.
  • स्थानिक जातीच्या शेळीच्या दुधामध्ये चांगले औषधी गुणधर्म असतात. लांबवर चारणाऱ्या व विविध वनस्पती खाणाऱ्या स्थानिक शेळ्यांना पर्याय नाही.
  • स्थानिक जातींना उपलब्ध साधनसामग्रीचे तयार केलेले गोठे पुरेसे होतात. कमी पावसाच्या प्रदेशात गोठ्याविनाही स्थानिक शेळ्या उत्तम रीतीने राहू शकतात. त्यामुळे, गोठेबांधणीवरचा खर्च कमी होतो.
  • मांसाचा दर्जा व चव यांचा विचार करता उस्मानाबादी शेळीला पर्याय नाही. संगमनेरी ही दुधासाठी चांगली जात आहे. कोकण कन्याळ शेळीची अति पावसात व दलदलीत  खुरे कुजत नाहीत. बेरारी शेळी विदर्भातील अतिउष्ण तापमानात चांगल्या रीतीने तग धरते.
  • महाराष्ट्रातील स्थानिक जाती  

  • कोकणासारखा अतिवृष्टीचा विभाग ः कोकण कन्याळ 
  • मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग ः उस्मानाबादी 
  • पश्चिम महाराष्ट्रातील बागायती विभाग ः संगमनेरी 
  • विदर्भातील उष्ण विभाग ः बेरारी
  • संपर्क- डॉ संजय मंडकमाले, ९८२२३५९९३७ (अखिल भारतीय संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com