मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कल

वायदे बाजार
वायदे बाजार

रब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. हळदीच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.४ टक्क्यांनी अधिक आहेत. हरभऱ्याच्या सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.६ टक्क्यांनी अधिक आहेत.  

एक ऑगस्टपासून डिसेंबर २०१९ डिलिव्हरीसाठी खरीप व रब्बी मका, गहू व भात (बासमती) यांचे तर जानेवारी २०२० डिलिव्हरीसाठी कापूस, गवार बी, हरभरा व मूग यांचे व्यवहार सुरू झाले. गेल्या सप्ताहात पावसाची प्रगती खूप चांगली होती. ३० जुलैपर्यंत झालेला पाऊस हा सरासरीपेक्षा ११ टक्क्यांनी कमी होता. ही घट ६ ऑगस्टपर्यंत फक्त चार टक्क्यांवर आली आहे. प. बंगाल, झारखंड, उत्तराखंड, तमिळनाडू व केरळ येथे ही घट अजून ३० टक्क्यांहून अधिक आहे. पुढील तीन ते चार दिवस भारतातील बऱ्याच भागात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे आत्तापर्यंतची घटसुद्धा निघून जाईल, अशी अपेक्षा आहे.   चांगल्या पावसामुळे सोयाबीन व कापसाचे उत्पादन वाढेल अशी अपेक्षा आहे. चीनकडून शेतीमालाची आयात अजून वाढलेली नाही. त्यामुळे एकूण आंतरराष्ट्रीय भाव नरमच आहेत. आपल्या देशातून होणाऱ्या सोयाबीन पेंडीच्या निर्यातीतसुद्धा घट झाली आहे. हळदीच्या इराणला होणाऱ्या निर्यातीत अमेरिकेच्या निर्बंधांमुळे घट झाली आहे. त्यामुळे हळदीचे भावसुद्धा नरम आहेत. या सप्ताहात गवार बी मधील किरकोळ वाढ वगळता इतर सर्वांचे भाव कमी झाले. (आलेख १). पुढील महिन्यात रब्बी पिकांचे (रब्बी मका, गहू व हरभरा) भाव वाढतील. गवार बी व हळदीचेसुद्धा भाव वाढतील. सोयाबीन, कापूस, मूग व बासमती भात यांचे भाव कमी होतील. (आलेख २).

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार  मका (रब्बी) रब्बी मक्याच्या (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. २,२७१ ते रु. २,१६५). या सप्ताहात त्या रु. २,१८१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. २,१६४ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमीभाव रु. १,७६० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७०० होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. ऑक्टोबर डिलिव्हरीचे भाव रु. २,२१० आहेत. खरीप मक्यासाठी (सांगली) अजून व्यवहार होत नाहीत. नोव्हेंबरमधील भाव (रु. २,२०५) हमीभावापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

साखर  साखरेच्या (ऑक्टोबर २०१९) किमती या सप्ताहात व्यवहार नसल्याने रु. ३,१६० वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२१७ वर आलेल्या आहेत.  

सोयाबीन  सोयाबीन फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ३,६८४ ते रु. ३,५८२). या सप्ताहात त्या रु. ३,५३९ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,६३४ वर आल्या आहेत. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी झाली आहे. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३,७१० आहे. ३० जुलै रोजी नोव्हेंबर डिलिव्हरीसाठी रु. ३,४९० भाव होता. नंतरच्या महिन्यांसाठी (ऑक्टोबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० डिलिव्हरीसाठी) तो याच किमतीच्या आसपास होता. हे सर्व भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. 

गहू गव्हाच्या (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. २,००५ ते रु. २,११६). या सप्ताहात त्या रु. २,०९२ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,०५८ वर  आल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,१५८). नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). 

गवार बी  गवार बीच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ४,५०१ ते रु. ४,२३६). या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेंत ०.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,३०२ वर आल्या  आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२७४ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती २.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३९०).  

हरभरा  हरभऱ्याच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात रु. ४,२३६ ते रु. ४,३९४ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. ४,२६८ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१९५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३४८). शासनाकडे पुरेसा साठा आहे. तो बाजारात येऊ लागला आहे. आवक वाढू लागली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). 

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. २०,४६० ते रु. १९,९१०). या सप्ताहात त्या रु. १९,६४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,२२२ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. १९,३७० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.२ टक्क्यांनी कमी आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. कापसाखालील पेरणी वाढत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या सप्ताहात कापसाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. या सर्वांचा परिणाम किमती कमी होण्यावर होत आहे.  मूग   मुगाच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. ६,००० ते रु. ६,३८४). या सप्ताहात त्या रु. ६,१८६ वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किमती रु. ६,३३८ वर आल्या आहेत. नवीन मूंग सप्टेंबर महिन्यात बाजारात येऊ लागेल. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. ६,३०१ वर आल्या आहेत. मुगाचे हमीभाव रु. ७,०५० आहेत. गेल्या वर्षी ते रु. ६,९७५ होते. 

बासमती धान  बासमती भाताच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ४,३०० ते रु. ३,७५९). या सप्ताहात त्या पुन्हा घसरून रु. ३,४९६ वर आल्या आहेत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,८०० वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. ३,४९५  वर आल्या आहेत. त्या स्पॉट किमतींपेक्षा ८ टक्क्यांनी कमी आहेत.  (टीप ः सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी).      

  - ईमेल ः डॉ. अरुण प्र. कुलकर्णी, arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com