संगोपन रेशीम कीटकांचे

सुधारित पद्धतीने रेशीम कीटक संगोपनगृह तयार करावे.
सुधारित पद्धतीने रेशीम कीटक संगोपनगृह तयार करावे.

एक एकर तुती लागवड क्षेत्रासाठी बाल्य अवस्थेसाठी स्वतंत्र १४ x १० फूट क्षेत्रफळ आणि ९ ते १० फूट उंची असलेले बाल कीटकसंगोपनगृह पुरेसे आहे. प्रौढ अवस्थेसाठी एक एकर तुती लागवड क्षेत्रासाठी प्रौढ अवस्थेसाठी स्वतंत्र ५० x २० फूट क्षेत्रफळ आणि ९ ते १० फूट उंची असलेले बाल कीटकसंगोपनगृह पुरेसे असते.

  • कीटकसंगोपनास योग्य तुती बहरल्यावर शेतकऱ्यांना रेशीम कीटकांच्या अंडीपुंजाचा पुरवठा केला जातो. अंडीपुंजाची वाहतूक करताना दिवसाच्या थंड काळात वाहतूक करणे फायदेशीर ठरते अन्यथा अंड्यातून कीटक बाहेर न येणे, कीटक कमकुवत राहणे आदी अडचणी उद्‌भवतात.
  • शेतकऱ्यांनी अंडीपूंज घरी आणल्यावर अंडीपूंज पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करणे, ठरावीक वेळेत अंडीपुंजाचे इंक्‍युबेशन, ब्लॅक बॉक्‍सिंग इत्यादी क्रिया केल्या जातात. 
  •  अंड्यातून रेशीम कीटक बाहेर आल्यापासून कोष बांधणीपर्यंतचा कालावधी २५ ते २७ दिवसांचा असून, यामध्ये रेशीम कीटकांचे एकूण ५ अवस्था असतात. या २५ ते २७ दिवसांत एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्यापूर्वी रेशीम कीटक ठरावीक अंतराने ४ वेळेस कात टाकतात. 
  • अंड्यातून रेशीम अळी बाहेर येताना काळ्या मुंगीसारखी दिसते. बाल्य अवस्थेतील कीटकसंगोपन सच्छिद्र प्लॅस्टिक ट्रेमध्ये केले जाते. या अवस्थेतील कीटकांच्या सुदृढ वाढीसाठी ताजा रसरशीत, सकस व दर्जेदार तुतीचा कोवळा पाला कापून तुकड्याच्या स्वरूपात दिला जातो. या अवस्थेतील कीटकांच्या निकोप वाढीसाठी २७ ते २८ अंश सेल्सिअस तापमान व ८५ ते ९० टक्के आर्द्रता आवश्‍यक असते. या अवस्थेतील रेशीम कीटक लहान असल्याने सर्व कीटक एकाच वेळी कातीवर बसणे व एकाच वेळी कातीवरून उठणे हे महत्त्वाचे असते. अन्यथा कमी-जास्तवाढीचे कीटक होण्याची संभावना असते.  या अवस्थेतील कीटकांच्या शारीरिक वाढीचा वेग, वजनाचा वेग, रेशीम ग्रंथीच्या वाढीचा वेग हा एकूण अवस्थेपैकी जास्त असतो, त्यामुळे बाल्य अवस्थेतील ८ दिवसांचे कीटकसंगोपन अतिशय काळजीपूर्वक व शास्त्रीय दृष्टिकोनातून हाताळणे गरजेचे ठरते. अलीकडच्या काळात व्यावसायिक बालकीटक संगोपनगृह चालकांकडून दोन अवस्था पूर्ण झालेल्या रेशीम कीटकांचा पुरवठा करणारे अनेक व्यावसायिक पुढे येत आहेत. 
  • प्रौढ कीटक संगोपन 

  • दोन अवस्था पूर्ण झालेली रेशीम कीटकांचे पुढील प्रौढ कीटक संगोपन स्वतंत्र अशा ५० x २० फूट क्षेत्रफळाच्या कीटकसंगोपनगृहाच्या रॅकमधील कप्प्यात केले जाते. या अवस्थेतील कीटकांच्या सुदृढ वाढीसाठी ताजा, रसरशीत, सकस व दर्जेदार तुतीचा अखंड फांदीच्या स्वरूपात दिला जातो. निकोप वाढीसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान व ७० ते ८० टक्के आर्द्रता आवश्‍यक असते. 
  • रेशीम कीटकांना दररोज सकाळी व संध्याकाळी फांद्यांच्या स्वरूपात खाद्य दिले जाते. बाल्यअवस्था व प्रौढ अवस्थेतील रेशीम कीटकांना रोगाची बाधा होऊ नये, याकरिता वेळोवेळी निर्जंतुकीकारण करावे.
  • कोष बांधणीसाठी तयार झालेल्या पक्व रेशीम कीटक पाला खाणे बंद करतात. कोष बांधण्यासाठी आधार शोधण्यास सुरवात करतात, अशावेळी रेशीम कीटकांचा कोष बांधण्यासाठी रॅकवर प्लॅस्टिक चंद्रिका अंथराव्यात. चंद्रिकेवर रेशीम कीटक कोष बांधतात. कोष बांधायला सुरवात झाल्यापासून साधारणपणे ५ व्या, ६ व्या दिवशी चंद्रिकेवरून कोष काढून विगतवारीनुसार कोष विक्री करावी.
  • कोष विक्रीकरिता राज्याचे कोष खरेदी केंद्रे प्रत्येक जिल्ह्यांत कार्यरत आहेत. याशिवाय खासगी रेशीम धागानिर्मिती उद्योजक, खासगी व्यापारी तसेच शेजारील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये लिलाव पद्धतीच्या कोष खरेदी-विक्री बाजारपेठा आहेत. याच धर्तीवर राज्यात जालना, बारामती येथे कोष मार्केट कार्यरत आहे. औरंगाबाद व भंडारा जिल्ह्यांमध्ये खासगी स्वयंचलीत रिलिंग उद्योजकांकडून देखील शेतकऱ्यांकडील कोषांचे खरेदी केली जाते. सांगली जिल्ह्यात असेच एक युनिट सहा महिन्यांत कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. 
  • रेशीम कोष उत्पादकास वर्षभरात साधारणपणे पाच बॅचेस घेता येतात. मनरेगा योजनेअंतर्गत तुती लागवडीपासून कीटकसंगोपनगृहापर्यंतच्या टप्यांसाठी २,९५,००० रूपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय प्रशिक्षण, शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. अंडीपुंजांचा पुरवठा माफक दरात केला जातो.
  • - संजय फुले  ः ९८२३०४८४४० (भाग्यश्री बानायत या रेशीम संचालनालय, नागपूर येथे संचालक आणि संजय फुले हे जिल्हा रेशीम कार्यालय, सातारा येथे रेशीम विकास अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com